Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 03 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
बंगळुरुच्या
भारतीय विज्ञान संस्थानला राष्ट्रीय
संस्थात्मक मानांकन आराखडा - एन आय आर एफ अंतर्गत शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता क्रमवारी
यादीत सर्वोच्च मानांकन मिळालं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी आज नवी दिल्ली इथं ही यादी जाहीर केली. यात पहिल्या दहा मध्ये भारतीय तंत्रज्ञान
संस्था - आय आय टी च्या सात संस्था आहेत. यात आयआयटी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या
सगळ्या उच्च शिक्षण संस्थांची अध्ययन, अध्यापन आणि संसाधनांच्या निकषांवर गुणवत्ता
क्रमवारी तयार करण्यात येते. या एकूण क्रमवारीत पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ
१८व्या, पुण्याचं भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्था २९व्या, तर मुंबईची होमी भाभा राष्ट्रीय
संस्था ३५व्या स्थानी आहे.
****
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या लोकांनी निवडणुका
लढवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च
न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीमध्ये पाच न्यायाधीशांच्या
घटनापीठातर्फे तीन खटले निकाली काढले जातील, असं सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील
पीठानं स्पष्ट केलं आहे.
****
भारतीय स्टेट बँकेत विलीन करण्यात
आलेल्या सहयोगी बँकांच्या दोन हजार ८०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीच्या पर्यायाची
निवड केली आहे. बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला
ही माहिती दिली. बँकेनं स्वेच्छा निवृत्तीची योजना जाहीर केली असून, १२ हजार कर्मचाऱ्यांना
ही लागू होत असल्याचं त्या म्हणाल्या. ही योजना पाच एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. ज्या कर्मचाऱ्यांची २० वर्ष सेवा आणि ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असेल
असे कर्मचारी स्वेच्छा निवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
****
औरंगाबाद, लातूर आणि नांदेड जिल्हा
परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदांची आज निवड करण्यात आली.
यामध्ये औरंगाबाद जिल्हा परिषदेत
समाज कल्याण सभापतीपदी धनराज डेडवाल, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून
कुसुम लोहकरे यांची तर अन्य विषय समित्यांच्या सभापती विलास भुमरे आणि मीना शेळके यांची
निवड झाली.
लातूर जिल्हा परिषदेत बांधकाम सभापतीपदी प्रकाश देशमुख,
समाज कल्याण सभापतीपदी संजय दोरवे, कृषी आणि पशु संवर्धन सभापतीपदी बजरंग जाधव आणि
महिला बाल कल्याण सभापतीपदी संगिता घुले यांची निवड झाली.
नांदेड जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापतीपदी शिला निखाते,
महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मधुमती कुंटुरकर, आणि अन्य दोन विषय समितीच्या
सभापतीपदी माधवराव मिसाळे आणि दत्तात्रेय रेड्डी यांची निवड करण्यात आली आहे.
****
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
निवडणुकीत काँग्रेस प्रणित लोकनेते चंद्रशेखर भोसले विकास पॅनलनं विजय मिळवला. या पॅनलचे
१८ पैकी १७ उमेदवार विजयी झाले, तर एका जागेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून
आला.
****
कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या
स्मरणार्थ समर्थ कारखाना परिसरात शंभर एकर शासकीय जमीन क्षेत्रात मराठवाड्यासाठी वसंतदादा
शुगर इन्स्टिट्यूटतर्फे उत्तम ऊस बेणे संशोधन आणि उत्पादन केंद्र उभारणार असल्याची
घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. जालना इथं
अंकुशराव टोपे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचं लोकार्पण आज पवार
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी होते.
****
राज्यात बहुतेक भागात उसळलेली
उष्णतेची लाट शमली आहे. आज सर्वात जास्त ४३ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर
इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यातही तापमानात काही अंशी घट झाली आहे. परभणी इथं ४१ पूर्णांक
नऊ, उस्मानाबाद इथं ४० पूर्णांक नऊ तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
****
दक्षिण मध्य रल्वेच्या नांदेड
विभागानं विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसंच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर
व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम राबवली. याअंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात नांदेड
विभागास तिकीट तपासणीतून जवळपास पाच कोटी रुपये महसूल मिळाला.
गेल्या वर्षभरात एक लाख ५२ हजार प्रवाश्यांवर विनातिकीट
प्रवास करणं, चुकीच्या तिकिटावर प्रवास करणं, तिकिटाच्या
रकमेतील फरक तसंच विना मूल्य माल वाहतूक करणं अशा प्रकरणात कार्यवाही करण्यात आली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment