Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01 February 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि.
****
·
२०१९-२० या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर
होणार
·
चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दर सात पूर्णांक
दोन दशांश टक्के राहण्याचा अंदाज
·
मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी एकत्र
यावं - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचं आवाहन
आणि
·
पाचव्या राज्यस्तरीय 'महा अॅग्रो' कृषी प्रदर्शनाला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ
****
केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल आज २०१९-२० या वर्षासाठीचा
अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या
वृत्तसेवा विभागाकडून आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी करण्यात येणार आहे. दरम्यान
काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं
सुरुवात झाली. १३ फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन
चालेल. राज्यसभेत माजी संरक्षण मंत्री जॉर्ज
फर्नांडीस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राष्ट्रपतींच्या
अभिभाषणात काहीही नावीन्य नव्हतं, हे निवडणुकीचं भाषण होतं, अशी
टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. या अभिभाषणानंतर ते संसद
परिसरात वार्ताहरांशी बोलत होते.
अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
यांनी यासंदर्भात बोलताना, सरकारनं भेदभाव न करता सर्व स्तरातल्या लोकांचा विकास
सुनिश्चित केल्याचं नमूद केलं.
दरम्यान, कालपासून सुरू झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, सरकारनं काल दोन्ही सभागृहातल्या सर्वपक्षीय सदस्यांची
बैठक घेतली.
****
चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक
सात दशांश ऐवजी सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील, असा अंदाज सरकारनं वर्तवला आहे.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. कृषी, वन, मत्स्योद्योग,
खनिकर्म या क्षेत्रातला विकास दर पाच टक्के राहील तर उद्योग क्षेत्रात सहा टक्के आणि
सेवा क्षेत्राचा विकास दर आठ पूर्णांक एक दशांश टक्के राहील असा अंदाज सांख्यिकी कार्यालयानं
वर्तवला आहे.
दरम्यान, जानेवारी २०१९ या महिन्यात वस्तू आणि सेवा कर
प्राप्तीनं एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अर्थमंत्रालयानं काल ट्वीटरवरुन
ही माहिती दिली.
****
पश्चिम नौदल क्षेत्राचे प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल
अजित कुमार यांनी काल मुंबईत पदभार स्वीकारला. पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल
गिरीश लुथ्रा निवृत्त झाल्यामुळे अजित कुमार यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.
****
राज्यातल्या शहरी गरिबांसाठी
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनानं सतरा हजार आठशे सतरा घरं मंजूर केली आहेत. केंद्रीय गृह निर्माण आणि नगर
विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ही मंजुरी
देण्यात आली. देशात एकूण चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सत्तर घरं मंजूर करण्यात
आली आहेत.
****
राज्यातल्या उच्चदाब
उपसा जलसिंचन योजनांना सवलतीच्या दरानं वीज पुरवठा करण्याचा शासन निर्णय काल जारी
करण्यात आला. शेतकऱ्यांना आता पूर्वलक्षी प्रभावाने एक नोव्हेंबर २०१६ पासून मार्च
२०२० पर्यंत हा वीजदर लागू राहणार आहे. अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारक
शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख
रुपये, दोन हेक्टर जमीन तर शौर्य-सेवा पदक धारकांच्या
अनुदानात दुपटीने वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. शहीदांच्या कुटुंबियांप्रती
कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य आहे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लोकपाल
आणि अन्य मागण्यांसाठी पुकारलेल्या उपोषणासंदर्भात त्यांची भेट घेऊन चर्चा करू, असं
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं
ते काल वार्ताहरांशी बोलत होते. हजारे यांनी आंदोलन मागं घ्यावं यासाठी आपण पुन्हा
प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांनी युतीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी केला, ही
अफवा असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं.
****
मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर होऊन विकास व्हावा,
यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अभ्यासकांनी एकत्र यावं, असं आवाहन विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं काल एकात्मिक राज्य जल आराखडा आणि
मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चासत्र झालं, त्यावेळी ते बोलत होते. या चर्चासत्राकडे मराठवाड्यातल्या
बहुतांश आमदार खासदारांनी
पाठ फिरवल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत
कराड, आमदार प्रशांत बंब, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, नांदेडच्या महापौर शिला
भवरे, यांच्यासह मराठवाडा विकास परिषदेच्या सदस्यांनी मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर
यावेळी चर्चा केली.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद इथं आजपासून पाचव्या राज्यस्तरीय 'महा अॅग्रो' कृषी प्रदर्शनाला सुरूवात होत आहे. पैठण रस्त्यावरील महानुभाव आश्रमासमोरील
कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं
आज सकाळी अकरा वाजता उद्घाटन होणार आहे. या चार दिवसीय प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित
२०० कंपन्यांचे स्टॉलस, शेती बाजार, पीक प्रात्याक्षिकासह चर्चासत्र आणि परिसंवादातून
शेती, शेतीपूरक उद्योगांबाबत कृषीतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या निमगिरी इथल्या
८० हेक्टर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून जंगल निर्माण करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या पुढाकारानं होत असलेल्या या उपक्रमाबाबत अधिक माहिती
देत आहेत आमचे वार्ताहर…
यात वड, पिंपळ, पेरू, आंबा
आदी झाडांची वाढ आठ ते नऊ फुट झाली आहे.विभागीय वन अधिकारी विजय सातपुते म्हणाले…
निमगिरी येथिल ८० हेक्टर क्षेत्रात ४३ हजार झाडं लावण्यात आली
असून सर्व झाडांची वाढ आत्ता आठ ते नऊ फुट झाली आहे.भविष्यात जंगल निर्माण करून भविष्यात
पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा प्रयत्न चालू आहे.आणि यासाठी पर्यावरण प्रेमींची
मागणी असल्यामुळे आणि त्यांचा सहभाग असल्यामुळे हे काम आम्ही निश्चितच पुर्ण करू.
परिणामी
भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. विनोद कापसीकर आकाशवाणी वार्ताहर परभणी.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड नगर परिषदेसाठी येत्या
२७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कालपासून नगर परिषदेच्या क्षेत्रात
आचार संहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी
संजय सावंत यांनी दिली. निवडणुकीसाठीची नामनिर्देशनपत्रं पाच ते १२ फेब्रुवारी दरम्यान स्वीकारली जाणार आहेत. तर
१८ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. येत्या दोन मार्चला नगर
परिषदेची मुदत संपत आहे.
****
येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात
अंतिम मतदार यादी काल प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातल्या सर्व मतदारांनी या यादीत आपलं नाव
आहे का? याची खात्री करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद शहरातल्या पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
प्रकरणात आरोपी अमोल अंकुशराव याला २० वर्ष सक्तमजुरी आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा
सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयानं काल ही शिक्षा सुनावली. या प्रकरणात एकूण आठ
साक्षीदार तपासण्यात आले.
****
भारतीय राष्ट्रीय
कृषी सहकार विपणन महासंघ- नाफेडच्यावतीनं नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड आणि देगलूर या तीन ठिकाणी हमीभावानं
तूर खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. आधारभूत दरानं या तुरीची शासन
खरेदी करणार आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हॅमिल्टन इथं झालेला चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना
न्यूझीलंडनं आठ गडी राखून जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेत तीन एक अशा फरकानं भारतानं
याआधीच विजयी आघाडी घेतली आहे.
****
स्पेनमध्ये सुरू असलेल्या महिला हॉकी सामन्यांमध्ये
काल भारतानं यजमान स्पेनला दोन दोन असं बरोबरीत रोखलं. उद्या भारताचा सामना २०१८च्या उपविजेत्या आयर्लंडसोबत होईल.
****
औरंगाबाद महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या रहिवाशांच्या
थकीत मालमत्ता करावरील संपूर्ण व्याज आणि दंड माफ करावं अशी मागणी आमदार सतीश चव्हाण
यांनी महापौर नंदकुमार घोडेले आणि महापालिका आयुक्त निपुण विनायक यांच्याकडे केली आहे.
मालमत्ता कराच्या
व्याज आणि दंडावर ५० टक्के सूट देण्याची अभय योजना सध्या सुरू आहे. मात्र
गेल्या अनेक वर्षांपासून आवश्यक सोयी सुविधा मिळत नसल्यानं, व्याज आणि दंड माफ करावं, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातल्या ६५ गावांमध्ये
राबवण्यात येणाऱ्या वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ काल पाणी पुरवठा आणि स्वच्छता
मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाला. मराठवाड्यातल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी
वॉटर ग्रीड योजना सुरु केल्याचं लोणीकर यावेळी म्हणाले.
//**************//
No comments:
Post a Comment