आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.००
वाजता
****
पुणे जिल्ह्यातल्या भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी
संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना आज सकाळी
पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यातल्या सत्र न्यायालयानं काल त्यांचा अटकपूर्व जामीन
अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आज सकाळी त्यांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली.
आज त्यांना पुण्यातल्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी तेलतुंबडे
यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र आपण कोणत्याही
बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही, असा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका
दाखल करुन त्यांच्या वरील प्रथम माहिती अहवाल - एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.
****
राज्यातल्या गावठाणांची मोजणी अधिक सोपी आणि अचूक
करण्यावर राज्य शासनानं भर दिला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
दिली. ते काल कोल्हापूर इथं बोलत होते. सध्या राज्यातल्या ४० हजार गावातल्या गावठाण
मोजणीचं काम ड्रोनच्या सहाय्यानं पूर्ण केलं जात असून, लोकांना प्रॉपर्टी कार्डाद्वारे
मालकी हक्क देण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. महसूल मधल्या
जाचक जून्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यावर शासनाचा भर असून, या कायद्यांमध्ये बदल
करण्याची भूमिका शासनानं स्विकारली असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
जालना
इथं आजपासून तीन दिवसीय अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाला सुरूवात होणार आहे. या प्रदर्शनात
शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं असून, शेतकऱ्यांना दुधाळ
जनावरांचं वाटप ही या प्रदर्शनात केलं जाणार आहे.
****
सातवं
मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पळसप इथं आयोजित करण्यात
आलं आहे. ग्रामीण कथाकार ललिता गादगे या संमेलनाच्या अध्यक्ष असणार आहेत. लातूरचं वसंतराव
काळे प्रतिष्ठान आणि पळसपचं किसान वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानं हे संमेलन आयोजित
करण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment