Tuesday, 19 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 पालकांनी हशतवादाच्या मार्गावर गेलेल्या युवकांना घरी परत बोलवावं, असं आवाहन लष्करानं काश्मीरमधील परिस्थितीच्या पार्श्र्वभूमीवर आज केलं. जे हातात बंदूक घेतील, त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही लष्करातर्फे देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथं गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शंभर तासात तो हल्ला करणाऱ्या जैश - ए - मोहम्मदच्या कमांडरला काल ठार मारण्यात आलं. लेफ्टनंट जनरल के. एस. धिल्लन यांनी आज  श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. पाकिस्तानमधील गुप्तचर संघटना ISI, जैश - ए- मोहम्मद संघटना चालवत असल्याचं धिल्लन यावेळी म्हणाले.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. तत्पूर्वी त्यांनी  डिझेल लोकोमोटीव कारख्यान्यात डीझेल मधून परावर्तित केलेल्या पहिल्या विद्युत रेल्वे इंजिनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. गुरु रविदास यांचं जन्मस्थळ असलेल्या वाराणसी मधल्या शीर गोवर्धनपूर इथं भेट देऊन पंतप्रधानांनी, त्यांना अभिवादन केलं. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये जन आरोग्य योजना -आयुष्मानच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान काही वेळात संवाद साधणार आहेत.

****



 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा उद्या नांदेड इथं आयोजित करण्यात आली आहे. या सभेला काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

****



 उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांच्या अटकेला दिलेल्या स्थगितीची मुदत राजस्थान उच्च न्यायालयानं वाढवली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयानं वाड्रा यांना दिले आहेत. वाड्रा यांच्याशी संबंधित एका कंपनी विरोधातल्या कथित आर्थिक गैरव्यवहारीच्या तक्रारी संदर्भात त्यांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी १५ मार्चला होणार आहे.

****



 रिझर्व्ह बँक, ३१ डिसेंबर २०१८ ला संपलेल्या सहामाहीसाठी २८ हजार कोटी रुपयांचा लाभांश केंद्र सरकारकडे हस्तांतरित करणार आहे. मर्यादित लेखापरीक्षण आढाव्याच्या आधारे, आणि सध्याच्या आर्थिक भांडवली चौकटीत हा निर्णय घेतला असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटलं आहे. बँकेच्या मंडळाच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

****



 छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु रविदास यांची जयंती आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी शिवाजी महाराज आणि गुरु रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

****



 बीड जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये उद्यापासून येत्या एक मार्चपर्यंत “दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान” राबवण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांगांना ओळखपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. इच्छूक दिव्यांग व्यक्तींनी वैद्यकीय प्रमाणपत्र, छायाचित्र आणि आवश्यक ती कागदपत्रं घेऊन यावीत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****



 पुण्यातील डीएसके गृहप्रकल्प उद्योगाचे प्रमुख दीपक कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, आणि मुलगा शिरीष यांच्याविरुद्ध कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागानं आरोपपत्र दाखल केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ३५० गुंतवणूकदारांची सुमारे २० कोटी रुपये फसवणूक गृह प्रकल्पाच्या माध्यमातून केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. डीएसकेच्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या शंभर कोटी रुपयांच्या सहा मालमत्ता पोलिसांनी यापूर्वीच जप्त केल्या आहेत.

****



 बल्गेरियात सोफिया इथं सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत, आज, पुरुष गटात भारताचा अमित पंघाल, तसंच महिला गटात निखात झरीन, मंजू राणी, आणि मीना कुमारी देवी यांच्या सुवर्णपदकासाठी लढती होतील. अंतिम सामन्यात अमितची गाठ कझाकस्तानच्या तोमिर्तास झुस्सुपोव्हशी पडणार आहे. निखातचा सामना फिलिपाईन्सच्या मँगो आयरिशशी, राणीचा मुकाबला फिलिपिन्सच्या जॅबुको जोसेशी, तर देवीची लढत फिलिपाईन्सच्याच विलेगास आयराशी होणार आहे.

*****

***

No comments: