आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.००
वाजता
****
मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण अध्यादेश २०१९
पुन्हा लागू करण्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. यानुसार तिहेरी तलाक
देणं हा आता गुन्हा असून, त्यासाठी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
****
सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल
अझीझ अल सौद आज दोन दिवसांच्या भेटीसाठी भारतात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. नंतर राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात
आलं. भारत आणि सौदी अरेबिया या देशांदरम्यान आज प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा होणार
असून, त्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज, ऊर्जा आणि पर्यावरण
या विषयावरच्या एका आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शनाचं, नवी दिल्लीमध्ये उद्घाटन
करणार आहेत. तीन दिवस चालणार असलेल्या या कार्यक्रमात सुमारे एक हजार भारतीय तसंच परदेशी
संशोधक आणि उद्योजक भाग घेणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री दक्षिण कोरियाच्या
दोन दिवसांच्या भेटीसाठी रवाना होत आहेत. दक्षिण कोरियाच्या प्रमुख नेत्यांशी ते या
भेटीत चर्चा करणार आहेत.
****
वस्तू आणि सेवा कर परिषदेची तेहतिसावी बैठक आज नवी
दिल्लीमध्ये होत आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली दृक श्राव्य
संवाद प्रणालीमार्फत बैठकीत सहभागी होणार आहेत. स्थावर मालमत्ता आणि लॉटरी संबंधित
जीएसटी दरांबाबतची चर्चा आजच्या कार्यसूचीत समाविष्ट आहे.
****
भारताच्या जम्मूकाश्मीरमधल्या पुलवामा इथे नुकत्याच
झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातल्या बहुतांश देशांनी निषेध केला असून, न्यूझीलंडच्या
संसदेमध्ये याबाबतचा निषेध प्रस्ताव मंजूर झाला आहे. फ्रान्स संयुक्त राष्ट्रसंघाच्या
सुरक्षा परिषदेसमोर जैश ए मोहंमदचा प्रमुख मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याची मागणी
करणार आहे.
****
प्रख्यात हिंदी साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक
नामवर सिंह यांचं काल दिल्लीत निधन झालं. ते ब्याण्णव वर्षांचे होते. १९७१ मध्ये त्यांना
साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment