Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 February
2019
Time 2.00 to 2.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ फेब्रुवारी
२०१९ दुपारी २.०० वा.
****
शेतकरी,
असंघटीत कामगार, लघू आणि मध्यम उद्योजक आणि वैयक्तिक करदात्यांसाठी अनेक उपाययोजना
असणारा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल
यांनी आज लोकसभेत सादर केला.
प्रधानमंत्री
किसान योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली. याअंतर्गत दोन हेक्टर अर्थात पाच
एकर पर्यंत भूधारकांना वार्षिक सहा हजार रुपये मदत देण्यात येणार असून, दोन हजार रुपयांच्या
तीन टप्प्यात ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होईल. पहिला हप्ता
मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, बारा कोटी शेतकरी कुटुंबांना
या योजनेचा थेट फायदा होईल. किसान क्रेडीट कार्डमार्फत पशूपालनासाठी कर्जाच्या व्याजावर
दोन टक्के सूट जाहीर करण्यात आली असून, या कर्जाच्या नियमित परतफेडीवर ३ टक्के अतिरिक्त
सूट मिळणार आहे.
असंघटीत
क्षेत्रातल्या कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जाहीर करण्यात आली असून,
अल्प अंशदानाच्या माध्यमातून या कामगारांना वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यावर दरमहा तीन
हजार रुपये वेतन मिळेल. यासाठी ५०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांसाठी
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, प्रमाणित वजावट
चाळीस हजार रुपयांवरून पन्नास हजार रुपये करण्यात आली आहे. टपाल तसंच बँकेतल्या जमा
रकमेवरच मिळणारं ४० हजार रुपयांपर्यंतचं व्याज करमुक्त करण्यात आलं आहे. घरभाडेपोटी
मिळणारं दोन लाख ४० हजार रुपये पर्यंत उत्पन्न करमुक्त तसंच दुसरं घरही पूर्णपणे करमुक्त
करण्यात आलं आहे.
पुढच्या
दहा वर्षांसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आली असून, भौतिक सुविधा, डिजिटल भारत,
प्रदूषण मुक्त भारत, ग्रामोद्योग विकास, स्वच्छ नद्या व पेयजल, मानवी अंतराळ मोहीम,
किनारपट्टी आणि जलमार्गांचा पूर्ण वापर, अन्न धान्य आत्मनिर्भरता, सुदृढ भारत, किमान
शासन कमाल प्रशासन, याद्वारे पुढच्या आठ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था दहा ट्रिलियन
डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे.
छोट्या
आणि मध्यम व्यावसायिकांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजात दोन टक्के सूट
देण्यात आली असून, घर खरेदीदारांचा वस्तू सेवा कराचा बोझा कमी करण्यासाठी मंत्रिगटाची
स्थापना करण्यात आली आहे.
भटके
विमुक्त विकासासाठी कल्याण मंडळ, गोवंश विकासासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोग, मत्स्य
व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग, पुढच्या पाच वर्षांत एक लाख खेड्यांचं डिजिटायझेशन, ग्रॅच्युईटीची
मर्यादा दहा लाख रुपयांवरून ३० लाख रुपये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के
वाढ, भविष्य निर्वाह निधी अंतर्गत मृत्यू विम्याची रक्कम अडीच लाख रुपयांवरून सहा लाख
रुपये, आदी तरतुदींचा या अंतरिम अर्थसंकल्पात समावेश आहे.
संरक्षण
क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद सुमारे तीन लाख कोटी रुपये करण्यात आली असून, शिक्षण,
आरोग्य, बालविकास, रेल्वे, अनुसूचित जाती जमाती विकास, आदी विभागांसाठीची तरतूदही मोठ्या
प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
इथं आयोजित पाचव्या महाॲग्रो कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांच्या हस्ते आज झालं. ‘पद्मश्री भंवरलाल जैन प्रयोगशील शेतकरी पुरस्कार’ एकूण १२
शेती गट, शेतकरी कंपनी यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आले. पैठण
रस्त्यावर महानुभाव आश्रमासमोर कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात आयोजित या चार दिवसीय
प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित २०० कंपन्यांचे स्टॉल, शेती बाजार, पीक प्रात्यक्षिकासह
चर्चासत्र आणि परिसंवाद होणार आहेत.
****
घरगुती
वापराच्या अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत एक रुपया ४६ पैशांनी कमी झाली आहे. विनाअनुदानित
स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ३० रुपये कमी करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून नवीन दर
लागू झाले.
****
पुण्यात
नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या विजेत्यांना राज्य सरकारनं
काल मुंबईत सन्मानित केलं. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सुवर्ण पदक विजेत्यांना
एक लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्य पदक विजेत्यांना ५० हजार रुपये
पारितोषिक दिलं. या स्पर्धेत महाराष्ट्रानं ८५ सुवर्ण पदकांसह एकूण २२७ पदकं जिंकून
अव्वल स्थान पटकावलं आहे.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता फेटाळून
लावली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
****
सार्वजनिक
क्षेत्रातल्या कमकुवत ११ बँकांपैकी बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएंटल बँक
ऑफ कॉमर्स या तीन बँकांवरचे कर्ज देण्यावरचे निर्बंध रिजर्व्ह बँकेनं हटवले आहेत. यामुळे
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कर्जपुरवठ्याच्या व्याप्तीत वाढ होणार आहे.
****
No comments:
Post a Comment