Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
जाती
धर्माच्याही पुढं जाऊन सर्व नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळायला हवा, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसी इथं आज गुरु रविदास यांच्या जन्मस्थळी विविध
विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. जातीभेद हा सामाजिक सौहार्दात येणारा
खूप मोठा अडथळा असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. गुरु रविदास यांनी दिलेल्या संदेशानुसारच
आपलं सरकार काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
जाती,
धर्म आणि संप्रदायाच्या आधारे कुणासोबतही भेदभाव होऊ नये, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या
नायडू यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्ली इथं १५ व्या राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती
आयोगाच्या १५ व्या स्थापना दिनानिमित्त ‘घटना आणि जाती जमाती’ या विषयावर ते बोलत होते.
देशाची संस्कृती समृद्ध असून त्याचं जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
****
सामान्य
जनतेला तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक सक्षम करण्यासाठी डिजिटल इंडिया ही योजना आणल्याचं,
माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ‘टेली
लॉ’ आणि ‘नया बंधू’ या मोबाईल ॲपचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. देशात डिजिटल
व्यवहाराचं प्रमाण वाढत असून, ६० टक्के व्यवहार हे ग्रामीण भागातून होत असल्याची माहीती
प्रसाद यांनी दिली.
****
शिवजयंतीनिमित्त
शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
उपस्थितीत आज जन्मसोहळा साजरा झाला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव
आढळराव पाटील यावेळी उपस्थित होते. विधान भवनात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधान
परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अभिवादन केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी उदय
चौधरी यांनी, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या
शिवाजी महाराजांच्या विविध पुतळ्यांवर हेलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली. जालना
शहरात गांधीचमन चौकातून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात
आली.
पुलवामा
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली,
मिरवणुका रद्द करुन केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.
****
स्वच्छता
आणि नागरिकांचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी वारकऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली
असल्याचं मत परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी
व्यक्त केलं आहे. परभणी इथं आज शिवजयंतीनिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कार्यक्रमात
ते बोलत होते. वारकऱ्यांनी भजन, किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ सुरु
ठेवावी, असं आवाहन पृथ्वीराज यांनी यावेळी केलं.
****
नांदेड
जिल्ह्याचा ऑक्टोबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीचा ६८ कोटी २२ लाख ३० हजार रुपयांच्या
पाणी टंचाई निवारण आराखड्यास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मंजुरी दिली आहे. आराखड्यानुसार
सद्यस्थितीत १८ टँकरद्वारे ११ गावं आणि १२ वाडी तांडयामध्ये पाणी पुरवठा करण्यात येत
आहे. तसंच १७६ विहिरी अधिग्रहणाद्वारे एक हजार ३५५ गावं आणि दहा वाडी तांड्यात पाणी
पुरवठा सुरु आहे. २८ नवीन विंधन विहिरी, पूरक नळ योजना आणि ७० विंधन विहिरींच्या दुरुस्तीलाही
या आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे.
****
मराठवाड्यात
तापमानात किंचित वाढ, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात किंचित
घट झाली आहे. औरंगाबाद आणि परभणी इथं सरासरी १५, बीड १६ पूर्णांक पाच, तर नांदेड इथं
१८ अंश सेल्सिअस तापमानाची आज नोंद झाली. पुढच्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
बाराव्या
इंडीयन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेतल्या पहिल्या १७ सामन्यांचं वेळापत्रक भारतीय
क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. स्पर्धेतली पहिली लढत २३ मार्च रोजी
गतविजेता सीएसके आणि आरसीबी संघांदरम्यान होणार आहे, तर सतरावी लढत आरसीबी आणि केकेआर
दरम्यान पाच एप्रिल रोजी बंगळुरू इथं होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर
ही स्पर्धा यंदा लवकर घेण्यात येत असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
//************//
No comments:
Post a Comment