Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 February 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २०
फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्या युवकांना घरी परत बोलवण्याचं
जम्मू काश्मीरमधल्या जनतेला लष्कराचं आवाहन
Ø शेतकऱ्यांना आर्थिक आणि जल सुरक्षा उपलब्ध करून
देण्यासाठी किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान- कुसुम योजनेला केंद्र सरकारची मंजुरी
Ø केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तीन टक्क्यांनी
वाढ करण्याचा निर्णय
Ø २५ कोटी रूपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर
स्टार्टअप उद्योगांना कर सवलत देण्याचा प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता
Ø राष्ट्रीय
जल पारितोषकांची घोषणा; लातूर जिल्हा नदी, जलसंधारण
श्रेणीत तर जलसाठ्यांचे पुनरुत्थान कामामध्ये बीड जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर,
आणि
Ø राज्यभरात विविध कार्यक्रम आणि मिरवणुकांनी शिवजयंती उत्साहात
साजरी
****
पालकांनी दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्या युवकांना
घरी परत बोलवावं, असं आवाहन लष्करानं काश्मीरमधील परिस्थितीच्या पार्श्र्वभूमीवर काल
केलं. जे हातात बंदूक घेतील, त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही लष्करातर्फे
देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथं गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी
हल्ल्यानंतर शंभर तासात तो हल्ला करणाऱ्या जैश - ए - मोहम्मदच्या कमांडरला ठार करण्यात
आलं आहे. लेफ्टनंट जनरल के. एस. धिल्लन यांनी काल श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत
या कारवाईची माहिती दिली. पाकिस्तान मधील गुप्तचर संघटना आएसआय, जैश-ए-मोहम्मद संघटना
चालवत असल्याचं धिल्लन यावेळी म्हणाले.
****
शेतकऱ्यांना
आर्थिक आणि जल सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान
महाभियान- कुसुम योजना सुरू करण्यास आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रीमंडळाच्या
समितीनं काल मंजुरी दिली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी
सांगितलं. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या योजने अंतर्गत
सौर ऊर्जेवर चालणारे साडे सतरा लाखाहुन अधिक कृषि पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून
दिले जातील. या योजनेमुळे स्वयंरोजगाराच्या संधीत वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक
धोरण २०१९ला काल मंजुरी दिली. या धोरणामध्ये भारताला इलेक्ट्रॉनिक प्रणालीचे
डिजाइन आणि उत्पादनाचं प्रमुख केन्द्र बनवण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेकरता भारतीय उद्योगांना अनुकूल वातावरण
निर्माण होण्यास मदत होईल, असं ते म्हणाले.
केंद्रीय
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णयही काल केंद्रीय मंत्रीमंडळानं घेतला आहे. यामुळे सरकारी
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ९ टक्क्यावरून १२ टक्के एवढा झाला आहे. हा वाढीव भत्ता
१ जानेवारी २०१९ पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार आहे. या निर्णयाचा लाभ निवृत्त
वेतन धारकांनाही होणार आहे.
****
उदयोन्मुख उद्योगांना करसवलतीचा फायदा घेता यावा याकरता केंद्र
सरकानं काल स्टार्टअपच्या व्याख्येत बदल केले. आता २५ कोटी रूपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर
स्टार्टअप उद्योगांना कर सवलत मिळू शकेल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश
प्रभू यांनी याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही सवलत मिळवण्यासाठी स्टार्टअप उद्योगांना
उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाकडं अर्ज करावा लागेल. यापूर्वी १० कोटी रूपयांपर्यंतच्या
गुंतवणुकीवर सात वर्षांसाठी कर सवलत उपलब्ध होती, ती आता २५ कोटी रूपयांपर्यंतच्या
गुंतवणुकीवर १० वर्षांसाठी उपलब्ध राहील.
****
केंद्र सरकारच्या
जल संसाधन, नदी विकास मंत्रालयानं
काल २०१८ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय
जल पारितोषकांची घोषणा केली. यात लातूर जिल्ह्याला
नदी, जलसंधारण श्रेणीत प्रथम पुरस्कार मिळाला असून बीड जिल्ह्यानं जलसाठ्यांचे पुनरुत्थान
कामामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या
जाऊ इथल्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेला जलसंधारणाच्या कामात सर्वोत्तम शाळा पुरस्कार
जाहीर झाला आहे. येत्या २५ तारखेला नवी दिल्ली इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यभरात काल शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. विविध
कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी झाली. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला. यावेळी ग्रामविकास
मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
होते. विधान भवनातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे
नाईक-निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी इतर मान्यवर, अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिवाजी महाराजांच्या विविध पुतळ्यांवर
हेलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या मिरवणुका काढण्यात आल्या. जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद,
लातूर, हिंगोली जिल्ह्यातही शिवजयंती निमित्त मिरवणुकांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं होतं.
****
स्वच्छता आणि नागरिकांचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी
वारकऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मत परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं काल शिव जयंतीनिमित्त
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वारकऱ्यांनी भजन, किर्तन,
प्रवचनाच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ सुरु ठेवावी, असं आवाहन पृथ्वीराज यांनी यावेळी
केलं.
****
गुरू रविदास यांची जयंतीही काल ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांनी
साजरी करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्याच्या ६८ कोटी २२ लाख ३० हजार रुपयांच्या
पाणी टंचाई निवारण आराखड्यास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मंजुरी दिली आहे. आराखड्यानुसार सद्यस्थितीत १८ टँकरद्वारे
११ गावं आणि १२ वाडी तांड्यामध्ये पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसंच १७६ विहिर अधिग्रहणाद्वारे
१३५५ गावं आणि दहा वाडी तांड्यात पाणी पुरवठा सुरु आहे. २८ नवीन विंधन विहिरी, पूरक
नळ योजना आणि ७० विंधन विहिरींच्या दुरुस्तीलाही या आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराला आजपासून
नांदेडमधून सुरूवात होत आहे. या सभेला काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आजपासून
येत्या एक मार्चपर्यंत “दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान” राबवण्यात येत आहे. यामध्ये
दिव्यांगांना ओळखपत्रांचं वाटप केलं जाणार आहे. इच्छूक दिव्यांग व्यक्तींनी वैद्यकीय
प्रमाणपत्र, छायाचित्र आणि आवश्यक ती कागदपत्रं घेऊन यावीत, असं आवाहन प्रशासनानं केलं
आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज आणि
उद्या प्राध्यापक वा.ल. कुलकर्णी तसंच प्राध्यापक नरहर कुरूंदकर व्याखानमालेचं आयोजन
करण्यात आलं आहे. प्राध्यापक वा.ल. कुलकर्णी व्याख्यान मालेत आज ज्येष्ठ कवी वसंत डहाके
हे ‘कविता समजून घेतांना’ या विषयावर व्याख्यान देतील. तर, उद्या प्राध्यापक नरहर कुरूंदकर
व्याख्यानमालेत समीक्षक नीतीन रिंढे हे ‘जागतिक कादंबरीच्या नव्या दिशा’ या विषयावर
व्याख्यान देणार आहेत.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
आणि सोयगाव इथल्या अंजिठा शिक्षण संस्थेच्यावतीनं ‘भारतातील जातीय आधारावर आरक्षणाची
मागणी -सामाजिक आणि राजकीय विश्लेषण’ याविषयावर
आज राष्ट्रीय परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात होणाऱ्या या परिसंवादात नवी दिल्ली इथल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले
डॉ. बी. एस. वाघमारे, डॉ. राजेश करपे यांच्यासह इतर अभ्यासक आपली भूमिका मांडणार आहेत.
****
अल्पसंख्याक समाजाच्या
विकासाकरीता असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळावा
याकरीता सर्व संबंधित विभागांनी या योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे
उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी दिल्या आहेत. ते काल हिंगोली इथं जिल्हा नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
काश्मिरी दहशतवाद आणि देशातला शहरी
नक्षलवाद संपवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याची गरज असल्याचं मत विवेक विचार मंचचं
राज्य समन्वयक सागर शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळाच्या
वतीनं ‘कश्मिरी दहशतवाद, शहरी नक्षलवाद, समस्या आणि उपाय’ या विषयावर आयोजित
विशेष व्याख्यानात बोलत होते. दहशतवादी आणि नक्षलवादी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं
काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या वीर सैनिकांच्या
माता आणि पत्नींचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
*****
***
No comments:
Post a Comment