आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ मार्च २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
राष्ट्रपति रामनाथ कोविंद आज क्रोएशिया,
बोलिव्हिया आणि चिली या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. क्रोएशियाचे राष्ट्रपति आणि पंतप्रधान
यांची ते भेट घेणार असून द्वी-पक्षीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करतील असं परराष्ट्र
व्यवहार मंत्रालयाचे सचिव विजय ठाकूर सिंह यांनी म्हटलं आहे. क्रोएशियात विविध क्षेत्रांमध्ये
गुंतवणुकीला आणखी वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती कोविंद यांचा हा पहिलाच
क्रोएशिया दौरा आहे. बोलिव्हियामध्ये ते तिथल्या राष्ट्रपतींशी थेट तसंच प्रतिनिधी
मंडळ स्तरीय चर्चा करतील. भारत-बोलिव्हिया व्यापार मंचाच्या बैठकीतही राष्ट्रपती सहभागी
होतील आणि विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती
३० मार्चला चिलीला पोहचतील. चिलीच्या राष्ट्रपतींची भेट घेऊन परस्पर हिताच्या विविध
मुद्द्यांवर ते चर्चा करतील.
****
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज अहमदनगर जिल्हा
दौऱ्यावर येत आहेत. राहाता तालुक्यात लोणी इथल्या प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
या अभिमत विद्यापीठाचा १३ वा पदवी प्रदान समारंभ उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज होत
आहे. प्रवरा ग्रामीण रूग्णालय अणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटनही
नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या
स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काल झालेल्या मतदानाची आज मोजणी केली जाणार आहे. पालघर
नगर पालिका, तसंच बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार आणि सिंदखेड राजा नगर परिषदेसाठी काल
मतदान शांततेत
पार पडलं. याशिवाय वाशिम, वर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याच्या काही भागात काल ग्रामपंचायत
निवडणुकीसाठीही मतदान झालं.
****
पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी
नामांकन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसह ९१ मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. या पहिल्या
टप्प्यात राज्यातल्या वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर,
चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. येत्या गुरुवारपर्यंत
उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आज अखेरच्या
दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
****
मुंबईतल्या निवडणुकांसाठी अमरावतीहून
रेल्वेने नेली जात असलेली ४३ लाख ७६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि सात लाख ६१ हजार
४४६ रुपयांचे दागिने काल पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात
आलं आहे. नागपूर-मुंबई विदर्भ एक्सप्रेस रेल्वेमध्ये रेल्वे पोलीस दलाच्या गस्ती पथकानं
ही कारवाई केली.
****
नवी मुंबईतल्या तुर्भे परिसरातल्या एका गोदामात, पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापा मारुन, सत्तर लाख रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे.
याप्रकरणी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
****
जम्मू काश्मीर इथं सुरक्षा दलानं जैश - ए- मोहम्मद
या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली. बारामूला इथल्या लवायपोरा इथून
अटक करण्यात आली असल्याचं सुरक्षा दलानं सांगितलं. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या
प्रमाणात स्फोटक आणि शस्त्रास्त्रं जप्त केली आहे.
****
लातूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या
अनुषंगानं काल भारतीय जनता पक्षातर्फे बुथ
प्रमुखांसह कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. अहमदपूर-चाकूर आणि लोहा-कंधार या दोन मतदारसंघात
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांसह आमदार विनायकराव पाटील, आमदार प्रताप पाटील-चिखलीकर
यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित
होते.
****
हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता बॅलेट युनिट,
कंट्रोल युनिट आणि प्रथमच व्हीव्हीपॅट या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक
आयोगाच्या सूचनेनुसार, काल विधानसभा मतदार संघनिहाय, मतदान केंद्रांनुसार या ईव्हीएम
मॅनेजमेंट प्रणालीची माहिती, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
****
औरंगाबाद
इथल्या श्री एकनाथ संशोधन संस्थेच्या वतीनं, आजपासून नाथषष्ठी महोत्सवाचं आयोजन करण्यात
आलं आहे. राधा मुरलीधर प्रतिष्ठानच्या सहकार्यानं आयोजित या महोत्सवात, विविध विषयांवर
प्रवचन, श्री मुकुंदाचार्य निलंगेकर पुरस्कार वितरण, आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं आहे. औरंगाबाद शहरातल्या समर्थ राम मंदिरात आयोजित या महोत्सवाचा येत्या २९ तारखेला
समारोप होईल.
*****
***
No comments:
Post a Comment