Monday, 25 March 2019

Tex- AIR News Bulletin Aurangabad 25.03.2019.......18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 March 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मार्च २०१९ सायंकाळी ६.००

****

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज विदर्भातल्या सात मतदार संघातून आज अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

नागपूरमधून भाजप शिवसेना युतीचे नीतीन गडकरी यांनी, तर रामटेकमकधून कृपाल तुमाने यांनी अर्ज दाखल केला. यवतमाळ - वाशिम मतदार संघातून शिवसेना भाजप युतीच्या खासदार भावना गवळी यांनी, तर प्रहार पक्षाकडून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या वैशाली येडे यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून भाजप नेते निवृत्त उपायुक्त पी बी आडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेना भाजप युतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी अर्ज भरला, वंचित बहुजन आघाडीकडून गुणवंत देवपारे यांनी, तर बहुजन समाज पार्टीचे अरुण वानखेडे यांच्यासह एकूण तेरा उमेदवारांनी आज अमरावती मतदार संघातून अर्ज दाखल केले.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून आज सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार एक, शिवसेना भाजप युतीचे प्रतापराव जाधव यांनी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्येकी चार अर्ज दाखल केले. यासह तीन अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे.

अकोला लोकसभा मतदार संघातून भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांनी तर भाजप शिवसेना युतीचे हंसराज अहीर यांनी चंद्रपूर मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यात इतरही अनेक ठिकाणी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रं दाखल केली. सोलापूर मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांनी अर्ज भरला.

नांदेड मतदार संघातून प्रदेश कांग्रेस अध्‍यक्ष अशोक चव्‍हाण तसंच शिवसेना भाजप युतीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

लातूर लोकसभा मतदारसंघातून आज चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजप शिवसेना युतीचे सुधाकर श्रृंगारे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के, बहुजन समाज पार्टीचे सिद्धार्थ कुमार दिगंबर सूर्यवंशी, आणि अपक्ष उमेदवार रमेश निवृत्ती कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे राणा जगजितसिंह पाटील, वंचित बहुजन आघाडी चे अर्जुन सलगर यांच्यासह सह एकूण आठ जणांनी आज उस्मानाबाद इथं उमेदवारी अर्ज दाखल केले.



परभणी लोकसभा मतदार संघातून शिवसेना भाजप युतीचे संजय जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान, यांच्यासह दहा जणांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.



बीड इथं, भाजप शिवसेना युतीच्या प्रीतम मुंडे यांनी तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं वृत्त आहे. 

****

कॉंग्रेस पक्ष सत्त्तेत आल्यास गरीब वर्गातल्या २० टक्के कुटुंबांना किमान उत्पन्न म्हणून दरवर्षी प्रत्येकी ७२ हजार रुपये देईल, असं आश्वासनं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. आज नवी दिल्ली इथं कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या योजनेतून थेट पाच कोटी कुटुंबांना फायदा होईल, असा दावा त्यांनी केला. पक्षानं अनेक अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही योजना तयार केली असून, ही जगातली सर्वात मोठी किमान उत्पन्न योजना असेल, असंही गांधी म्हणाले.

****

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव तसंच प्रतीक यादव यांच्या, उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्या प्रकरणातला अहवाल सादर करण्याबाबत, सर्वोच्च न्यायालयानं, केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयला नोटीस बजावली आहे. या प्रकरणतल्या चौकशीच्या सद्यस्थितीबाबत दोन आठवड्यात माहिती देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

****

पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे २१ नगरसेवक विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि पाच अपक्ष उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्षपदी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी-बहुजन विकास आघाडीच्या  डॉ. उज्ज्वला काळे विजयी झाल्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीन...