Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात ६०
पूर्णांक ४६ टक्के मतदान; किरकोळ
अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत
** तीन हजार २३७"उमेदवारांचं
राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद, मराठवाड्यात मतदान केंद्र बंद पडल्याच्या २९ तक्रारी
** औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात राजकीय
कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवळलं
आणि
** दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा
कसोटी क्रिकेट सामनाही जिंकण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल
****
विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यभरात ६०
पूर्णांक ४६ टक्के मतदान झालं. किरकोळ
अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. २८८ जागांसाठी निवडणूक रिंगणात
असलेल्या "तीन हजार २३७"उमेदवारांचं
राजकीय भवितव्य काल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झालं. मतमोजणी परवा गुरुवारी २४
तारखेला होणार आहे.
मराठवाड्यातल्या ४६ मतदार संघात काल सरासरी
६५ पूर्णांक ८० टक्के मतदानाची नोंद झाली. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण
भागात मतदानाचं प्रमाण अधिक राहिलं. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व
आणि औरंगाबाद पश्चिम या तीन शहरी मतदार संघांच्या तुलनेत पैठण, सिल्लोड, कन्नड आणि
फुलंब्री या ग्रामीण भागात मतदानाचं प्रमाण अधिक दिसून आलं. औरंगाबाद जिल्ह्यात ६५
पूर्णांक सहा टक्के मतदान
झालं. जालना सदूसष्ठ पूर्णांक शून्य नऊ टक्के, बीड ६८ पूर्णांक तीन, परभणी सदूसष्ठ
पूर्णांक ४१, हिंगोली ६८ पूर्णांक सदूसष्ठ, लातूर ६१ पूर्णांक ७७, नांदेड ६५ पूर्णांक
४०, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ६२ पूर्णांक २१ टक्के मतदान नोंदवलं गेलं.
पावसाळी वातावरणाचाही मतदानावर परिणाम
झाला. सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं तेव्हा उस्मानाबाद, बीड, लातूर, तसंच नांदेड
जिल्ह्यात अनेक भागात पाऊस सुरू होता, त्यामुळे या चारही जिल्ह्यात सकाळच्या सत्रात
मतदान संथगतीने सुरू होतं, उस्मानाबाद मतदार संघात सकाळी नऊ वाजेपर्यंत फक्त अडीच टक्के
मतदान झालं होतं. मात्र अकरा वाजेनंतर जवळपास सगळीकडचाच पाऊस थांबला, आणि मतदार मतदानासाठी
घराबाहेर पडल्याचं पहायला मिळालं.
दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनानं मोफत
वाहनांची व्यवस्था केली होती, तर ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी
स्काऊट गाईर्डच्या विद्यार्थ्यांनी मदत केली.
****
मराठवाड्यात मतदान केंद्र बंद पडल्याच्या
जवळपास २९ तक्रारी आल्या, तांत्रिक बिघाडामुळे या सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया काही
काळ थांबली होती. नांदेड उत्तर मतदारसंघात व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडलं होतं. नवीन यंत्र
लावण्यात आल्यावर सुमारे एक तास उशीरा मतदान सुरु झालं.
हिंगोली जिल्ह्यात मतदान यंत्रात बिघाड
झाल्याच्या चार तक्रारी आल्या. वसमत मतदार संघात परळी दशरे, कळमनुरी शहरातल्या महात्मा
ज्योतिबा फुले मतदान केंद्र, सेनगाव तालुक्यात सापडगाव आणि बाभुळगाव इथे मतदान यंत्र
बंद पडल्याच्या तक्रारी आल्या.
जालना जिल्ह्यात घनसावंगी मतदार संघातल्या
शिवणगाव इथं एका केंद्रावर मतदान यंत्र दीड तास बंद पडलं होतं.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातही व्ही व्ही
पॅट यंत्र बंद पडल्याच्या तेरा तक्रारी आल्या, मात्र या सर्वच ठिकाणी किरकोळ दुरुस्ती
किंवा यंत्र बदलल्यावर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झालं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी मतदार संघात
सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत मतदान सुरू होतं, याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे
वार्ताहर…..
घनसावंगी भोकरदन मतदार संघातल्या
काही केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया तास भर थांबविण्यात
आली होती. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव इथं बुथ क्रमांक २७६ मतदानाची वेळ
संपली तरी केंद्रावर मतदारांच्या रांगा असल्यामुळे मतदान प्रक्रिया सायंकाळी साडेसात
वाजेपर्यंत सुरू राहिली जिल्ह्यात सरासरीच्या ६४% मतदानाची नोंद झाली.
– आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब मस्के जालना
****
नांदेड जिल्ह्यात रामवाडी, चिंचगाव आणि
ड्रीमवाडी या तीन गावातले सुमारे ६५० मतदार पुरात अडकल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले.
याबाबत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून …..
मुखेड तालुक्यात परवा मुसळधार
पाऊस झाला. या पावसामुळे पेरू आणि लेंडी नद्यांना पूर आले होते या पुरामुळे रामगिरी
चिंचगव्हाण आणि ड्रीमवाडी या तीन गावातील ६०० ते सुमारे ६५० मतदारांना मतदान करता आले
नाही ते दिवसभर पुरात अडकले होते ते मतदान
केंद्रापर्यंत येऊ शकले नाहीत.
– आनंद कल्याणकर आकाशवाणी वार्ताहर
नादेंड
****
बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघातही भीम
नाईक तांड्यावरचे सुमारे पासष्ट मतदार, नदीला पूर आल्याने अडकून पडले होते. मात्र वडवणीच्या
तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या निर्देशानंतर या मतदारांसाठी होडीची व्यवस्था करण्यात
आली, त्यामुळे या मतदारांना मतदान करता आलं. तत्काळ कार्यवाही करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं
बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी अभिनंदन केलं आहे.
****
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात सावंगी
इथल्या मतदान केंद्रावर तृतीयपंथी मतदारांनी रांगेत उभे राहून मतदान केलं. मतदानानंतर
प्रतिक्रिया देताना, गौरी या तृतीयपंथी मतदारानं नांदेड शहरातल्या सर्व तृतीयपंथीयांची
नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावीत तसंच त्यांना घर, शिधापत्रिका, मोफत आरोग्य तपासणी
आदी सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या
करवाडी इथल्या ग्रामस्थांनी करवाडी ते नांदापूर रस्त्याच्या मागणीसाठी विधानसभा निवडणुकीच्या
मतदानावर बहिष्कार टाकला. सुमारे पावणे दोनशे लोकसंख्येच्या या गावाने यापूर्वीही पंचायत
समिती, जिल्हा परिषद तसंच लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला होता, रस्ता
होईपर्यंत मतदानावर बहिष्कार घालत असल्याचं निवेदन ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलं होतं,
मात्र प्रशासनानं यापूर्वीही दखल घेतली नव्हती, कालही प्रशासनानं आपली दखल घेतली नसल्याचं,
इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मराठवाड्यात काही ठिकाणी मतदानादरम्यान
राजकीय कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारीच्या घटना घडल्या. मात्र पोलिसांनी
वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. औरंगाबाद मध्य मतदार संघात राष्ट्रवादी
काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार कदीर मौलाना आणि एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात धक्काबुक्की झाली. दोन्ही नेत्यांचे
कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं, पोलिसांना लाठीमार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावं
लागलं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास उमेदवार कदीर मौलाना, अज्जू पैलवान आणि ओसामा कदीर मुल्ला यांना अटक करण्यात आली.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदार संघात
जामखेड इथं मतदान प्रतिनिधीला बोलण्याच्या कारणांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा
कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. यामध्ये तीन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
नांदेड दक्षिण मतदार संघात माजी नगरसेवक
ईश्वर येमूल यांना अज्ञात लोकांनी मारहाण केली. तर देगलूर विधानसभा मतदार संघात वंचित
बहुजन आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार
आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातल्या रोहिपिंपळगाव इथंही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली, त्यामुळे मतदान काही काळ बंद पडलं होतं.
बीड मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीचे
उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे
उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांत वाहनांमध्ये भरून मतदार आणल्यावरून
किरकोळ वाद झाला. पोलिस तसंच दोन्ही उमेदवारांनी घटनास्थळी निर्माण झालेला तणाव दूर
केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
अहमदनगर विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण
पथकाने काल ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शहरात वसंत टेकडी भागात वाहनांच्या तपासणी
दरम्यान एका वाहनात दोन खोक्यांमध्ये सुमारे दीड किलो सोनं तर जवळपास सात किलो चांदी,
आणि दहा भेटवस्तू आढळल्या. हा मुद्देमाल जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्याचं
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळवलं आहे
****
संसदेचं हिवाळी
अधिवेशन येत्या अठरा नोव्हेंबरपासून सुरु होणार असून, ते तेरा डिसेंबरपर्यंत
चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्रालयानं काल ही माहिती दिली.
****
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी क्रिकेट सामनाही
जिंकण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू आहे. रांची इथं सुरू असलेल्या या सामन्यात
तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात आठ बाद १३२ धावा झाल्या आहेत. पहिल्या
डावात दोन बाद नऊ धावांवर पुढं खेळण्यास सुरुवात केल्यानंतर पाहुण्यांचा संघ केवळ १६२
धावांत गारद झाला, त्यानंतर भारतानं पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला. भारतीय संघानं पहिला
डाव नऊ बाद ४९७ धावांवर घोषित केलेला आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं या
आधीच दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी येत्या २७ ऑक्टोबरला-रविवारी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या
कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा
नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment