Friday, 25 October 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 25.10.2019....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑक्टोबर २०१सकाळी ७.१० मि.
****
·      राज्य विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत; भाजपला १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ तर काँग्रेसला ४४ जागा. वंचित बहुजन आघाडीला एकही जागा नाही.
·      सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील विजयी, उदयन राजे भोसले यांचा पराभव
·      विद्यमान सात मंत्री निवडणूक हरले; भाजपच्या पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे, तर शिवसनेचे जयदत्त क्षीरसागर आणि अर्जुन खोतकर यांचा समावेश.
·      भारतीय जनता पक्षाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून अभिनंदन.
आणि
·      दिवाळीच्या सणाला आजपासून सुरुवात.
****
राज्य विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकूण २८८ जागांपैकी भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ अशा एकूण १६१ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या दोन जागा वाढल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ जागांमध्ये वाढ झाली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला तीन, एमआयएम, प्रहार जनशक्ती पार्टी आणि समाजवादी पक्ष यांना प्रत्येकी दोन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, जनसूर्या शक्ती, क्रांतीकारी शेतकरी पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी पक्षाला एक जागा मिळाली आहे. अपक्ष १३ जागांवर निवडून आले आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळाली नाही.

सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत पक्षांतर करुन भारतीय जनता पक्षात गेलेले उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील यांनी ८५ हजार ८६९ मतांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला.

भाजपच्या विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, बबनराव लोणीकर, विजयकुमार गावित, डॉ.अशोक उईके, संभाजी पाटील निलंगेकर, काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, नाना पटोले, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विश्वजित कदम, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा समावेश आहे.
****
मावळत्या सरकारमधले सात मंत्री पराभूत झाले. यामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे, बाळा भेगडे, डॉ. अनिल बोंडे, डॉ. परिणय फुके, तर शिवसनेचे जयदत्त क्षीरसागर, विजय शिवतारे आणि अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे. पक्षांतर करून आलेल्या १७ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये हर्षवर्धन पाटील, जयदत्त क्षीरसागर, वैभव पिचड, निर्मला गावित, दिलीप सोपल, दिलीप माने, भाऊसाहेब कांबळे, गोपीचंद पडळकर, आणि उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे.
पक्षांतरानंतर विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, भास्कर जाधव, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, नितेश राणे, राणा जगजीतसिंह पाटील, गणेश नाईक, नमिता मुंदडा आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.
****
मराठवाड्यातल्या एकूण ४६ विधानसभा मतदारसंघातून भाजपनं १६, शिवसेनेनं १३, काँग्रेसनं ११, राष्ट्रवादी काँग्रेसनं चार, तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. 

औरंगाबाद मध्यल्या नऊ विधानसभा मतदार संघापैकी सहा मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीच्या विद्यमान आमदारांना जनतेनं पुन्हा संधी दिली आहे.
सिल्लोड, पैठण, वैजापूर, कन्नड, औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम या सहा मतदार संघातून शिवसेनेचे अनुक्रमे अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, रमेश बोरणारे, उदयसिंग राजपूत, प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट विजयी झाले. फुलंब्री, गंगापूर आणि औरंगाबाद पूर्व मतदार संघातून भाजपचे अनुक्रमे हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब आणि अतुल सावे विजयी झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या पाच मतदारसंघात भाजपनं तीन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. 
जालना मतदारसंघातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जून खोतकर यांचा २४ हजारांवर मतांनी पराभव केला. भोकरदन मधून भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे, परतूरमधून भाजपचे बबनराव लोणीकर, बदनापूर मधून भाजपचे नारायण कुचे आणि घनसावंगी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांनी विजय मिळवला.

लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदार संघापैकी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला. लातूर शहरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख, लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख, अहमदपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा मधून भाजपचे अरविंद भातांबरे आणि औसा मतदार संघातून भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले आहेत.
लातूर ग्रामीण मतदारसंघात ‘नोटा’ अर्थात ‘वरीलपैकी कोणी नाही’ या पर्यायाला राज्यात सर्वाधिक २७ हजार ३२७ मतं मिळाली आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं चार, तर भाजपनं दोन जागांवर विजय मिळवला. बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर या दोन विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

परळीत भाऊ धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंचा पराभव केलाय. तर बीडमध्ये पुतण्या संदीप क्षीरसागरने काका जयदत्त क्षीरसागरांना अस्मान दाखवले. आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब अजबे, माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच प्रकाश सोळंके यांचा विजय झालाय. तर केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा निवडून आल्या आहेत. तर गेवराईत लक्ष्मण पवार यांचा निसटता विजय आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी शशी केवडकर, बीड.

परभणी जिल्ह्यातल्या चार मतदार संघापैकी परभणीतून शिवसेनेचे डॉ.राहुल पाटील, गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, पाथरीतून कॉंग्रेसचे सुरेश वरपुडकर तर जिंतूर मतदार संघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर विजयी झाल्या.

हिंगोली जिल्ह्यात दोन विद्यमान आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघापैकी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे हिंगोलीचे वार्ताहर रमेश कदम –

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ.संतोष तारफे यांचा दारूण पराभव झाला असून, शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले आहेत. वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजु नवघरे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा यांना केवळ ४० हजार ९७१ मते पडली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात चार जागा काँग्रेस पक्षानं जिंकल्या असून, भाजपनं तीन तर शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. भोकरमधून कॉंग्रेसचे अशोक चव्हाण, हदगावमधून कॉंग्रेसचे माधवराव पवार, नांदेड दक्षिण मधून काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे, देगलूरमधून काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर, नायगावमधून भाजपचे राजेश पवार, मुखेडमधून भाजपचे तुषार राठोड, किनवट मधून भाजपचे भीमराव केराम, लोहा मधून शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर विजयी झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. जिल्ह्यातल्या तीन ठिकाणी शिवसेना, तर एका ठिकाणी भाजपचे उमेदवारांनी विजय मिळवला. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल पाच वेळा विजयी झालेले राज्याचे ज्येष्ठ माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीत निवडणुकीपूर्वी प्रवेश केलेल्या राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी पराभूत केलं आहे. तर परांड्यात जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत यांनी राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी काँग्रेसच्या दिलीप भालेराव यांना पराभूत केलंय. तर उस्मानाबादेत शिवसेनेच्या कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय निंबाळकरांचा पराभव केला आहे.
देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
हरियाणा विधानसभेचे निकालही काल जाहीर झाले. नव्वद जागांच्या या विधानसभेत भाजप चाळीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर काँग्रेसनं ३१ जागांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे.
या दोन्ही राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काल नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात काल झालेल्या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप शिवसेना महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे.
सत्तेचा उन्माद आलेल्या लोकांना जनतेनं जागा दाखवली, हेच निवडणूक निकालातून समोर आलं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांना जनतेने स्वीकारलं नाही, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रात महायुतीच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत. महायुतीला बंडखोरीचा फटका बसल्यामुळे विरोधी पक्षाच्या काही जागा वाढल्या असल्या तरी, प्रबळ विरोधी पक्ष होईल, इतक्या जागा वाढल्या नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

हा जनादेश सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडणारा असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं ठाकरे म्हणाले.
****
दिवाळीला आजपासून सुरुवात होत आहे. सवत्स धेनू अर्थात गाय गोऱ्ह्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण वसुबारस आणि आरोग्य देवता धन्वंतरी पूजनाचा सण धनत्रयोदशी आज साजरे होत आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गृह सजावट, कपडे, फराळाचे जिन्नस तसंच फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत काल गर्दी दिसून आली.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...