Wednesday, 23 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.10.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
जालन्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला असून, अकरा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर आला असून, नदीवरचा रामतीर्थ बंधारा ओसंडून वाहत आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातही सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली.

या पावसामुळे लातूर जिल्ह्यात मांजरा धरणाचा पाणीसाठा १५ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. नागझरीसह दहा बंधाऱ्यांमध्ये जलसाठा वाढला आहे. त्यामुळे लातूर शहराचा पाणी प्रश्न काही अंशी सुटला आहे.

सांगली जिल्ह्यात माणगंगा, अग्रणी नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे.या दोन्ही नद्यांना गेल्या पन्नास वर्षात प्रथमच एवढा मोठा पूर आला असून आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ, जत  तालुक्यातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहे. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे उभ्या पीकांना धोका निर्माण झाला आहे. राजेवाडी तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला असून आटपाडी तालुक्याचा पाणीप्रश्न काही अंशी सुटला आहे.
सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात पुणे - पंढरपूर रस्त्यावर वीडणीजवळ पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे सहा तास वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात दिवाळीतही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   
****
सोलापूर जिल्ह्यात बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावर शेंदरी गावालगत भरधाव वेगानं येणाऱ्या बोलेरो गाडीनं दुचाकीला जोरात धडक देऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. मृत तिघं जण इंदापूर तालुक्यातले आहेत.
****
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील.
****


No comments: