Friday, 25 October 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 25.10.2019....Headline Bulletin


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
दिनांक – २५ ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
दिवाळीच्या सणाला आज वसुबारस आणि धनत्रयोदशीने सुरूवात होत आहे. सवत्स धेनू अर्थात गाय आणि गोऱ्ह्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा वसुबारस आणि आरोग्यदेवता धन्वंतरी पूजनाचा आजचा दिवस. आज सायंकाळी यमदीपदान करण्याचा प्रघात आहे. आदिवासी समाजात आजचा दिवस वाघबारस म्हणूनही साजरा केला जातो. वर्षभरात केलेले नवस फेडण्यासाठी आदिवासी बांधव आजच्या दिवशी वेशीवरच्या वाघाच्या मंदिरात जमा होतात. जंगलातल्या हिंस्र प्राण्यांपासून पाळीव प्राण्यांचं गाई - गुरांचं रक्षण व्हावं यासाठी वाघाला तांदळाच्या खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आदिवासी बांधवांनी आजही जपली आहे.
****
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टी भागाला बसला आहे. आज सकाळी मालवण, देवबाग, आचरा तसंच अन्य समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर उधाणाचं पाणी थेट वस्तीत घुसलं असून देवबागमध्ये घरांना पाण्यानं वेढा घातला आहे. जामडूल बेटावरच्या विहिरी पाण्याखाली गेल्यानं पिण्याच्या पाण्याच्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जिल्ह्यात कालपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भातशेतीचं नुकसान झालं असून अनेक घरांना फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कोकण आणि पुणे विभागात आज तसंच येत्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणात २१ हजार ७६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. धरणाचे १६ दरवाजे दीड फुटांनी उघडण्यात आले आहेत. धरणातून २७ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा रविवारी सकाळी ११ वाजता, देश विदेशातल्या जनतेशी मन की बातच्या माध्यमातून संवाद साधतील. आकाशवाणीच्या कार्यक्रम श्रृंखलेचा हा ५८ वा भाग आहे.
****

No comments: