Friday, 25 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****
राज्य विधानसभेच्या निवडणुकीत यंदा २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या विधानसभेच्या तुलनेत ही संख्या दोनने अधिक आहे. विधानसभेच्या एकूण तीन हजार दोनशे सदतीस उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या दोनशे पस्तीस एवढी होती. निवडून आलेल्या २४ महिला आमदारांपैकी पन्नास टक्के महिला आमदार प्रथमच सदनात दाखल होणार आहेत. भाजपने सतरा महिलांना उमेदवारी दिली होती, त्यापैकी बारा महिला निवडून आल्या, तर शिवसेनेनं आठ महिला उमेदवारांपैकी दोघींनी विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या चौदापैकी पाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ पैकी तीन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. याशिवाय दोन अपक्ष महिला उमेदवारही विजयी झाल्या आहेत.
****
दरम्यान, गोंदियाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर इथं गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गडकरी यांनी अग्रवाल यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
****
हरियाणातल्या भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या चंदीगड इथं बैठक होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्ष नेता निवडणार असून, बैठकीनंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे.
****
धन्वंतरी जयंती निमित्त आज मुंबईत कोकण भवन इथं विभागीय आयुर्वेद कार्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या आयुष विभागाने धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. निरामय चिरजीवनासाठी आयुर्वेद हे या दिवसाचं यंदाचं घोषवाक्य आहे. लोकांनी आजारी पडू नये, यासाठी जनजागृतीसाठी हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.
****
औरंगाबाद इथल्या हर्सुल कारागृहात कैद्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलं आहे. कारावास पूर्ण करून तुरुंगाबाहेर पडल्यावर संबंधित व्यक्तीला स्वत:च्या पायावर उभं राहाता यावं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कैद्यांसाठी असा उपक्रम राबवणारं हे राज्यातलं पहिलं कारागृह ठरलं आहे. सध्या या केंद्रात शिवणकाम, संगणक हाताळणी, विद्युत उपकरणजोडणी, नळदुरुस्ती, आदी दहा अभ्यासक्रम शिकवले जात असून, प्रत्येक अभ्यासक्रमाला सात ते आठ कैद्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात सार्वजनिक क्षेत्रातल्या १७ बॅंकांचे व्यव्हार आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. जिल्हास्तरीय बॅंकर्स कमिटीने हा निर्णय घेतला आहे. येत्या ११ नोव्हेंबर पासून या बॅंकांच्या व्यवहाराची वेळ असणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत जिल्ह्यातल्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसाठी ही वेळ निश्चित केल्याचं जिल्हा बँक व्यवस्थापक लातूर यांनी कळवलं आहे.
****
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पुढच्या बारा तासांत रत्नागिरी तसंच सिंधुदूर्ग जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अनेक भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यात १ जुनपासून आत्तापर्यंत ७३६ पूर्णांक ७४ मिलीमिटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ९६ पूर्णांक ४ दशांश टक्के पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस समाधानकारक वाटत असला तरी अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधीक ८९१ पूर्णांक ६५ मिलीमीटर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

जालना जिल्ह्यातल्या काही भागात आजही पावसानं हजेरी लावली, सतत सुरू असलेल्या पावसामुळं अनेक भागातले नदी-नाले खळखळून वाहत आहेत. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या संत गाडगेबाबा जलाशयाच्या पाणीपातळीत सतरा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८ पूर्णांक २१ मिलीमीटर असून, आजपर्यंत जिल्ह्यात ७१९ पूर्णांक ४९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात सर्वाधिक १४४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मागील सहा वर्षांनंतर यावर्षी पावसानं प्रथमच वार्षिक सरासरी ओलांडली असून, कायम दुष्काळी भाग असलेल्या जालना जिल्ह्याला या दमदार पावसामुळे मोठा दिलासा मिळाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणीपातळीही २० दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढ झाली आहे.
जायकवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग जवळपास दुपटीने वाढवण्यात आला आहे. सध्या धरणातून ५२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडी धरणात सध्या पन्नास हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.
****

No comments: