Tuesday, 22 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.10.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –22 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ ऑक्टोबर २०१ दुपारी .०० वा.
****
डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि दिमाग हे तीन डी भारताची शक्तीस्थानं आहेत. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत अमेरिका धोरणात्मक भागिदारी परिषद अर्थात यू एस आई एस पी एफ च्या सदस्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या सदस्यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व जॉन चेंम्बर्स यांनी केलं. भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवल्या बद्दल मोदी यांनी या प्रतिनिधींचे आभार मानले. देशात सध्या स्टार्टअप साठी अनुकुल वातावरण असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. व्यवसाय सुलभीकरणासाठी करकपात आणि श्रमसुधारण्याच्या प्रक्रियेचा त्यांनी आर्वजून उल्लेख केला.
***
आय एन एक्स मीडीया भ्रष्टाचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं दोन महिन्यांपूर्वी २१ ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना अटक केली होती. न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती हरी हृषिकेश रॉय यांच्या पीठानं, चिदंबरम यांना एक लाख रुपयांचा जातमुचलका आणि तितक्याच रकमेच्या सुरक्षा हमीवर आज जामीन मंजूर केला. मात्र आय एन एक्स मीडीया भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासावर या जामीनामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं ही न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायालयाच्या परवानगीशिवाय चिदंबरम देशाबाहेर जावू शकणार नाहीत, असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान, काळा पैसा वैध करण्याच्या एका अन्य प्रकरणात, चिदंबरम सध्या सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या अटकेत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ ऑक्टोबरला - या महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान, आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
***
हिमाचल प्रदेशात दोन विधानसभा मतदारसंघांमधे काल झालेल्या निवडणुकीत एकोणसत्तर टक्के मतदान झालं. धरमशाला मतदारसंघात ६५ तर पच्छड मतदारसंघात ७३ टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
****
राज्यात काल ठिकठिकाणी परतीच्या पावसाचा कमी अधिक प्रमाणात जोर कायमच होता.  मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी पावसाची रिपरीप सुरु होती. रायगड जिल्हयात काल सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू होती.  अहमदनगर, सांगलीसह मराठवाड्यात  परभणी,जालना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची रिपरीप सुरु होती. तर, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कालही पाऊस झाला. येत्या चोवीस तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या बहुतेक ठिकाणी जोरदार तर , विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांचे वडील सखाराम महिपती मुट्कुळे यांचं आज पहाटे पावणे ५ च्या सुमारास निधन झालं. हिंगोलीतल्या आडगाव इथं सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतानं एक डाव आणि दोनशे दोन धावांनी विजय मिळवत, कसोटी मालिका तीन शून्य अशी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिका संघानं आज सकाळी कालच्या आठ बाद १३२ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, मात्र अवघ्या एका धावेत म्हणजेच, १३३ धावांवर पाहुण्या संघाचे अखेरचे दोन फलंदाज बाद झाले. तिसऱ्या कसोटीत द्वी शतक, आणि पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावत, मालिकेत पाचशे एकोणतीस धावा करणारा रोहित शर्मा, सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
चीनच्या वुहान इथं सुरु असलेल्या सातव्या ‘सी.आय.एस.एम. जागतिक लष्करी स्पर्धेत’ भारताचे मुष्ठीयुध्दपटू दुर्योधन सिंग नेगी आणि जयदीप यांनी काल आपापल्या वजन गटात उप-उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत नऊ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे ५४ खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांची आज भेटली. बॅनर्जी यांच्यासोबत विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाल्याचं, मोदी यांनी सांगितलं. मानवी सक्षमीकरणासाठी बॅनर्जी यांचे प्रयत्न स्पृहणीय असल्याचं सांगत, त्यांच्या आगामी उपक्रमांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
****


No comments: