Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –27 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला.
`मन की बात` या कार्यक्रम श्रृंखलेचा हा अठ्ठावण्णावा भाग आहे. यावेळी त्यांनी दीपावलीच्या
शुभेच्छा देताना दिवाळी उत्साहात पण काळजीपूर्वक साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. आपण सर्व या दिवाळीला भारताची नारी शक्ती आणि तिनं
साध्य केलेलं उत्तुंग यश साजरं करू या म्हणजे हे भारताच्या लक्ष्मीचा सन्मान करणं ठरेल,
असं ते म्हणाले.
पंतप्रधानांनी
यावेळी स्थानिक वस्तुंच्या खरेदीवर भर देण्याचं आवाहनही केलं आहे. जगात उत्सवी पर्यटनाचं
स्वतःचं आकर्षण असतं. भारत, जो सणांचा देश आहे, त्यात उत्सवी पर्यटनाच्या अफाट शक्यता
आहेत. म्हणून, भारतात उत्सवी पर्यटन वाढवण्यात, देशाबाहेर राहणाऱ्या भारतीयांची भूमिका
अतिशय महत्वाची असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. ३१ ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार वल्लभभाई
पटेल यांची जयंती असून ते देशाला ऐक्याच्या धाग्यात गुंफणारे महानायक होते, असा गौरवपूर्व
उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या `मन की बात` कार्यक्रमात केला.
****
राज्याच्या
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच पुन्हा विराजमान होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. केवळ
दहा जागा वाढलेल्या पक्षाचं प्रसारमाध्यमं भरभरुन कौतुक करत आहेत. मात्र, अपक्षांच्या
साथीनंच साधारण गेल्यावेळ इतक्या जागा राखणा-या भाजपवर नकारात्मक सूर लावला जात असल्याची
टीका त्यांनी यावेळी केली.
दरम्यान,
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष
नवनियुक्त आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या पक्षाचे आमदार राजकुमार पटेल, या विदर्भातील
दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यांनी या पाठिंब्याचं पत्र शिवसेना प्रमुख
उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. कडू हे अचलपूर आणि पटेल हे मेळघाट येथून विजयी झाले आहेत.
****
प्रकाशाचा
आणि तेजाचा सण दिवाळी, आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी म्हणजे सत्याचा असत्यावर
विजय तसचं आज संपत्तीची देवता, लक्ष्मीचं पूजन केलं जातं.
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद , उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा
दिल्या आहेत. दिवाळी म्हणजे निराशेवर आशेचा विजय, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे. प्रत्येकाने वंचितांच्या, दुःखितांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न
करावा, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
दिवाळीमुळे
सामान्य जनतेला निराशेवर मात करण्याचं बळ मिळतं, असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे.
****
औरंगाबादच्या
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे आज सकाळी तीन फुटांनी उघडण्यात आले. त्यातून
५१ हजार ८९३ घनफूट प्रतिसेकंद इतक्या वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडीचे
दरवाजे उघडण्याची या महिन्यातली ही पाचवी वेळ आहे. विशेष म्हणजे धरणाच्या इतिहासात
प्रथमच गेली शंभर दिवस सलग शंभर टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा ओघ सुरु असल्यानं
हे दरवाजे पुढले काही दिवस उघडेच राहतील.
जायकवाडीतून
सोडण्यात येत असलेलं पाणी लक्षात घेता नांदेड पाटबंधारे विभागानं विष्णुपुरी प्रकल्पाचे
नऊ दरवाजे उघडले आहेत. यातून एक लाख १६ हजार घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु
केला आहे.
****
मध्यपूर्व
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्तिशाली `कयार` या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची
शक्यता असून ते वायव्येला ओमानच्या दिशेनं सरकत आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच गोवा, कर्नाटक आणि दक्षिण गुजरातमध्ये येत्या
चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
****
केंद्रीय
लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवा - `आय ई एस` परीक्षेत
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा इथला हर्षल भोसले यानं देशात प्रथम क्रमांक मिळवला
आहे. हर्षल भोसले यानं पहिल्याच प्रयत्नातच हे यश मिळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment