Thursday, 31 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
विविधतेत एकता हीच आपली ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया इथं उभारण्यात आलेल्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. सरदार पटेल यांची एकशे चव्वेचाळीसावी जयंती आज सर्वत्र `एकता दिवस` म्हणून साजरी करण्यात येत आहे. या निमित्त मुंबईत आयोजित एकता दौडला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. औरंगाबादमध्ये क्रांतीचौक ते महावीर चौक या मार्गावर एकता दौड झाली. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. उस्मानाबाद शहरात तसंच जालना इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत तर बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुला दरम्यान एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. परभणी इथं राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान तसंच हिंगोली, धुऴे, नाशिक, पालघर, वाशिम, गडचिरोली इथंही सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त `एकता दौड` झाली.
****
राज्यात मुख्यमंत्री पदासह सत्तेचं समसमान वाटप व्हावं, या शिवसेनेच्या भूमिकेचा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज पुनरुच्चार केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, शिवसेनेच्या विधीमंडऴ नेत्याची निवड करण्यासाठी शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांची आज दुपारी मुंबईत बैठक होत आहे.
****
आगामी सरकारमधला सहभाग आणि सत्तावाटप याबाबत सेना-भाजप महायुतीतल्या मित्रपक्षांची बैठकही आज मुंबईत होत आहे. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यात सहभागी होत आहेत.
****
परतीच्या पावसामुळं सांगली जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सांगली जिल्ह्यात एक लाख ५० हजार एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड करण्यात आली आहे, त्यापैकी कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे पंचवीस हजार एकर द्राक्ष शेतीचं नुकसान आधीच झालं होतं. या पावसामुळे सुमारे तीस हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष पिकांचं नुकसान झालं असून याची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
****

No comments: