Tuesday, 29 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.10.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –29 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑक्टोबर २०१ दुपारी .०० वा.
****
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची आज सर्वोच्च न्यायलयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पदाचा कार्यभार संपल्यानंतर, म्हणजेच अठरा नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे हे शपथ घेणार आहेत. त्यांचा या पदाचा कार्यकाळ सतरा महिण्यांचा असणार आहे. त्यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून लवकरच याबाबत औपचारिक अधिसूचना जारी केली जाणार असल्याची  माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
****
सौदी अरबमधील भारतीयांच्या परिश्रम आणि वचनबद्धतेमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ झाल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. अरब न्यूज या दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी यासंदर्भात मतं नोंदवली आहेत.  सौदी अरबमध्ये सुमारे सहव्वीस लाख भारतीय राहतात. त्यांनी या देशाला आपलं दुसरं निवासस्थान ठरवून विकास आणि वाढीमध्ये योगदान दिलं असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान सौदी अरबच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यात नागरी हवाई वाहतूक, सुरक्षा, संरक्षण, पायाभूत सुविधा आणि अपारंपरिक उर्जा क्षेत्रासह विविध क्षेत्रांशी संबंधित किमान बारा करार होण्याची अपेक्षा आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं सीएसआर अर्थात खासगी क्षेत्रानं बजावलेल्या सामाजिक उत्तरदायित्वासाठीच्या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. सामाजिक उत्तरदायित्वासंदर्भात उल्लेखनीय काम करणाऱ्या १९ निवडक कंपन्यांना हे पुरस्कार दिले गेले. समावेशक वृद्धी आणि शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीएसआरच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राकडून चालवल्या जाणाऱ्या चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे पुरस्कार देण्यात येतात.
****
ऐंशीवर्षांहून अधिक वय असणारे नागरिक तसंच दिव्यांग व्यक्ती यांना यापुढं टपालाद्वारे मतपत्रिका पाठवून मतदान करता येणार आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं की टपालाद्वारे मतदान करायचं हा पर्याय निवडण्याचं त्यांना स्वांतत्र्य असून हा पर्याय निवडल्यास त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मतदान करता येईल. निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं निवडणूक विषयक नियमात ही सुधारणा केली आहे.
****
भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा, त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणाबाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या जाणार आहेत. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर इतर दिव्यांगतेच्या निकषात न बसणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची नियुक्ती केली जाणार नाही असंही रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. अशा सर्व जागा पुढच्या वेळच्या कर्मचारी भरतीच्या अधिसूचनेत गृहीत धरल्या जातील, असंही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे.
****
राज्यात भाजपकडे स्वतःच्या १०५ आमदारांव्यतिरिक्त १५ अपक्षांचं संख्याबळ असल्याचा दावा, भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केला आहे. शिवसेनेकडून सत्तेमध्ये पन्नास टक्के भागीदारी देण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं हा दावा केला आहे. आपल्याकडे असलेल्या संख्याबळाची शिवसेनेला कल्पना आहे, असं त्यांनी सांगितलं. नव्या सरकारमध्येही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा मतदार संघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचं पत्र गडाख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केलं. भाजपच्या दोन बंडखोर आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. गोंदियाचे विनोद अग्रवाल आणि उरणचे महेश बालदी यांनी आज आपला पाठिंबा जाहीर केला.
****
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याच्या सुचना तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यांनी नांदेड तालुक्यातील सावंगी, पुयणी, वाडी बुद्रुक, चिखली आदी गावांना भेटी देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून दिला जाईल असं कल्याणकर यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात पिकांचं मोठ नुकसान झालं असून पीक विमा कंपनीनं पिकाच्या सरसकट नुकसानीचे अहवाल तत्काळ सादर करावेत अन्यथा पीक विमा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा कृषी परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिला आहे.
****

No comments: