Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात
परतीच्या पावसाचा जोर कायम; मराठवाड्यात जलसाठ्यात वाढ
** विधानसभा
मतदान मोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
** ईव्हीएम
ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवण्याची काँग्रेसची
मागणी
** विलिनीकरणाविरोधात
कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे बँकांचं कामकाज विस्कळीत
आणि
** दक्षिण
आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी क्रिकेट सामनाही भारतानं एक डाव आणि दोनशे दोन धावांनी
जिंकला, रोहित शर्माला मालिकावीर पुरस्कार
****
राज्यात
कालही परतीच्या पावसाचा जोर कायम होता. मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या
पावसामुळे ठिकठिकाणच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. खरीपातलं सोयाबीन, कपाशीला मात्र या
परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.
औरंगाबाद
तसंच जालना जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्या काल रात्री उशिरापर्यंत
चांगला पाऊस झाला. जालना जिल्ह्यात बहुतांश भागात काल रात्री तीन ते चार तास जोरदार
पाऊस झाला, त्यामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. अंबड तालुक्यात वडीगोद्री मंडळात ८१
मिलीमीटर तर जाफ्राबाद तालुक्यात टेंभुर्णी मंडळात ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
लातूर
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे मांजरा धरणाचा पाणीसाठा १५ दशलक्ष घनमीटर इतका झाला
आहे. नागझरीसह दहा बंधाऱ्यांमध्ये जलसाठा वाढला आहे.
बीड जिल्ह्यातल्या
वडवणी तालुक्यात सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली.
सांगली
जिल्ह्यातल्या कृष्णा, वारणा, माणगंगा
आणि अग्रणी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली
आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी तालुक्यातल्या नद्यांना पूर आला आहे. कवठेमहांकाळ
तालुक्यात अग्रणी नदीला पूर आल्यानं या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. जत तालुक्यातही
बोर नदीला पूर आला, शिराळा आणि वाळवा तालुक्यात वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या
शेतकऱ्यांचे, भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
वाळवा तालुक्यात वारणा गावाकडं जाणारा मार्ग दहा फुटानं खचला असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
धुळे जिल्ह्यात
बहुतांश भागात पाऊस झाल्यानं अनेक गावांमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे.
सोलापूर
जिल्ह्यात उजनी धरणातून भिमा नदीत वीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात
आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या लघु आणि मध्यम प्रकल्पात मुबलक पाणी साठा झाला आहे.
सातारा
जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात पुणे - पंढरपूर रस्त्यावर वीडणीजवळ पुलावरुन पाणी वाहत
असल्यामुळे सहा तास वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान,
अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात दिवाळीतही पाऊस पडण्याचा
अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
राज्य
विधानसभेच्या निवडणुकीसाठी २१ तारखेला झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. एक लाख १२ हजार ३२८ ई व्ही एम आणि व्ही व्ही
पॅट यंत्रांची त्रिस्तरीय सुरक्षा प्रणालीअंतर्गत, सी सी टी व्हींच्या माध्यमातून २४
तास निगराणी केली जात आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात
आला आहे. या सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं जाणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८
जागांसाठी सरासरी ६० पूर्णांक ४६ शतांश टक्के मतदान झालं.
****
सातारा
तालुक्यातल्या नवलेवाडी इथे मतदान यंत्राबाबत कोणताही आक्षेपार्ह प्रकार घडला नसल्याचं,
निवडणूक विभागानं स्पष्ट केलं आहे. या मतदान केंद्रावरच्या मतदान यंत्राबाबत आक्षेप
घेणाऱ्या दोन उमेदवार प्रतिनिधींनी, सकाळी प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीच्या अभिरुप
मतदानावेळी कोणताही आक्षेप नोंदवला नाही, दुपारी चार वाजता या दोघांनी आक्षेप नोंदवल्यावर
त्यांना पुन्हा चाचणी मतदानासाठी संबंधित अर्ज भरून देण्यास सांगितलं असता, दोघांनीही
अर्ज भरून आक्षेपाची कार्यवाही पूर्ण करण्यास नकार दिला. त्यामुळे या तक्रारीत काहीही
तथ्य नसल्याचं, संबंधित निवडणूक अधिकारी तसंच तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी
स्पष्ट केलं आहे.
****
ईव्हीएम
ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली
आहे. मतदान यंत्रात हेराफेरी होऊ शकते अशी जनभावना असल्याचा दावा त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना
लिहीलेल्या पत्रात केला आहे. प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी
तात्काळ जाहीर करावी आणि त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी
मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी. तसंच कोणत्याही मतदान यंत्राबाबात शंका
निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातल्या मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी, आणि
५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशा मागण्या त्यांनी पत्रात केल्या आहेत.
****
आय एन
एक्स मीडीया भ्रष्टाचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयानं
काल जामीन मंजूर केला. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं दोन महिन्यांपूर्वी
२१ ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना अटक केली होती. न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती
हरी हृषिकेश रॉय यांच्या पीठानं, चिदंबरम यांना एक लाख रुपयांचा जातमुचलका आणि तितक्याच
रकमेच्या सुरक्षा हमीवर काल जामीन मंजूर केला. मात्र आय एन एक्स मीडीया भ्रष्टाचार
प्रकरणाच्या तपासावर या जामीनामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट
केलं. न्यायालयाच्या परवानगीशिवाय चिदंबरम देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत, असं न्यायालयानं
सांगितलं. दरम्यान, काळा पैसा वैध करण्याच्या एका अन्य प्रकरणात, चिदंबरम सध्या सक्तवसुली
संचालनालय - ईडीच्या अटकेत आहेत.
****
सार्वजनिक
क्षेत्रातल्या बँकांचं विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या
संघटनांनी काल पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊन ग्राहकांची
गैरसोय झाली. या विलिनीकरणामुळे बँकांच्या व्यवसायाला काही फायदा होणार नाही, उलट कर्मचारी
आणि अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, असं निदर्शनं करणाऱ्या संघटनांनी
सांगितलं. औरंगाबाद शहरात क्रांती चौक इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर संघटनांनी
काल निदर्शनं केली.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबादच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या महिनाभरात ‘फाईल ट्रॅकींग सिस्टीम‘
सह विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक सुधारणा राबवण्यात येणार असल्याचं कुलगुरु
डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितलं. कुलगुरुपदाची सुत्रे हाती घेऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त
ते काल विद्यापीठात वार्ताहरांशी बोलत होते. महिन्याभरात विद्यापीठातल्या सर्व विभागात
‘कॅशलेस’ आणि ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा सुरू केली जाईल, विदेशी विद्यार्थी प्रवेशासाठी
एक खिडकी योजना, विविध विभागात ‘स्वयंम’ चे ५० अभ्यासक्रमही सुरु करणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. विद्यार्थी, समाजमाध्यमं आणि विद्यापीठ प्रशासन यामध्ये योग्य तो समन्वय
ठेऊन कार्यक्षमता, गतीमानता आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार असल्याचं
कुलगुरू म्हणाले.
****
परभणी
जिल्ह्यात कापसाच्या खरेदीस काल सुरूवात करण्यात आली. औद्योगिक परिसरात, यावेळी कापसाच्या
तराजूचं पूजन करण्यात आलं, तसंच विक्रीसाठी
कापूस आणलेल्या शेतकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं.
****
हिंगोलीचे
आमदार तानाजी मुटकुळे यांचे वडील सखाराम महिपती मुटकुळे यांचं काल निधन झालं. हिंगोलीतल्या
आडगाव इथं काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
भारतीय
क्रिकेट नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित प्रतिनिधी मंडळानं कार्यभार स्वीकारल्यावर, माजी
लेखा आणि महानियंत्रक विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या प्रशासकीय समितीनं
पद सोडावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. नियामक मंडळाच्या निवडणुकीनंतर नवनियुक्त
अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह नवीन पदाधिकारी आज कार्यभार स्वीकारतील. तोपर्यंतचे
हिशेब आणि ताळेबंद प्रशासकीय समितीनं संबंधित निबंधकांकडे सादर करावेत, असंही सर्वोच्च
न्यायालयानं म्हटलं आहे.
****
दक्षिण
आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतानं एक डाव आणि दोनशे दोन धावांनी विजय मिळवत,
कसोटी मालिका तीन - शून्य अशी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिका संघानं काल सकाळी आठ बाद
१३२ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, मात्र अवघ्या एका धावेत म्हणजेच, १३३ धावांवर
पाहुण्या संघाचे अखेरचे दोन फलंदाज बाद झाले. तिसऱ्या कसोटीत द्विशतक, आणि पहिल्या
कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावत, मालिकेत पाचशे एकोणतीस धावा करणारा रोहित शर्मा,
सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
लातूर
इथं स्वयंसहायता गटातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन, हिरकणी महोत्सवाचं
काल दिव्यांग असलेल्या दिपमाला तुपकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यांत्रणा यांनी हे प्रदर्शन
भरवलं आहे.
****
येत्या २७ ऑक्टोबरला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जीओव्ही ओपन
फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment