Sunday, 27 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.10.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
** भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातली महायुती राज्याला स्थिर सरकार देईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; बुधवारी विधीमंडळ नेता निवडीसाठी बैठक
** सरकार स्थापनेबाबतचे सर्वाधिकार शिवसेना पक्ष प्रमुखांनाः नवनिर्वाचित आमदारांचा ठराव
** क्यार चक्रीवादळाचा कोकण किनार पट्टीला जोरदार तडाखा; सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं
** दिवाळीचं आज लक्ष्मीपूजन  
आणि
** फ्रेन्च खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारतीय बॅटमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीची दुहेरीत अंतिम फेरीत धडक
****
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातली महायुती राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत, पक्ष कार्यकर्त्यांच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात बोलत होते. राज्यातल्या जनतेने भाजप, शिवसेना, रिपाईं, रासप आणि शिवसंग्राम पक्षाच्या महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे, याबाबत कोणाच्याही मनात शंका असू नये, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. दिवाळीनंतर विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल, आणि त्यानंतर लवकरच शपथग्रहण होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. या निवडणुकीत भाजपची कामगिरी २०१४ च्या तुलनेत उत्तम राहिल्याचं ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत भाजपने २६० जागा लढवून ४७ टक्के जागा जिंकल्या होत्या, या निवडणुकीत मात्र दीडशे जागा लढवून त्यापैकी ७० टक्के जागा जिंकल्या, अन्य कोणत्याही पक्षाच्या तुलनेत ही कामगिरी उत्तम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
राज्यात भाजपच्या नवनियुक्त आमदारांची येत्या बुधवारी विधीमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. विधानभवनामध्ये दुपारी एक वाजता ही बैठक होईल, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाठिंब्यासाठी अपक्ष आणि अन्य लहान पक्षांच्या एकूण पंधरा आमदारांच्या संपर्कात असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १२२ जागा स्वबळावर जिंकलेल्या भाजपला यावेळी १०५ जागा मिळाल्या आहेत.
****
सरकार स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वाधिकाराचा ठराव शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी संमत केला आहे. ठाकरे यांनी काल मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी, सर्व आमदारांची बैठक घेतली, या बैठकीत आमदार एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला सर्व आमदारांनी अनुमोदन दिलं. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबत भाजपकडून लेखी हमी घ्यावी, अशी मागणी या आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली. वरळीतून निवडून आलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना, नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री करावं, अशी मागणीही या बैठकीत आमदारांनी ठाकरे यांच्याकडे केली. आपल्याला `अन्य पर्याय` खुले आहेत पण शिवसेना आणि भाजप हिंदुत्ववादी विचारसरणीला बांधील असल्यामुळे, इतर पर्यायांमध्ये आपल्याला रस नाही, असं ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांचीही येत्या ३० तारखेला विधिमंडळ गटनेता निवडीसाठी बैठक होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातलं सरकार स्थापन झाल्यावर विधानसभेचा विरोधी पक्षनेता ठरवला जाईल, असं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. विरोधी पक्षनेत्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांची नावं चर्चेत आहेत.
दरम्यान, राज्यात सरकार स्थापन करणं हा राष्ट्रवादी काँग्रेससमोरचा पर्याय नसून मिळालेल्या जनादेशानुसार आपला पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल बारामती इथं पवार यांची  भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, तसंच नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यावेळी उपस्थित होते.
****
सत्ता लोकहितासाठी राबवण्याऐवजी, विरोधकांना संपवण्यासाठी वापरली तर जनता सत्ताधाऱ्यांना थारा देत नाही, हेच विधानसभेच्या निकालातून स्पष्ट झालं असल्याचं, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पक्षांतर करून भाजपात गेलेल्यांना जनतेनं योग्य तो धडा दिला शिकवल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. जनतेनं दिलेला कौल मान्य करून भाजपनं सत्तेपासून दूर राहायला हवं, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता, आकाशवाणीवरच्या `मन कि बात` या कार्यक्रमातून देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधतील. `मन की बात` या कार्यक्रम श्रृंखलेचा हा  ५८ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांसह www.newsonair.com या संकेतस्थळावर आणि `न्यूज ऑन एअर` ॲपवर याचं प्रसारण केलं जाईल. कार्यक्रम संपताच, पंतप्रधानांच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद प्रसारित केला जाईल. रात्री आठ वाजता या अनुवादाचं पुनःप्रसारण केलं जाईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रीवादळाचा राज्यात कोकण किनार पट्टीवरील गावांना जोरदार तडाखा बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १०८ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मालवण, आचरा, वेंगुर्ले आणि देवगड इथं किनारपट्टीलगतच्या भागात उधाणाचं पाणी घरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये शिरुन नुकसान झालं आहे. या वादळाचा फटका रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांच्या किनारपट्टीलाही बसला आहे. दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरातल्या सुमारे ८० छोट्या होड्या लाटांच्या तडाख्यात वाहून गेल्या आहेत.
या वादळामुळे राज्यात इतरत्रही जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कौठा, वसमत परिसरात काल संध्याकाळनंतर जोरदार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा काही काळ खंडीत झाला.

परभणी जिल्ह्यातही काल सकाळी सुरू झालेला पाऊस दुपारनंतरही सुरू होता. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सोयाबीनसह कापसाचं मोठं नुकसान झालं.

नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणांत सध्या साडे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. जायकवाडी धरणातून सध्या सुमारे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे, यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
त्यामुळे नांदेडच्या विष्णूपूरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातली पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं, नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी म्हटलं आहे. तेलंगणातल्या पोचमपाड धरणातूनही पाणी सोडण्यात येत असल्यामुळे पुराचा धोका निवळल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याविषयी पीक विमा कंपनीच्या नांदेड इथल्या समन्वयक अधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा केल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. यासंदर्भात कंपनीकडून दोन दिवसात निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यातल्या केज अंबाजोगाईच्या नवनिर्वाचित आमदार नमिता मुंदडा यांनी काल उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, नुकसान भरपाईचे पंचनामे, पीक विमा वाटप तसंच दिवाळीसाठी शिधापत्रिका धारकांना धान्यवाटपाची मागणी केली.
****
जालना आणि भोकरदन तालुक्यातल्या काही भागात काल पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली. यामुळे जालना शहरातले बहुतांश रस्ते जलमय झाले. आझाद मैदानावरच्या फटाका बाजारात सर्वत्र पाणी साचल्यामुळे ग्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली.
दरम्यान, जालना तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या खरिपातल्या सोयाबीन, मका, बाजरी, कापूस या पिकांचे कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात शासनाला अहवाल पाठवावा, अशी मागणी जालन्याचे नवनिर्वाचित आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, येत्या १२ तासात कोकणात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा मुंबईच्या हवामान विभागानं दिला आहे.
****
प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीतलं नर्कचतुर्दशीचं अभ्यंगस्नान आज पहाटे साजरं करण्यात आलं. आज सायंकाळी लक्ष्मीपूजन करण्यात येईल. दिवाळीतल्या आजच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूजासाहित्यासह पणत्या, रांगोळ्या, फटाके आणि इतर साहित्याने बाजारपेठा गजबजल्या आहेत.
नांदेड इथल्या सचखंड गुरूद्वाऱ्यात काल दिवाळीनिमित्त तख्तस्नान घालण्यात आलं. दीपावलीच्या पूर्वसंध्येला गोदावरी नदीचं पूजन करून घागरीनं हे पाणी सचखंड गुरुद्वाऱ्यात आणून, परिसर धुवून काढला जातो. कालही हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले
****
भारतीय बॅटमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीनं फ्रेन्च खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने जपानी जोडीचा २१-११, २५-२३ असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीचा आज इंडोनेशियाच्या जोडीसोबत अंतिम सामना होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत इतर भारतीय बॅटमिंटनपटूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे नांदेड तालुकाध्यक्ष, बापूराव शिंदे यांचं काल निधन झालं, ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज मरळक इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****

No comments: