Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात
सरकार स्थापन करण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत पेच कायम; अमित शहा यांचा मुंबई
दौरा स्थगित
** भारतीय
जनता पक्षानं शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेलं नाही-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
** वादावर
तोडगा काढण्यासाठी, भाजपनं बोलावलेली बैठक शिवसेनेकडून रद्द
** न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची
सरन्यायाधीश म्हणून
नियुक्ती; १८ नोव्हेंबरला घेणार शपथ
आणि
** सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्यात
सर्व जिल्ह्यात उद्या एकता दौडचं आयोजन
****
राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि
शिवसेनेत पेच कायम आहे. शिवसेनेनं सत्तेत बरोबरीच्या भागीदारीची मागणी केली आहे, त्यात
मुख्यमंत्रीपद अडीच- अडीच वर्ष विभागून देण्याच्या मागणीचा समावेश आहे.
दरम्यान, भाजप विधीमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी
आज मुंबईत बैठक होत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि
उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यावेळी निरीक्षक असतील.
राज्यात सत्ता स्थापनेचा
निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या
पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. भाजप आणि शिवसेनेत सत्तेचं समान वाटपं करण्याचं ठरलं होतं, मात्र यात मुख्यमंत्री पदाचं
समान कालावधीसाठी वाटप करण्याचा निर्णय झाला नव्हता, असं भाजपच्या सूत्रानं सांगितल्याचं
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद
देण्याचे आश्वासन दिलेलं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी
बोलतांना स्पष्ट केलं. याबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं प्रस्ताव दिला होता,
मात्र त्यावर आपल्यासमोर कोणताही निर्णय झालेला नाही, असं ते म्हणाले. राज्यात आपल्या
नेतृत्वाखाली महायुतीचेच सरकार येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झाल्याचं
भाजपकडून सांगण्यात आलं. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख
उद्धव ठाकरे यांची त्यांच्यासोबतची भेटही रद्द झाली आहे.
दरम्यान, राज्यात नव्यानं निवडून आलेले शिवसेनेचे पंचेचाळीस
आमदार भाजपशी हात मिळवणी करण्यास तयार असून त्यांना मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस
हेच हवे आहेत, असं राज्यसभेतले भाजपचे खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
ते
मुंबईत एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
****
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी, भाजपाने
बोलावलेली आजची बैठक शिवसेनेनं रद्द केली आहे. सत्ता वाटपाच्या पन्नास पन्नास टक्के
वाटपाच्या समीकरणावर चर्चा झालेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणत असतील, तर चर्चेसाठी
कोणताही मुद्याच नसल्याने, बैठक रद्द केल्याचं, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत
यांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. कॅमेऱ्यासमोर केलेलं विधान मुख्यमंत्री
मान्य करत नसल्याचं, राऊत यांनी नमूद केलं.
****
शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडावा, उपमुख्यमंत्रिपद
घ्यावं, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुचवलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेनेनं राज्य तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात
आणखी खाती घ्यावी, असंही आठवले यावेळी म्हणाले.
****
दरम्यान, सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेकडून ठोस काही प्रस्ताव आला तर विचार केला जाईल, असं माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस
पक्ष स्वत:हून शिवसेनेकडे जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
***
नवी मुंबईतल्या उरण विधानसभा
मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार महेश बालदी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी
मतदारसंघाचे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा
जाहीर केला आहे. बालदी यांनी या संदर्भातलं पत्र काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना
सादर केलं.
****
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची देशाचे
४७ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते १८
नोव्हेंबरला आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई
यांच्या पदाचा कार्यभार १७ नोव्हेंबरला संपणार आहे. न्यायमूर्ती बोबडे यांच्या पदाचा
कार्यकाळ सतरा महिन्यांचा असणार आहे. त्यांच्या नियुक्तीपत्रावर
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी
केली असून लवकरच याबाबत औपचारिक अधिसूचना जारी करणार असल्याची माहिती
सरकारी सूत्रांनी दिली आहे.
****
राज्याचे माजी पोलिस महासंचालक
दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम करतील. त्यांच्याकडे
देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उद्या देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी होणार
आहे. यानिमित्त राज्यात जिल्हा मुख्यालयं, महत्त्वाची
शहरं असा विविध ठिकाणी रन फॉर युनिटी - एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात मुसळधार पावसामुळे
पिकांचं मोठं नुकसान झालं असून, संपूर्ण विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र केंद्रीय कृषी मंत्र्यांना
पाठवलं असल्याची माहिती त्यांनी अकोला इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर,
पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
बुलडाणा तालुक्यातल्या चिखला
शिवारात पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची काल कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पाहणी केली. पीक विमा काढलेल्या
शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागासोबत विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष हजर
राहण्याची सूचना डवले यांनी केली.
नांदेड जिल्ह्यातले भोकरचे
आमदार अशोक चव्हाण यांनी भोकर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी
केली. शेतकऱ्यांना सरसगट पिक विमा मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी बोलतांना केली.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही काल नांदेड तालुक्यातल्या
सावंगी, पुयणी, वाडी बुद्रुक, चिखली आदी गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी
केली. नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचमाने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, पीक विमा कंपनीनं
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत अशी मागणी
विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची
शिवसेनेच्या वतीनं आज पाहणी करण्यात येणार आहे. पक्षाचे सर्व आमदार, नेते, पालकमंत्री
एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर हे जिल्ह्यात आठही तालुक्यातल्या विविध गावात
जाऊन पाहणी करणार असल्याचं जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यात गेले दोन
दिवस झालेल्या पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाचं नुकसान झालं आहे. यामुळे कांद्याचे
भाव नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. अन्य पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान
झालं असून, जिल्हा प्रशासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत
आहे.
****
भाऊबिजेचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. बुलडाणा
जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं आदिवासी पाड्यावर अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली. काँग्रेस नेत्या डॉ स्वाती वाकेकर
आणि डॉ संदीप वाकेकर यांनी आदिवासी बांधवाना ओवाळून भेटवस्तू वाटप केल्या.
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर
तालुक्यातल्या लहान या गावातही स्वरानंद संचच्या वतीनं संगीत दिवाळी पहाट हा भावगीत, भक्तीगीत तसंच मराठी हिंदी
बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमानं भाऊबीज साजरी करण्यात आली.
औरंगाबाद शहरात काल भाऊबिजेच्या दिवशी हेल्यांचा सगर काढला जातो. यावेळी पशुपालकांनी
शहरातला बिबी का मकबरा, फकीरवाडी इथलं श्रीकृष्ण मंदीर आणि नवाबपुऱ्यात सजवलेल्या हेल्याचं पूजन करुन त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. सगर पाहण्यासाठी
नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पोटूळ ते लासूर दरम्यान रेल्वे रुळाला
तडे गेल्याचं एका स्थानिक शेतकऱ्यानं लक्षात आणून दिल्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीचं
काम हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळे मुंबई-नांदेड-हैदराबाद
मार्गावरच्या
गाड्यांची गती ताशी ३० किलोमीटरपर्यंत कमी केली जाणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं
आहे. येत्या दोन दिवसांत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल, असं रेल्वेच्या
जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
****
पंढरपूर -रिसोड एस टी बसचा काल परळी शहराजवळ संभाव्य अपघात दोन
तरुणांच्या सतर्कतेमुळे टळला. या धावत्या बसच्या मागच्या दोन चाकांच्या जोडीपैकी एक
चाक निखळून पडल्याचं पाहताच, गणेश यतोंडे आणि रोहित सातपुते या दोन तरुणांनी बसचा पाठलाग
करून ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली.
बसमधल्या सुमारे साठ प्रवाशांनी या दोघांनी सतर्कतेनं अपघात टाळल्याबद्दल त्यांचे आभार
मानले.
****
No comments:
Post a Comment