Thursday, 24 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.10.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
** विधानसभेच्या मतदानाची आज मतमोजणी; दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता
** गहू आणि कडधांन्याच्या किमान आधारभूत दरात वाढ तसंच बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन सार्वजनिक दूरसंचार कंपन्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या आराखड्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
** राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पाच हजार तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार रूपये दिवाळी भेट
आणि
** राज्यात परतीचा पाऊस सुरुच; जलसाठ्यांमध्ये वाढ, अनेक ठिकाणी जनजीवनही विस्कळीत
****
राज्य विधानसभेसाठी आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी केली जाणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यासाठी राज्यभरातल्या २८८ मतमोजणी केंद्रावर २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण तीन हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल मुंबईत सांगितलं. दोनशे एकोणसत्तर ठिकाणी ही मतमोजणी होणार असून, एका मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात १४ ते २० टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक आणि दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी असतात. मतमोजणी केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल, असंही शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जॅमर्स लावण्याची आवश्यकता नाही, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी 'नेटवर्क जॅमर्स' लावण्याच्या तसंच अन्य मुद्द्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या मागणीच्या अनुषंगानं हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
निवडणूक निकालांसंदर्भात आज दिवसभरात आकाशवाणीवरुन राजकीय तज्ज्ञांची चर्चा तसंच नियमित बातमीपत्रांखेरीज दर तासाला जास्तीची बातमीपत्रं प्रसारित केली जाणार आहेत.
****
केंद्र सरकारनं रबी हंगामासाठी धान्यांच्या किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गव्हाच्या आधारभूत किंमतीत क्विंटलमागे ८५ रुपये वाढ करण्यात आली असून, आता गव्हाचा किमान आधारभूत दर प्रतिक्विंटल एक हजार ९२५ रुपये एवढा असेल. कडधान्यांच्या दरातही क्विंटल मागे तीनशे पंचवीस रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून, आता मसूरचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल, तर हरबऱ्याचा दर चार हजार आठशे पंचाहत्तर रुपये क्विंटल असेल. जव तसंच तेलबियांच्या आधारभूत दरांतही वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी काल मंत्रीमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. 
भारत दूरसंचार निगम लिमिटेड- बीएसएनएल किंवा महानगर दूरसंचार निगम लिमिटेड -एमटीएनएल या दोन सार्वजनिक उपक्रमातल्या दूरसंचार कंपन्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या ६९ हजार कोटी रूपयांच्या आराखड्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणालाही, सरकारनं तात्विक मंजुरी दिली आहे.‌ फोर जी स्पेक्ट्रमच्या खरेदीसाठी २० हजार १४० कोटी रूपये, त्यावरच्या वस्तु आणि सेवाकरासाठी तीन हजार ६७४ कोटी रूपये बीएसएनएलला देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर १५ हजार कोटी रूपये बंधपत्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत, याशिवाय कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी १७ हजार १६० कोटी रूपये आणि सेवनिवृत्तीनंतरचं दायित्त्व पूर्ण करण्यासाठी १२ हजार ७६८ कोटी रूपये देण्याची तरतूद या आराखड्यात करण्यात आली आहे. असंही प्रसाद यांनी सांगितलं.
****
राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या एक लाख दहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे दोन हजार पाचशे आणि पाच हजार रूपये दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाप्रमाणे देय असलेला तीन टक्के महागाई भत्ता यावर्षी एक जानेवारीपासून देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, त्यापैकी ऑक्टोबरच्या वेतनामध्ये तीन टक्के भत्ता हा देण्यात येणार आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचा थकीत महागाई भत्ता नंतर देण्यात येईल, असंही रावते यांनी स्पष्ट केलं.
****
दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळ आजपासून पाच नोव्हेंबरपर्यंत विविध विभागातून तीन हजार पाचशे बसेस सोडणार आहे. लांब पल्याच्या जादा वाहतुकीसोबतचं स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढीनुसार उद्यापासून पाच नोव्हेंबर दरम्यान दहा टक्के हंगामी भाडे वाढ करण्याचा निर्णयही एसटीनं घेतला आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. शिवशाही, शयनयान, शिवनेरी आणि अश्वमेघ या गाड्यांना ही भाडेवाढ लागू होणार नसल्याचं एसटीच्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या ग्रामीण विकास आणि पंचायतराज विभागाला ई पंचायत राष्ट्रीय पुरस्कारानं काल गौरवण्यात आलं. पंचायतराज श्रेत्रातल्या उत्कृष्ट कार्यासाठी असलेला हा पुरस्कार, केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी ग्रामपंचायतीला नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारानंतर राज्यातल्या एक जिल्हा परिषद, दोन पंचायतसमित्या आणि १४ ग्रामपंचायतींना दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारानं  सन्मानित करण्यात आलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यात परतीचा पाऊस कालही सुरुच राहीला. सतत सुरु असलेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ होत आहे, मात्र अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु झाल्यानं काल धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या एक हजार ४० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 
लातूर जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मांजरा धरणात सोळा पूर्णांक चाळीस दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे. लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा, तेरणा आणि रेणा नदीवर बांधण्यात आलेल्या २५ बंधाऱ्यांपैकी ११ बंधारे शंभर टक्के भरले असून, मांजरा नदीवरचे तीन बंधारे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत. लातूर शहराला पेयजल पुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या नागझरी आणि साई बंधाऱ्यात जमा झालेलं पाणी महापालिकेसाठी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत.
जालना जिल्ह्यात काल सायंकाळी तीन तास सर्वदूर पाऊस झाला. या पावसामुळे सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या संत गाडगे बाबा जलाशयात प्रथमच दहा फूट पाणी आलं असून शहरातला मोती तलाव आणि मुक्तेश्वर तलावाच्या  पाणीपातळीत वाढ झाली आहे. 
नांदेड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे पिकांच अतोनात नुकसान होत आहे. नांदेड शहरात आज पहाटेही चार वाजेपासून मुसळधार पाऊस सुरू होता. जिल्हा प्रशासनानं नांदेड जिल्ह्यात पुराची शक्यता लक्षात घेऊन, नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
बीड जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे माजलगावसह अन्य प्रकल्पांच्या जलाशयात वाढ झाली आहे. अंबाजोगाईमधल्या जयवंती नदीला पूर आला आहे. 
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथलं मासोळी धरण शंभर टक्के भरलं आहे. खडकपूर्णा धरणातून पाणी सोडल्यानं जिंतूर तालुक्यातल्या येलदरी धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नेवासा इथं घर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. 
****
बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्प भरला असून, प्रकल्पाचे १९ वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं जात असल्यानं, चिखली- देऊळगाव राजा मार्गावरचा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याची सूचना खडकपुर्णा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
****
उजनी धरणातूनही भीमा नदीपात्रात ५० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची शक्यता असल्याने, पाण्याची आवक वाढल्यास, धरणातून होणारा विसर्गही वाढेल. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे.
****
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद मध्य मतदार संघातले उमेदवार कदीर मौलाना यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. सोमवारी मतदानाच्या दिवशी, एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते बोगस मतदान करत असल्याचं, पोलिसांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर वाद सुरू झाला, खासदारांनी आमच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा त्यांनी आरोप केला.
****

No comments: