Saturday, 26 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****

 भाजपनं राज्यात सत्तास्थापने संदर्भातील दावे करण्यापुर्वी शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यासंदर्भात लेखी खात्री द्यावी, असं शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांची आज मुंबईत ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या बैठकीत ठाकरे यांनी ही मागणी केल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना नमुद केलं आहे. आदित्य ठाकरे यांना नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री करावं, अशी मागणी नवनियुक्त आमदारांनी या बैठकीदरम्यान ठाकरे यांच्याकडे केली. आपल्याला `अन्य पर्याय` खुले आहेत पण शिवसेना आणि भाजप हिंदुत्ववादी विचारसरणीला बांधील असल्यामुळे या पर्यायांमध्ये आपल्याला रस नसल्याचं ठाकरे यावेळी म्हणाल्याचं आमदार सरनाईक यांनी सांगितलं.
****

 राज्यात आगामी सरकार स्थापन करणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोरचा पर्याय नसून पक्ष जनादेशानुसार विरोधीपक्षाची भूमिका बजावेल, असं पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांची आज बारामतीमध्ये भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, नवनियुक्त आमदार रोहित पवारदेखील या बैठकीत सहभागी झाले.
****

 सत्ता लोकहितासाठी राबवायला हवी मात्र जर ती विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही, हेच विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालं असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पक्षांतर करून भाजपात गेलेल्यांना जनतेनं योग्य तो धडा दिला असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. जनतेनं दिलेला कौल मान्य करून भाजपनं सत्तेपासून दूर राहायला हवं, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****

 राज्यातील नवनियुक्त भाजप आमदारांची येत्या ३० तारखेला विधीमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. विधानभवनामध्ये दुपारी एक वाजता ही बैठक होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाठिंब्यासाठी अपक्ष आणि अन्य लहान पक्षांच्या एकूण पंधरा आमदारांच्या संपर्कात असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १२२ जागा जिंकलेल्या भाजपला यावेळी १०५ जागा मिळाल्या आहेत.
****

 हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर लाल खट्टर यांच्या नावाची घोषणा केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी केली आहे. उद्या दुपारी सव्वा दोन वाजता खट्टर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य हे खट्टर यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळातल्या अन्य सदस्यांना शपथ देणार आहेत.
                                        ****

 अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. विशेषत: कोकण किनार पट्टीवरील गावांना जोरदार तडाखा बसला आहे.  येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा मुंबईच्या हवामान विभागानं  दिला आहे. अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यात परतीचा पाऊस गेल्या आठ दिवसांपासून दररोज हजेरी लावत आहे. परभणी जिल्ह्यातही आज सकाळी सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत सुरू होता. दुपारी काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात दुपारी साडे चारवाजेनंतर जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली असून अक्कलपाडा धरणातून पंधराशे दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं आहे.  पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात चार दिवसानंतर  पावसानं आज पूर्ण विश्रांती घेतली आहे. पाऊस थांबल्यामुळे  बाजारात दिवाळी खरेदीसाठी  ग्राहकांची गर्दी उसळली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी गिरीशचंद्र मुरमू यांची आणि लडाखचे नायब राज्यपाल म्हणून आर के माथुर यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती भवनानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. मिझोरामचे राज्यपाल म्हणून पी एस श्रीधरन यांची नियुक्ती झाली आहे. जम्मू-काश्मीरचे मावळते राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.  1985 च्या तुकडीतले गुजरात कॅडरचे अधिकारी असलेले मुरमू सध्या केंद्रीय अर्थमंत्रालयात विनियोजन सचिव म्हणून कार्यरत आहेत. आर. के. माथुर 1977 च्या तुकडीतले अधिकारी असून त्यांनी संरक्षण सचिव म्हणून काम पाहिलं आहे आणि ते माजी मुख्य माहिती आयुक्त आहेत.  31 ऑक्टोबरपासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार आहेत.
*****
***

No comments: