Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 23
October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्र सरकारने रबी हंगामासाठी
धान्यांच्या किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. गव्हाच्या आधारभूत किंमतीत क्विंटलमागे
८५ रुपये वाढ करण्यात आली असून, आता गव्हाचा किमान आधारभूत दर प्रतिक्विंटल एक हजार
९२५ रुपये एवढा असेल. कडधान्यांच्या दरातही क्विंटल मागे तीनशे पंचवीस रुपयांपर्यंत
वाढ करण्यात आली असून, आता मसूरचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल, तर हरबऱ्याचा दर
चार हजार आठशे पंचाहत्तर रुपये क्विंटल असेल. जव तसंच तेलबियांच्या आधारभूत दरांतही
वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद
यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भारत दूरसंचार निगम लिमिटेड
बीएसएनएल किंवा महानगर दूरसंचार निगम लिमिटेड एमटीएनएल या दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्या
बंद होणार नसल्याचं, रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं. या कंपन्यांमध्ये निर्गुंतवणुकीची
शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. या दोन्ही दूरसंचार कंपन्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी,
दोन्ही कंपन्यांचं एकत्रीकरण करणार असल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली. दूरसंचार
कंपन्यांतल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचे आकर्षक प्रस्ताव दिले जाणार असल्याची
माहिती रविशंकर प्रसाद यांनी यावेळी दिली.
तेल कंपन्यांव्यतिरिक्त
अन्य कंपन्यांनाही इंधनाची किरकोळ विक्री करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं
आजच्या बैठकीत मान्यता दिली
*****
राज्यातल्या २८८ विधानसभा
मतदारसंघांसाठीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला
सुरूवात होणार असून त्यासाठी २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात
आली आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मुंबईत पत्रकारांना
ही माहिती दिली. मतमोजणी केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या
संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल, असंही शिंदे यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात झालेल्या
परतीच्या पावसामुळे मांजरा धरणात सोळा पूर्णांक चाळीस दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला
आहे. लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा, तेरणा आणि रेणा नदीवर बांधण्यात आलेल्या
२५ बंधाऱ्यांपैकी ११ बंधारे शंभर टक्के भरले असून, मांजरा नदीवरचे तीन बंधारे पन्नास
टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत. लातूर शहराला पेयजल पुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या
नागझरी आणि साई बंधाऱ्यात जमा झालेलं पाणी महापालिकेसाठी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी
जी श्रीकांत यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या
जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्प भरला असून, प्रकल्पाचे १९ वक्राकार दरवाजे उघडण्यात
आले आहेत. पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं जात असल्याने, चिखली देऊळगावराजा
मार्गावरचा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी
बाळगण्याची सूचना खडकपूर्णा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे
****
उजनी धरणातूनही भीमा
नदीपात्रात ५० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भीमा
नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची शक्यता असल्याने,
पाण्याची आवक वाढल्यास, धरणातून होणारा विसर्गही वाढेल. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आहे.
****
पीक कापणीपासून चौदा
दिवसांच्या आत पाऊस येऊन नुकसान झाल्यास, शासनाच्या पीक विमा निर्णयामध्ये, वैयक्तिक
पंचनाम्याची तरतूद आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरातल्या पावसामुळे, काढणी झालेल्या पिकांचं
नुकसान झालेलं असल्यास, विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार करावी, तसंच विमा
भरलेल्या पावतीसह तक्रार अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करावा, असं आवाहन कृषी
विभागानं केलं आहे.
****
औरंगाबादचे खासदार इम्तियाज
जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद
मध्य मतदार संघातले उमेदवार कदीर मौलाना यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर
परिषदेत बोलत होते. परवा मतदानाच्या दिवशी, एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते बोगस मतदान करत
असल्याचं, पोलिसांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर वाद सुरू झाला, खासदारांनी आमच्या
दोन कार्यकर्त्यांना मारहाण केली, या प्रकरणी खासदारांविरोधात कारवाई न केल्यास, रस्त्यावर
उतरून आंदोलनाचा इशारा कदीर मौलाना यांनी दिला.
****
परभणी जिल्ह्यातल्या
सेलू ते पुणे या लांबपल्ल्याच्या प्रवासी बस सेवेला आजपासून प्रारंभ झाला. मराठवाडा
रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर
जोशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. दिवाळीच्या
पार्श्वभूमीवर ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.
****
पंढरपूर तालुक्यात करकंब
इथल्या विजय साखर कारखान्याचा आज लिलाव करण्यात आला. या कारखान्याने गेल्या सात वर्षांपासून
जिल्हा सहकारी बँकेचे १८३ कोटी रुपये थकले होते. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी
१२५ कोटी दहा लाख रुपयात हा कारखाना खरेदी केला.
*****
***
No comments:
Post a Comment