Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 25 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
भगवान बुद्ध
आणि महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या संघर्षमय संकंटांना दूर करण्यास मदत करतात,
असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज बिहारमध्ये राजगीर इथं विश्वशांती
स्तुपाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्तानं झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. शांतीस्तुपाचे
शांती, एकता आणि अहिंसा हे विचार भगवान बुद्धांच्या विचारांची आठवण करून देतात असंही
राष्ट्रपती म्हणाले. दरम्यान, विश्वशांतीस्तूप परिसरात आज दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमाचं
उदघाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं.
****
मुस्लिम महिलांच्या
मशीदीत प्रवेश देण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचं
मत मागवलं आहे. न्यायालयानं केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालय तसंच केंद्रीय अल्पसंख्याक
विकास मंत्रालयाला नोटीस बजावत, या प्रकरणी उत्तर देण्यास सांगितलं आहे. सरन्यायाधीश
रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती एस ए नजीर यांच्या पीठानं ही नोटीस
बजावली आहे. मुस्लीम महिलांना मशीदीत प्रवेश नाकारणं म्हणजे महिलांच्या मूलभूत हक्कांची
पायमल्ली असल्याचं, याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. यावर मुस्लिम वक्फ मंडळ आणि सरकारनं
सर्वसमावेशक तोडगा काढावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मीरच्या
कुपवाडा जिल्ह्यात तंगधार सेक्टर इथं पाकिस्तानी लष्करानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन
केलेल्या हल्ल्यात एक महिलेचा मृत्यू झाला, तर सात नागरिक जखमी झाले. भारतीय लष्करानेही
पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानी लष्करानं या भागात काल
दुपारी भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरी वसाहतीवर गोळीबार केल्याचं सुरक्षा सूत्रांनी
सांगितलं आहे.
दरम्यान, जम्मू
- काश्मीरमधे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन ट्रक चालकांचा मृत्यू झाला असून,
एक जण जखमी झाला. शोपियां जिल्ह्यातल्या चित्रगाव कलान गावात काल संध्याकाळी ट्रकमधे
सफरचंद भरत असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात चार माहवाहू वाहनं खाक
झाली.
****
आपला पराभव झाला
असेल पण आपण संपलो नसल्याची प्रतिक्रिया, सातारा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे
नेते उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. आपला पराभव झाला असला तरी आपण थांबलो नाहीत, असं
ट्वीट त्यांनी केलं आहे. या निवडणुकीत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे विजयी झाले
आहेत.
दरम्यान, हरयाणामध्ये
तीन अपक्ष आमदारांनी आज दिल्लीत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन,
भाजपला पाठिंबा दिला. अन्य आणखी एक अपक्ष आमदार नड्डा यांची भेट घेऊन पाठिंबा देणार
असल्याचं वृत्त आहे. नव्वद जागांच्या या विधानसभेत भाजप चाळीस जागा जिंकून सर्वात मोठा
पक्ष ठरला आहे तर काँग्रेसनं ३१ जागांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे.
****
अरबी समुद्रात
निर्माण झालेल्या वादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टी भागाला बसला आहे. आज
सकाळी मालवण, देवबाग, आचरा तसच अन्य समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर उधाणाचं पाणी थेट वस्तीत
घुसलं असून देवबागमध्ये घरांना पाण्यानं वेढा घातला आहे. जामडूल बेटावरच्या विहिरी
पाण्याखाली गेल्यानं पिण्याच्या पाण्याच्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जिल्ह्यात
कालपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भातशेतीचं नुकसान झालं असून
अनेक घरांना फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कोकण आणि पुणे विभागात आज
तसंच येत्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणात २१ हजार ७६० घनफूट
प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. धरणाचे १६ दरवाजे दीड फुटांनी उघडण्यात आले
असून, धरणातून २७ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात
येत असल्याची माहिती, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे
यांनी दिली आहे.
****
दिवाळीच्या सणाला
आज वसुबारस आणि धनत्रयोदशीने सुरूवात होत आहे. दीपावलीनिमित्त गृह सजावट, कपडे, फराळाचे
जिन्नस तसंच फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.
दरम्यान, दिवाळी
सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं नांदेड-पुणे-नांदेड
दरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
पुणे ते नांदेड
एक्स्प्रेस पुणे इथून आज दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि दौंड, कुर्डुवाडी,
लातूर, परळी मार्गे नांदेड इथं उद्या सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल.
****
No comments:
Post a Comment