Tuesday, 29 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.10.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
नवी मुंबईतल्या उरण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार महेश बालदी यांनी भाजपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यांनी या संदर्भातील पत्र आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या सरकारला आपण बिनशर्त पाठींबा जाहीर करतो, असं त्यांनी या पत्रात नमुद केलं आहे.
दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेचं चित्र उद्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर येणार असून, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या भेटीनंतरच या संदर्भात निर्णय होण्याचे संकेत भाजपनं दिले आहेत. राज्यात सरकार स्थापनेत शिवसेनेनं भाजपकडे समान अधिकारांची मागणी केली आहे.
****
बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण आज साजरा होत आहे. भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत बहीण आज भावाला औक्षण करते, तर बहिणीला सतत सहकार्याच्या भावनेसह भावानं बहिणीला ओवाळणी देण्याची परंपरा आहे.
****
जुना जालना भागातील नूतन वसाहतमधील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमची चोरी झाली आहे. आज सकाळी ही चोरी उघडकीस आली. या एटीएममध्ये किती रक्कम होती हे अद्याप कळू शकलेलं नाही. कदीम जालना पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात सलगच्या पावसामुळे सोयाबीन पीकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रीच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत एकशे एक्क्याण्णव मिलिमीटर पाऊस झाला आहे. बुलडाणा, नागपूर, पुणे, अकोला जिल्ह्यात सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे.
****
पंढरपूर रिसोड एस टी बसचा काल परळी शहराजवळ संभाव्य अपघात दोन तरुणांच्या सतर्कतेमुळे टळला. या धावत्या बसच्या मागच्या दोन चाकांच्या जोडीपैकी एक चाक निखळून पडल्याचं पाहताच, गणेश यतोंडे आणि रोहित सातपुते या दोन तरुणांनी बसचा पाठलाग करून ही बाब  चालकाच्या निदर्शनास आणून दिली. बसमधल्या सुमारे साठ प्रवाशांनी या दोघांनी सतर्कतेनं अपघात टाळल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
****

No comments: