आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ ऑक्टोबर २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन
दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौ-यावर आहेत. ते रियाझ इथं गुंतवणूक विषयक परिषदेत
आपले विचार मांडतील. या भेटीत मोदी, सौदी अरेबियाचे राजे,
सलमान बीन अब्दुलअजीज यांच्यासोबत द्विपक्षीय, तर युवराज
मोहम्मद बीन सलमान यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा करणार आहेत. या
भेटीदरम्यान रायगड जिल्ह्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर प्रस्तावित असलेल्या
महत्वाकांक्षी रिफायनरी प्रकल्पाला, तसंच देशात अन्यत्र
पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांमध्ये सौदी अरेबियाच्या
प्रस्तावित गुंतवणूकीला अंतिम स्वरुप दिलं जाईल, अशी माहिती
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
****
आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा साजरा होत आहे.
व्यापारी बांधवांच्या नवीन आर्थिक वर्ष विक्रम संवत २०७६ लाही आजपासून प्रारंभ होत
आहे. लक्ष्मीपूजनाचा सण काल सर्वत्र उत्सहात साजरा
झाला. सायंकाळच्या मुहूर्तावर घरोघरी पारंपारिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन करण्यात आलं.
****
शिवसेनेचे नेते दिवाकर रावते
यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा
देण्यासाठी ही भेट होती, असं रावते यांनी पत्रकारांना सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे देखील आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.
***
लातूर जिल्ह्याच्या औसा मतदारसंघातले
शेतरस्ते, पाणंद रस्ते आणि गावोगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न येत्या दोन वर्षात निकाली
काढला जाईल, असं नवनियुक्त आमदार अभिमन्यू पवार यांनी म्हटलं आहे. तालुक्यातल्या लामजना
इथं मतदारांचं आभार मानण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मतदारसंघाच्या
विकासाचा आराखडा तयार असून. मुख्यमंत्र्यांशी भेटून विकास कामाबाबत चर्चा केली जाईल,
असं औसा इथले आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
सांगलीत मध्यवस्तीत असणाऱ्या
मेहता जनरल स्टोअर्सच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत मेहता स्टोअर्स सह आजूबाजूची
चार दुकाने भासमसात झाली.
****
No comments:
Post a Comment