Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –२९ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** अवकाळी
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
** भारतीय
जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत
बैठक होणार
** अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासाचे
आमदार शंकरराव गडाख यांचा
शिवसेनेला पाठिंबा
आणि
** आज
बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण
****
अवकाळी
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला
आहे. ही नुकसान भरपाई देता यावी यासाठी या नुकसानीचे शक्य तितक्या तातडीनं पंचनामे
करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले
आहेत. गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचं
नुकसान झालं आहे. हिंगोली, परभणी, नांदेड औरंगाबाद आणि जळगावसह अनेक जिल्ह्यांत प्रामुख्यानं
मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कपाशी आणि केळीसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
****
भारतीय
जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर येणार असून, शिवसेना प्रमुख उद्धव
ठाकरे आणि त्यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतरच राज्यातल्या सत्तास्थापने संदर्भातलं चित्र
स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात
भेट घेतली. भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये राज्यात सत्तास्थापनेतल्या भागीदारीवरून
सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्र्वभूमीवर ही भेट झाली. ही सदिच्छा भेट होती, असं राजभवनातल्या
अधिकाऱ्यांनी सांगितलं.
शिवसेनेचे
नेते दिवाकर रावते यांनीही काल सकाळी राज्यपालांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा
देण्यासाठी आपण राज्यपालांना भेटलो, असं त्यांनी वार्ताहरांशी बोलतांना नमूद केलं आहे.
****
नागपूरच्या मतदारांनी देवेंद्र फडणवीस
यांना मुख्यमंत्री म्हणून नाकारलं आहे, असं फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस हे अवघ्या ४९ हजार ३४४ मताधिक्यानं निवडून आले, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत
त्यांची घटलेली जवळपास दहा हजार मतं, जनतेनं त्यांना नाकारल्याचं स्पष्ट सांगतात, असं
देशमुख यांनी म्हटल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महागाईच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरू, असं भंडारा जिल्ह्यातले
काँग्रेसचे नेते साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दिवाळीनिमित्त आपल्या
मूळगावी सुकळी इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारनं गेल्या पाच वर्षांत पाच
लाख कोटीचे कर्ज घेऊन राज्य कर्जबाजारी केल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढे आपण ८० टक्के
समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणार असल्याचं पटोले म्हणाले.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा मतदार संघाचे
आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचं पत्र गडाख यांनी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केलं. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी
काल नेवासा तालुक्यात सोनई इथं माजी खासदार यशवंतराव गडाख आणि आमदार शंकरराव गडाख यांची
भेट घेतली, त्यानंतर गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. गडाख यांना
राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीत पाठिंबा दिला होता.
****
राज्यातला सर्वात मोठा सहकारी दूध प्रकल्प
असलेल्या कोल्हापूर इथल्या गोकूळ दूध संघाने बहुराज्य संस्था नोंदणीचा प्रस्ताव रद्द
केला आहे. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी काल एक पत्रक काढून, हा निर्णय जाहीर
केला. या निर्णयाविरोधात जोरदार जनमत उभं राहिल्यामुळे संचालक मंडळानं तो रद्द केल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून,
दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या दोन वर्षांच्या लढ्याला यश आल्याचं म्हटलं
आहे.
दरम्यान,
गुळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या
कोल्हापूर इथं काल दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. यामध्ये
गुळाला विक्रमी दर मिळण्याचे संकेत मिळाले. कालच्या सौद्यात गुळाला प्रतिक्विंटल चार
हजार ते साडेपाच हजार रुपये इतका दर मिळाला. दीड हजाराहून अधिक गुऱ्हाळ असलेल्या कोल्हापूर
जिल्ह्यात यंदा महापुरामुळे गूळ निर्मितीमध्ये घट होण्याची शक्यता आहे.
****
कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरणात अभिनेत्री शिल्पा
शेट्टीचे पती उद्योगपती राज कुंद्रा यांना सक्तवसुली संचालनालयानं नोटीस बजावली आहे.
त्यांना चार नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. या प्रकरणातल्या बास्टियन
हॉस्पिटॅलिटी नावाच्या कंपनीसोबत कुंद्रा यांनी केलेल्या व्यवहारांची चौकशी होणार असल्याचं
याबबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
दिवाळीचा
पाडवा काल साजरा करण्यात आला. बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण
आज साजरा होत आहे. भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत बहीण आज भावाला औक्षण करते, तर
बहिणीला सतत सहकार्याच्या भावनेसह भावाने बहिणीला ओवाळणी देण्याची परंपरा आहे. दरम्यान,
पाडवा आणि भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर काल एसटी बस गाड्या तसंच रेल्वे गाड्यांना प्रवाशांची
गर्दी दिसून आली.
****
नांदेड जिल्ह्यात दररोज होत असलेल्या पावसामुळे लाखो एकर शेतीवरच्या सोयाबीनचं नुकसान झालं आहे.
जिल्ह्यात कापणी केलेलं सोयाबीन पाण्यावर तरंगून
कुजत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सरकारनं याची त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. या
पावसामुळे कपाशीचंही नुकसान होत आहे. कंधार तालुक्यात कपाशीच्या नुकसानाची आमदार श्यामसुंदर
शिंदे यांनी काल पाहणी केली.
देगलूर मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी काल देगलूर
आणि बिलोली तालुक्यात अतिवृष्टीमूळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. या भागातल्या
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डे यांनीही काल सोनखेड
इथं पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पीक नुकसानीचे पंचनामे करतांना एकही शेतकरी विसरु
नये, अशी सूचना त्यांनी कृषि विभागाचे कर्मचारी आणि तलाठी यांना केली.
****
हिंगोली
जिल्ह्यात सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश कळमनुरीचे
तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी कृषी विभागाला दिले आहेत. कळमनुरी तालुक्यात सांडस,
डोंगरगाव पूल, शेवाळा या भागात सोयाबीनचं मोठं नुकसान झालं असून, कापलेल्या सोयाबीनला
कोंब फुटले आहेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यासह तहसीलदार वाघमारे यांनी काल
या भागातल्या नुकसानाची पाहणी केली, त्यानंतर हे आदेश दिले.
****
परभणी
जिल्ह्यातही पिकांचं मोठं नुकसान झालं असून, या नुकसानाचे पंचनामे करावेत, तसंच शेतकऱ्यांना
नुकसान भरपाई पोटी त्वरित २५ हजार रुपये द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या
वतीने काल परभणी - वसमत मार्गावर दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे
या मार्गावरची वाहतुक विस्कळीत झाली होती. प्रशासनानं दखल घेतल्यानंतर हे आंदोलन मागे
घेण्यात आलं, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दसरा दिवाळीच्या उत्सवात झेंडूच्या फुलांना
मोठी मागणी असते. मात्र मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तर, फुलांचे दर घसरून शेतकऱ्यांचं
मोठं नुकसान होतं. हिंगोली शहरात मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडू फुलांसंदर्भात
नागरिकांनी अनोखं अभियान राबवलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर रमेश
कदम.
हिंगोली येथील गांधी चौकात समाजशील शिक्षकांना अण्णा
जगताप यांच्या पुढाकाराने झेंडूची फुले अभियान राबविले गेले त्यानुसार नोकरदार, व्यापारी,
साहित्यिक, तरुणांनी शेतकऱ्यांकडून फुले विकत घ्यावेत व किमान ५० रुपये किलोने स्वतःहून
दर द्यावा असे आवाहन केले गेले शेकडो डॉक्टर,
नोकरदार, तरुणांनी या अभियानात साथ देऊन झेंडूची फुले खरेदी केली त्यामुळे झेंडू फुले
उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला हे अभियान हिंगोली सह वसमत, शेनगाव, परभणी
येथे ही राबविली गेले शेतकऱ्यांच्या श्रमाला किंमत देण्यासाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त
ठरले आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या
दरेगाव इथं मागील काही वर्षांपासून आगळ्या वेगळ्या दिवाळी कार्यक्रमाचं आयोजन केलं
जातं. या उपक्रमातंर्गत यंदा शेतकरी बांधवांना शेतात लागवडीसाठी रोपं, वाचनासाठी ग्रंथ
तसंच गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट स्वरुपात देण्यात आलं. सांस्कृतिक
कार्यक्रम तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
****
नाशिक
शहरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल दुपारनंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं. जिल्ह्यातल्या खरीप पिकांचं या पावसामुळे
नुकसान झालं आहेच शिवाय फुल शेतीलाही या पावसाचा फटका बसल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. औरंगाबाद शहरातही काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्री जोरदार पाऊस झाला.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. गुजरातच्या कच्छ भागातून
कळमनुरी तालुक्यातल्या कवडी शिवारात मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळांची चार मुलं
अंघोळीसाठी डोहात उतरली, यापैकी अनुक्रमे आठ आणि बारा वर्ष वयाची दोन मुलं पाण्यात बुडून
मरण पावली, काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
****
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या आरळी इथं पाण्यात बुडून
पितापुत्रांचा मृत्यू झाला. शादुल सय्यद आणि त्यांचा मुलगा मेहराज सय्यद काल सकाळी
शेतीच्या कामासाठी जात असतांना रस्त्यातल्या नाल्यात मुलगा पाय घसरून पडला, त्याला
वाचवण्यासाठी वडील पाण्यात उतरले असता दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment