Thursday, 31 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१  ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
** देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या तर अजीत पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड
** शिवसेना आणि काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांच्या निवडीसाठी आज नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक
** लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात एकता दौड
आणि
** राज्यात कालही अनेक भागात पाऊस; वीज पडून बारा जणांचा मृत्यू
****
भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी अजीत पवार यांची निवड झाली आहे. मुंबईत विधानभवनात काल भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला ११ आमदारांनी अनुमोदन दिलं. या निवडीबरोबरच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचं सांगत गेल्या ५ वर्षांपेक्षा अधिक चांगलं काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्याही नवनिर्वाचित आमदारांची काल मुंबईत पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली, या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्षाची भुमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत जनतेनं विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी दिली आहे असं पाटील म्हणाले. आपला पक्ष राज्य सरकारनं केलेल्या चुका दाखवून देईल, असं  पक्षाचे नवनिर्वाचित विधीमंडळ  नेते अजित पवार यांनी सांगितलं. सरकार योग्य दिशेनं काम करत आहे काय, याकडे आपण लक्ष ठेऊ तसंच समाजातल्या कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊ, असंही पवार यांनी यावेळी नमूद केलं.
****
शिवसेना विधिमंडळ गटनेत्याची आज निवड करण्यात येणार आहे.  पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत दादरच्या शिवसेना भवनमध्ये बैठक होणार आहे,  या बैठकीला शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदारही उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आगामी सरकारमधील सहभाग आणि सत्तावाटप याबाबत सेना-भाजप  महायुतीतल्या मित्रपक्षांची बैठकही आज सकाळी अकरा वाजता मुंबईत  होणार आहे. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यात सहभागी होणार आहेत.
****
धुळे जिल्ह्यातल्या साक्री विधानसभा मतदार संघाच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित आणि जळगाव जिल्ह्यातले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.
****
काँग्रेस पक्षाचाही गटनेता निवडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज मुंबईत नवनिर्वाचित आमदारांची बैठक होत आहे.
दरम्यान, राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार आहे. काल, मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
****
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. यानिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरात सकाळी क्रांतीचौकातून ही दौड काढण्यात आली. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. उस्मानाबाद शहरातही सध्या एकता दौड सुरू आहे. जालना इथं सकाळी आठ वाजता मम्मादेवी जवळच्या  सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत तर बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान एकता दौड काढण्यात येणार आहे.
परभणीत सकाळी साडेसात वाजता राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान एकता दौड निघणार आहे. याबरोबरचं राष्ट्रीय एकात्मतेची शपथही घेण्यात येणार आहे.
लातूरमध्ये जिल्हा क्रीडा संकुल शिवाजी चौक ते हुतात्मा स्मारका दरम्यान  सकाळी साडेसात वाजता एकता दौड काढण्यात येणार आहे. नांदेड आणि हिंगोली शहरातही एकता दौड काढण्यात येणार आहे. 
****
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीही आज पाळली जात आहे. यानिमित्त देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी अंगरक्षकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
****
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू करण्यात आलेली आचारसंहिता काल मागे घेण्यात आली. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच २१ सप्टेंबरपासून ही आचारसंहिता लागू करण्यात आली होती. नव्यानं निवडून आलेल्या आमदारांची अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगानं राज्यपालांना सादर केल्यानंतर ही आचारसंहित काल मागे घेण्यात आली.
****
राज्यातल्या बँकांच्या कामकाजांच्या वेळेत उद्यापासून बदल होणार आहे. राज्य स्तरीय बँक समिती आणि इंडियन बँक असोसिएशनने ग्राहकांच्या सोयीसाठी बँकांच्या कामकाजांचं तीन प्रकारे वर्गीकरण केलं आहे. रहिवासी क्षेत्रातल्या बँकांची वेळ ग्राहकांसाठी सकाळी ९ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे, व्यापारी क्षेत्रातल्या बँकांची वेळ सकाळी ११ ते दुपारी पाच वाजेपर्यंत आणि इतर बँकांची वेळ सकाळी १० ते पाच वाजेपर्यंत असणार आहे. यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बँकांची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत असणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
नाशिक, सोलापूर, सातारा, अमरावतीसह मराठवाड्यातल्या परभणी, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात अनेक भागात काल पुन्हा पाऊस पडला. परभणी शहर, जिंतूर, सोनपेठ, पालम तसंच नांदेड जिल्ह्यात नांदेड, किनवट तसंच हिमायतनगर भागात हा पाऊस पडला.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी सरसकट पंचनामे करण्याची मागणी पालम तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
लातूर जिल्ह्यातही काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, दरम्यान, जिल्ह्यातल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बीड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल आढावा घेतला.
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाही तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी तसंच पिक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. देगलूर आणि बिलोली तालुक्यातल्या नुकसानीची तत्काळ भरपाई द्यावी या मागणीसाठी देगलूर तहसील कार्यालयासमोर आमदार रावसाहेब अंतापूरकर आणि शेतकऱ्यांनी काल धरणं आंदोलन केलं.
जिल्ह्यात हिमायतनगर शहरात काल झालेल्या पावसामुळे आठवडी बाजारातल्या छोट्या व्यापाऱ्यांचं मोठ नुकसान झालं.
****
राज्यात काल विविध ठिकाणी वीज पडून बारा जणांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात अमरावती -अचलपूर महामार्गावर असेगाव पूर्णाजवळ वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. अकोला जिल्ह्यात  तेल्हारा तालुक्यात शेतात वीज कोसळून बारा वर्षीय मुलीसह  तीन जण ठार तर, अकोट तालुक्यात एक शेतमजुर  मृत्यू पावला तर एक जण जखमी झाला. यवतमाळ जिल्ह्यात लोण बेहळ इथं वीज पडून एक तरुण दगावला.
नांदेड तालुक्यातल्या शिरपली शिवारात अंगावर वीज पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. किनवट तालुक्यात देहली शिवारातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी शेतात बैलं चारत असलेल्या युवकाच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला.
सोलापूर तालुक्यात बीबी दारफळ इथं एका नऊ वर्षीय मुलीचा अंगावर वीज पडून मृत्यु झाला.
****
पन्नास कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, वनसंरक्षक नितीन गुदगे, विशेष कार्य अधिकारी आर. एस. दावलवार यांचा समावेश असलेली ही समिती पाच नोव्हेंबरपर्यंत हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या ग्रामपंचायतीनं लागवड केलेल्या वृक्षांची पाहणी करणार आहे.
****
उस्मानाबादमध्ये दिवंगत शंकरराव धाराशिवकर स्मृती प्रतिष्ठाणच्यावतीनं शासकीय रूग्णालयात दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्मलेल्या दहा मुलींच्या नावे प्रत्येकी सात हजार रूपयांची मुदत ठेव ठेवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. धाराशिवकर कुटुंबियाच्यावतीनं दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.
****
बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात सिरसमार्ग इथं शेत तळ्यात बुडून दोन भावांचा काल मृत्यू झाला. विकास ठोंबरे आणि गणेश ठोंबरे अशी मृतांची नावं आहेत. हे भाऊ आपल्या शेतात गेले असता तिथल्या शेततळ्यात एकाचा पाय घसरून पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दुसराही पाण्यात उतरला होता. काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती मादळमोही पोलिसांनी दिली आहे.
****
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सहा नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करण्याची मुदत असल्याची माहिती विभागीय आयुक्त तसंच मतदार नोंदणी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी दिली. या मतदारांची प्राथमिक यादी तेवीस नोव्हेंबरला आणि अंतिम यादी तीस डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी या संदर्भात कळवलं आहे.
****


No comments: