Sunday, 27 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****

 प्रकाशाचा आणि तेजाचा सण दिवाळी, आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. आज नरकचतुर्दशी निमित्त पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे. संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची दिवाळी पहाट अनेक ठिकाणी रंगली. दिवाळीच्या काळातला मुख्य विधी असलेला लक्ष्मीपूजनाचा सणही आज साजरा होत आहे. आपल्या उद्योग - व्यवसायाची भरभराट व्हावी, घर धनसमृद्ध व्हावं यासाठी देवी लक्ष्मीचं, तसंच घरातल्या पैसे, दागिने आणि संपत्तीचं पूजन केलं जातं आहे. रोखे  बाजारातही आज संध्याकाळी मुहुर्ताची विशेष सत्रं चालणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. सैनिकांशी बोलताना पंतप्रधानांनी त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल देशवासीयांतर्फे त्यांचं आभार मानलं. सैनिकांची जागरुकता आणि शौर्य यामुळे देश सुरक्षित असल्याचं पंतप्रधानांनी यानिमित्त एका संदेशात म्हटलं आहे.  
****

 भाजपला लोकसभे प्रमाणे विधानसभा निवडणुकीत यश नं मिळाल्यानं आपण चिंतेत असून याचं आत्मचिंतन करू असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील पश्चिम भागात बंडखोरांमुळं भाजपचं नुकसान झाल्याचं त्यांनी नमुद केलं. कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांत भाजप सरकारनं अत्यंत प्रामाणिकपणे कामं केली मात्र आमचं नेमकं काय चुकलं, हे जनतेनं सांगावं, त्यात सुधारणा करू, असंही पाटील यावेळी म्हणाले. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला उघडपणे मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. सोयीचं राजकारण करणाऱ्या मंडलिक यांच्यासंदर्भात शिवसेनेनं विचार करावा, असं ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये झालेल्या पराभवानं खचून न जाता शिवसेना-भाजप शून्यातून पुन्हा उभी राहील, असंही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****

 नाशिक विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज अचानक शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत आज दुपारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना `शिवबंधन` बांधलं. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यावेळी प्रमुख उपस्थित होते.
****

 मनोहर लाल खट्टर यांनी आज सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चंदीगड इथं राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी त्यांना शपथ दिली. भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा या शपथवीधीला उपस्थित होते.
****

 मध्यपूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्तिशाली ‘कयार’ या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून ते वायव्येला ओमानच्या दिशेनं सरकत आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच गोवा, कर्नाटक आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
****

 भारतीय नौदलाच्या तेज या जहाजानं मुंबई किनाऱ्यापासून जवळ समुद्रात आपदग्रस्त झालेल्या `वैष्णोदेवी माता` या मच्छिमार नौकेवरुन सतरा मच्छिमारांची सुखरुप सुटका केली आहे. या नौकेचं इंजिन बिघडलं होतं. त्यात पाणी शिरायला लांगलं होतं. त्यावेळी नौदलानं ही मोहीम राबवली.
****

 हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यांत काल रात्री झालेल्या वादळी मुसळधार पावसानं सोयाबीन, केळी  तसंच अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दांडेगाव परिसरातही सोयाबीन, कापूस, तूर ज्वारी यासह प्रामुख्यानं केळी तसंच उसाचं मोठं नुकसान झालं आहे.
****

 जालना तसंच औरंगाबाद  जिल्ह्यात गेल्या आठवडाभर असलेलं पावसाळी वातावरण बदलून आज कडक ऊन पडलं होतं. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
*****
***

No comments: