Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –२८ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** सणांची खरेदी
करताना स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याची पंतप्रधानांची सूचना
** लक्ष्मीपूजनाचा
सण सर्वत्र उत्साहात साजरा
** राज्यात कोकण
आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस; अन्य भागात मात्र विश्रांती
आणि
** फ्रेन्च खुल्या
बॅटमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपद
****
सणांच्या निमित्तानं
खरेदी करताना स्थानिक उत्पादनांना प्राधान्य
देण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केली. सणांमुळे
लोकांच्या जीवनात एक नवा उत्साह निर्माण होतो, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी
देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जीवनात आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारा आणि
सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणारा असा दिवाळीचा सण असून, यावेळी आपण त्याचा आनंद
सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. देशवासियांनी
आपल्या मुलींच्या कर्तृत्वाचा सन्मान करून, नारीशक्ती म्हणजेच महिलांचं सामर्थ्य आणि
कामगिरी यांचा गौरव करण्याचं आवाहन त्यांनी केलं. 'भारत की लक्ष्मी' या उपक्रमाबाबत
जनतेशी संवाद साधल्यावर, देशभरातून या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत
असून अनेक कर्तृत्ववान महिलांची माहिती जनतेकडून आपल्यापर्यंत पोहोचत आहे असं ते म्हणाले.
लोकांना एकत्र आणण्याचं आणि विरोधी विचारसरणी
असलेल्यांमध्येही सहमती निर्माण करण्याचं दुर्मिळ कसब सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात
होतं, असं ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांनी
काल जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ सैन्यदलाच्या जवानांसोबत
दिवाळी साजरी केली.
****
भारतीय जनता
पक्षाचे नेते मनोहरलाल खट्टर यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून काल दुसऱ्यांदा शपथ
घेतली. तर दुष्यन्त चौटाला यांनी उपमुखमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन इथं झालेल्या
या शपथविधी सोहळ्याला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते. भाजपनं, जननायक जनता पार्टी आणि सहा अपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन
केलं आहे.
****
महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारांपैकी
आतापर्यंत भारतीय जनता पक्षाकडे २० तर शिवसेनेकडे पाच अपक्ष आमदार आले असल्यामुळे भाजप
शिवसेना महायुतीचं संख्याबळ अधिक मजबूत झालं असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत
पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात बहुतांश
ठिकाणी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरूद्ध झालेल्या बंडखोरींमुळे विधानसभा निवडणुकीत
भाजप- शिवसेना महायुतीला लोकसभेप्रमाणे अपेक्षित यश मिळालं नाही, असं ते म्हणाले. कोल्हापूरचे
शिवसेनेचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा उघड प्रचार
केल्याच्या घटनेचीही गंभीर दखल घेण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
भाजपच्या दोन बंडखोरांसह तीन आमदारांनी काल भाजपला
पाठिंबा जाहीर केला. यामध्ये मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार पूर्वाश्रमीच्या भाजपच्या
महापौर गीता जैन, बार्शी इथले आमदार राजेंद्र राऊत आणि अमरावती जिल्ह्यातल्या बडनेराचे
आमदार युवा स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख रवी राणा यांचा समावेश आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे
प्रमुख अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी मेळघाटचे
आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यापूर्वी रामटेकमधून
निवडून आलेले आशिष जयस्वाल आणि भंडाऱ्यातून निवडून आलेले नरेंद्र भोंडेकर या दोन अपक्ष
आमदारांनी सेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.
विधानसभा निवडणुकीत
भारतीय जनता पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून
निवडणूक लढवणारे नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी काल अचानक शिवसेनेत प्रवेश
केला. मुंबईत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार
संजय राऊत उपस्थित होते. गेल्या तीस वर्षांपासून भाजप मध्ये असलेल्या सानप यांनी नाशिकचे
महापौर, उपमहापौरपद भूषविले होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पूर्व मतदार संघातून
ते भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. यावेळी उमेदवारी नाकारल्यामुळे
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र अटीतटीच्या लढतीत
त्यांचा भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी पराभव केला.
****
लक्ष्मीपूजनाचा
सण काल सर्वत्र उत्सहात साजरा झाला. सायंकाळच्या मुहूर्तावर घरोघरी पारंपारिक पद्धतीनं
लक्ष्मीपूजन करण्यात आलं. आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा साजरा होत आहे. व्यापारी
बांधवांच्या नवीन आर्थिक वर्ष विक्रम संवत २०७६ ला ही आजपासून प्रारंभ होत आहे.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
क्यार चक्रीवादळाच्या
परिणामी कोकणासह मराठवाड्यात कालही अनेक भागात पावसाने हजेरी लावली. नांदेड शहरासह
अर्धापूर, मुदखेड या तालुक्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. यापावसादरम्यान शहरातला
विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे दिवाळीच्या लक्ष्मीपूजन जनतेला अंधारात उरकावे लागले.
जिल्ह्यात आठ दिवसांपासून दररोज होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, संकरीत ज्वारी
या पिकाचं मोठ नुकसान झालं आहे. या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील
कळमनुरी, वसमत तालुक्यांत काल रात्री झालेल्या वादळी मुसळधार पावसानं सोयाबीन, केळी
तसंच अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दांडेगाव परिसरातही सोयाबीन,
कापूस, तूर ज्वारी यासह प्रामुख्यानं ऊस तसंच केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
झालं, याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे हिंगोलीचे वार्ताहर रमेश कदम
हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे केळीचे
मोठे नुकसान झाले आहे. केळीला व्यापार दर अधिक असतांना शेतकऱ्यांचे कंम्बरडे मोडणारे
आहे. कापसाला आलेली बोंडे सडून गेली आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यामुळे पाऊस वेदनादायी ठरला
आहे. जिल्ह्यात कळमनुरी शेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात झेंडू फुलाचे उत्पादन घेतले
जाते. ऐन दिवाळीत झेंडूची फुले नासत असून पाच रुपये दराने फुले विकली जात आहेत. पावासाच्या
या उच्यातामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
परभणी जिल्ह्याच्या
पालम तालुक्यात गेल्या नऊ दिवसापासून पाऊस चालू आहे. तालुक्यातल्या प्रमुख तीन नद्या
आणि गोदावरी नदीसह ओढ्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यात हाहाकार उडाला आहे.
तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं
आहे. काल सायंकाळनंतर मात्र पावसानं उघडीप दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यात
आठवडाभरापासून सुरू असलेला पाऊस काल थांबला आणि सर्वत्र कडक ऊन पडलं. त्यामुळे दिवाळीच्या
खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती.
औरंगाबाद शहर
परिसरातही काल पावसानं विश्रांती घेतल्यानं सूर्यदर्शन झालं, त्यामुळे नागरिकांनी लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याचं
दिसून आलं.
परभणी जिल्ह्याच्या
जिंतूर तालुक्यात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या
पिकांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी, शेतीचे पंचनामे करून घ्यावेत, असं आवाहन जिंतूरचे
तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी केलं आहे. याबाबतचा अर्ज विमा भरलेल्या पावतीसह तालुका
कृषी अधिकारी कार्यालयात तत्काळ अर्ज सादर करावेत, असं सूचित करण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
सततच्या पावसामुळे होत असलेल्या खरीप पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची
मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक
विमा योजनेतून नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या
निवेदनात केली आहे.
****
वाशिम जिल्ह्यात
काल पावसानं काही काळ उघडीप दिली, त्यामुळे लोकांची बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी झुंबड
उडाली होती.
दरम्यान, जिल्ह्यात
सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी
कापलेलं सोयाबीन मातीमोल ठरलं. हजारो हेक्टर्समध्ये उभ्या असलेल्या सोयाबीनच्या सुड्या पावसात भिजल्यामुळे काळ्या पडल्या असल्याचं शेतकऱ्यांनी
सांगितलं. शेतात उभ्या ज्वारीच्या कणसाला कोंबं फुटले असून भरात असलेलं तूरीचं पीकही
पावसानं धोक्यात आल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
****
जळगाव जिल्ह्यातही
वादळी पावसामुळे कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीनसह केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं
आहे. कापणीस तयार असलेले केळीचे घड वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले आहेत. जिल्ह्याच्या
भुसावळ तालुक्यातल्या हतनूर आणि वाघूर धरणांच्या लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस
झाल्यामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने हतनूर
धरणाचे दोन तसंच वाधूर धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणातून काल रात्री सव्वीस हजार सातशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी पात्रात
विसर्ग सुरू होता. धरणाचे सोळा दरवाजे दीड फूट उघडून हा विसर्ग केला जात आहे.
****
सात्विक साईराज
आणि चिराग शेट्टी जोडीला फ्रेन्च खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावं
लागलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग जोडीला इंडोनेशियाच्या मार्कस
फर्नाल्डी गिडोन और केविन सुकामुल्जो जोडीने
१८-२१, १६-२१ अशा फरकानं पराभूत केलं. फ्रेन्च खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारतीय बॅटमिंटनपटू
पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती.
****
No comments:
Post a Comment