Monday, 28 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****

 राज्य सरकारनं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. ही नुकसान भरपाई देता यावी यासाठी या नुकसानीचे शक्य तितक्या तातडीनं पंचनामे करा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्य सचिवांना सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील काही भागात मान्सून नंतर झालेल्या मुसळधार पावसानं पिकांचं नुकसान केलं आहे. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानं याची माहिती दिली आहे. हिंगोली, परभणी, औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यांच्या काही भागांत गेल्या काही दिवसांतील पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे.
****

 परभणी जिल्ह्यातील सोनपेठ इथं  काल दुपारी सततच्या पावसामुळं एका घराची भींत कोसळून पिता, पुत्राचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात कालवा ओलांडताना एक जण बुडाल्याची दूर्घटनाही घडल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कवळीशिवारात पाण्याच्या डोहामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या मेंढपाळाच्या दोन मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही दूर्घटना झाली.
****

 हिंगोली जिल्ह्यात या पावसानं सोयाबीनचं मोठं नुकसान केलं असल्यानं कळमनुरीचे नवनियुक्त आमदार संतोष बांगर यांनी तहसीलदारांसह सांडस, डोंगरगावपूल, शेवाळा येथील नुकसानीची पाहणी केली. कृषी विभागाला यावेळी पंचनाम्याच्या सूचना करण्यात आल्या.
****

 ांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील शिवारात पावसामुळं झालेल्या नुकसानीची आज नवनियुक्त आमदार शामसुंदर शिंदे यांनी पाहणी केली.
****

 जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यान आज जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ जिल्हाभरात झालेल्या नुकसानचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना दिल्या आहेत.  
****

 जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातल्या हतनूर आणि वाघूर धरणांच्या लाभक्षेत्रातही पावसानं  थैमान घातलं आहे. धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यानं हतनुरचे दोन तसंच वाघूर धरणाची पाणी पातळी धोक्याबाहेर जात असल्यामुळे वीसही दरवाजे उघडण्यात आले आहेत.
****

 नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या दरेगाव इथं मागील काही वर्षांपासून आगळ्या वेगळ्या दिवाळी कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. या निमित्त गावातील शेतकरी बंधूंना शेतात लागवडीसाठी रोपं, वाचनासाठी ग्रंथ तसंच गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट स्वरुपात देण्यात आली आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
****

 गुळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या कोल्हापुरमध्ये आज दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गूळ सौदे काढण्यात आले. यामध्ये गुळाला विक्रमी दर मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. आज काढण्यात आलेल्या गूळ सौद्या मध्ये गुळाला प्रतिक्विंटल चार हजार ते साडेपाच हजार रुपये इतका दर मिळाला. महापुरामुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यात गुळ निर्मितीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दीड हजाराहून  अधिक गुऱ्हाळ घरं चालतात.
****

  नाशिकमध्ये पाडवा पहाटनिमित्त आज संस्कृती या संस्थेच्या वतीन ओंकार दादरकर यांची मैफिल रंगली. शहरातील गंगापूर रोड भागात पद्मजा फेणानी यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. नाशिकरोड, इंदिरा नगर परिसरातही संगिताचे कार्यक्रम झाले.
****

 गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी `गुडविन ज्वेलर्स` च्या दोन मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे भागात या आभुषणांच्या दालनाची साखळी आहे. ही दुकानं अचानक बंद झाल्यानं गुंतवणुकदारांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****

 नाशिक जिल्ह्याच्या पेठ शहरात अज्ञात वाहनाच्या धडकेनं दोन दुचाकीस्वारांचा मृत्यु झाला. काल रात्रीत झालेल्या या अपघातप्रकरणी पोलिसानी गुन्हा नोंदवला आहे.
*****
***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...