Saturday, 26 October 2019

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 26.10.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****
** राज्यभरात पावसाचा जोर कायम; मराठवाड्यात बीड तसंच परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी
** सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; मात्र पाणीटंचाईचं सावट काही प्रमाणात दूर
** भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्ट
आणि
** धन्वंतरी पूजनाने कालपासून दिवाळीला प्रारंभ
*****

राज्यभरात पावसाचा जोर कायम आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात काल मोठा पाऊस झाला, बीड तसंच परभणी जिल्ह्याच्या काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यातल्या चिंचवण इथं मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत खचून अंगावर पडल्यानं एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक महिला आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले. बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून, या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीवर परिणाम दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यात झालेल्या पावसानं लेंडी नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं पालम - फळा, पालम-ताडकळस मार्ग बंद झाले आहेत. परभणी जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत ७३६ पूर्णांक ७४ मिलीमिटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ९६ पूर्णांक चार दशांश टक्के पाऊस झाला आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधिक ८९१ पूर्णांक ६५ मिलीमीटर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

जालना जिल्ह्यात कालही जोरदार पाऊस झाला, जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६८८ पूर्णांक २१ मिलीमीटर असून, आजपर्यंत जिल्ह्यात ७१९ पूर्णांक ४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात सर्वाधिक १४४ टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मागील सहा वर्षांनंतर यावर्षी पावसानं प्रथमच वार्षिक सरासरी ओलांडली असून, कायम दुष्काळी भाग असलेल्या जालना जिल्ह्याला या दमदार पावसामुळे मोठा दिलासा मिळाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नांदेड जिल्ह्यातही काल सायंकाळपासून पाऊस सुरू होता, औरंगाबाद शहर परिसरातही रात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता.
सततच्या पावसामुळे मका, बाजरी या काढणी झालेल्या पिकांसह कपाशीचंही काही भागात नुकसान झालं आहे, मात्र त्याचवेळी जलसाठ्यात वाढ होत असल्यामुळे, पाणीटंचाईचं सावट काही प्रमाणात दूर झालं आहे. बीड, जालना जिल्ह्यांसह विभागात अनेक जलप्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे, नदी नाले खळाळून वाहत असून विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या संत गाडगेबाबा जलाशयात सतरा फूट पाणी साठा झाला आहे.
लातूर शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणीपातळीही २० दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढ झाली आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणाचे सोळा दरवाजे तीन फूट उघडून सुमारे ५२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडी धरणात सध्या पन्नास हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्यामुळे, धरणातून होणारा विसर्ग पुढचे काही दिवस कायम राहणार असल्याचं, संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
राज्य विधानसभेच्या निवडणुकीत यंदा २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या विधानसभेच्या तुलनेत ही संख्या दोनने अधिक आहे. विधानसभेच्या एकूण तीन हजार दोनशे सदतीस उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या दोनशे पस्तीस एवढी होती. निवडून आलेल्या २४ महिला आमदारांपैकी पन्नास टक्के महिला आमदार प्रथमच सदनात दाखल होणार आहेत. भाजपने सतरा महिलांना उमेदवारी दिली होती, त्यापैकी बारा महिला निवडून आल्या, तर शिवसेनेनं आठ महिला उमेदवारांपैकी दोघींनी विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या चौदापैकी पाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ पैकी तीन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. याशिवाय दोन अपक्ष महिला उमेदवारही विजयी झाल्या आहेत.
****
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी काल मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना, शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा, प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, रमेश कोरगावकर यांनी व्यक्त केली. तडजोडीचं सूत्र काय असेल ते पक्षप्रमुख ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील, ते सूत्र सर्व शिवसैनिकांना मान्य असेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
****
शिवसेना भाजपनं मिळून लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन करावं, तसंच भारतीय रिपब्लिकन पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मुंबईत भेट घेतली आणि ठाकरे यांचं अभिनंदन केलं, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार श्यामसुंदर शिंदे हे भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल ही माहिती दिली.
****
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याचा काहीही विचार नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याचं काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे, असं त्यांनी सांगितल्याचं पीटीआयचं वृत्तात म्हटलं आहे. दहा अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असून, त्यांना विरोधी पक्षात सामील व्हायचं असल्याचं थोरात यांनी सांगितल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.
****
निवडणुकीआधी राज्यभरात फिरताना वास्तव स्पष्ट दिसत होतं, त्यामुळे मतदानोत्तर अंदाज पाहून अस्वस्थ झालो नाही, किंवा चिंताही वाटली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल बारामतीत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र वास्तव चित्रं दाखवण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांनी पाळली नाही, असंही पवार म्हणाले. शिवसेनेच्या जागा कमी कशा होतील, यासाठी भाजपाने प्रयत्न केले, असा आरोप त्यांनी केला. निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही मेहनत केली, त्यामुळे आघाडीला मिळालेलं यश फक्त आमच्यामुळे मिळालं, असं म्हणणं योग्य होणार नाही, असं पवार यांनी नमूद केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
दिवाळीला कालपासून प्रारंभ झाला. धन्वंतरी जयंती निमित्त काल सायंकाळी धन्वंतरी पूजन करण्यात आलं. केंद्र शासनाच्या आयुष विभागानं धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत कोकण भवन इथं विभागीय आयुर्वेद कार्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. निरामय चिरजीवनासाठी आयुर्वेद हे या दिवसाचं यंदाचं घोषवाक्य आहे. धनत्रयोदशीनिमित्ताने सोन्याचांदीच्या आभुषणांसह वाहनं, विद्युत उपकरणं तसंच इतर खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये काल नागरिकांची गर्दी दिसून आली.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्वांच्या जीवनात आनंद, संपन्नता आणि सुख-शांती घेऊन येवो, हा सण साजरा करताना गरीब, उपेक्षित आणि निराधार लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करु या, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****

औरंगाबाद इथल्या हर्सुल कारागृहात कैद्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलं आहे. कारावास पूर्ण करून तुरुंगाबाहेर पडल्यावर संबंधित व्यक्तीला स्वत:च्या पायावर उभं राहाता यावं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कैद्यांसाठी असा उपक्रम राबवणारं हे राज्यातलं पहिलं कारागृह ठरलं आहे. सध्या या केंद्रात शिवणकाम, संगणक हाताळणी, विद्युत उपकरणजोडणी, नळदुरुस्ती, आदी दहा अभ्यासक्रम शिकवले जात असून, प्रत्येक अभ्यासक्रमाला सात ते आठ कैद्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांना चक्राकार अर्थव्यवस्था समजावून अर्थव्यवस्थेची नवी दिशा देण्याची गरज नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय कोरडवाहू समितीचे अध्यक्ष अशोक दलवाई यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या किसान आधार संमेलनात ते काल बोलत होते. शेतीमधल्या नैसर्गिक उर्जा स्त्रोतांचं पुनरुज्जीवन करुन भविष्यात शेती चांगल्या स्थितीत राहू शकेल, पर्यायानं मानवाचं जीवनमान उंचावेल असं, दलवाई यांनी नमूद केलं. 
****
लातूर जिल्ह्यात सार्वजनिक क्षेत्रातल्या १७ बॅंकांचे व्यव्हार आता सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहेत. जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीनं हा निर्णय घेतला आहे. येत्या ११ नोव्हेंबर पासून या बॅंकांच्या व्यवहाराची वेळ असणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळीचे नवनिर्वाचित आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी काल माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन केलं. आपले वडील आणि काकांनी दिलेला जनसेवेचा आणि जन संघर्षाचा वारसा सोडणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.
****
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोडे यांचा काल राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं नांदेड-पुणे-नांदेड दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काल पुण्याहून नांदेडला आलेली गाडी, आज सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी पुण्यासाठी निघेल, आणि रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. १५ नोव्हेंबरला अखेरची गाडी पुण्याहून नांदेडला सुटणार आहे.
****
हिंगोली इथं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत कंत्राटी समूह सहाय्यक संदीपकुमार राठोड याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल रंगेहात पकडण्यात आलं. शेतात बसवलेल्या विद्युत पंपाचं अनुदान मंजूर केल्याबद्दल त्यानं ही लाच मागितली होती.
//**********//

No comments: