Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –23 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३
ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
भारतीय
क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयच्या
अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आज मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात गांगुली यांनी
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. अध्यक्षपदासाठी गांगुली यांचा एकमेव अर्ज आल्याने,
त्यांची बिनविरोध निवड झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची
मंडळाच्या सचिवपदी, माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धूमल यांची मंडळाच्या
कोषाध्यक्षपदी, तर जयेश जॉर्ज यांची सहसचिव पदी निवड झाली आहे, त्यांनीही आज पदभार
स्वीकारल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
माजी केंद्रीय
मंत्री पी चिदंबरम यांच्या विरोधात मून टेक्नॉलॉजी कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल
केलेल्या याचिकेबाबत, न्यायालयाने चिदंबरम यांना शपथपत्र दाखल करण्यास सांगितलं आहे.
चिदंबरम हे अर्थमंत्री असताना, त्यांनी आणि त्यांच्या मंत्रालयातल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
पाच हजार सहाशे कोटी रुपयांच्या एन एस ई एल घोटाळ्याप्रकरणी आपल्याविरोधात द्वेषबुद्धीने
कारवाई केल्याचा आरोप मून टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या याचिकेत केला आहे. या प्रकरणी
नुकसान भरपाई पोटी दहा हजार कोटी रुपयांची मागणी या कंपनीने आपल्या याचिकेतून केली
आहे.
दरम्यान,
चिदंबरम यांनी आयएनएक्स मीडिया प्रकरणात जामीन मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात
धाव घेतली आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना एका प्रकरणात जामीन मंजूर केला,
मात्र आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम हे गेल्या गुरुवापासून अंमलबजावणी संचालनालयाच्या
कोठडीत आहेत. या प्रकरणी त्यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.
****
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार आज दिल्लीत प्रदान
केले जाणार आहेत. केंद्रीय पंचायत राज मंत्री नरेंन्द्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात
राज्य, जिल्हा परिषदा, तसंच पंचायत समित्यांना
विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार,
नानाजी देशमु्ख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्राम पंचायत विकास
योजना पुरस्कार, आणि ई-पंचायत पुरस्कार या सारखे एकूण २४६ पुरस्कार या वेळी प्रदान
केले जातील.
****
राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी २१ तारखेला झालेल्या
मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. एक लाख
१२ हजार ३२८ ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट यंत्रांची त्रिस्तरीय सुरक्षा प्रणालीअंतर्गत,
सी सी टी व्हींच्या माध्यमातून २४ तास निगराणी केली जात आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात
पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं
जाणार आहे.
****
मतदारांमध्ये मतदानाबाबतच्या उदासीनतेबाबत शिवसेनेचे
प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला
दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी, खेडोपाडी पावसामुळे अनेक अडचणी असूनही मतदारांनी मतदान
केलं, मात्र मुंबई पुण्यासारख्या अनेक भागात पन्नास टक्केही मतदान झालेलं नाही, याकडे
राऊत यांनी लक्ष वेधलं. राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी परवा सरासरी ६० पूर्णांक
४६ शतांश टक्के मतदान नोंदवलं गेलं.
****
कोकणात भात कापणीच्या हंगामात पाऊस होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये
चिंतेचं वातावरण पसरलं आहे. रागयड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतात भात कापून ठेवलेला
आहे तर काही शेतकरी कापणी करीत आहेत. मात्र पावसामुळे रायगड जिल्हयात हजारो हेक्टर
क्षेत्रावरचं भातपीक धोक्यात आलं आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे
करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
****
धुळे जिल्ह्यातही मोठा
पाऊस झाला, यामुळे धुळे शहरात सखल भागातल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरुन नुकसान झालं.
दरम्यान धुळ्यात एका तरुणीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं
कळवली आहे.
****
फ्रेंच खुल्या सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे शुभंकर
डे आणि पी. व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. समीर वर्मा, परुपल्ली कश्यप आणि
किदंबी श्रीकांत यांचे सामने आज होणार असून, सायना नेहवालची हॉगकाँगच्या चेऊंग नान
ई बरोबर आजच लढत होणार आहे. महिला दुहेरीत अश्विनी कोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचाही
सामना आजच होणार आहे.
****
No comments:
Post a Comment