Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 30
October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.००
****
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांची पुन्हा एकदा भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाचा विधीमंडळ नेते म्हणून आज यासाठी झालेल्या बैठकीत
प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार, हरीभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे पाटील,
यांच्यासह दहा आमदारांनी अनुमोदन दिलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्ष काँग्रेससह राज्यातील विधानसभा निवडणुकीतील जनादेशानुसार विरोधी पक्षांत बसेल
अशी प्रतिक्रीया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. जनतेनं आपल्याला
विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी दिली आहे आणि ती आपण पार पाडू, असं पाटील मुंबईत म्हणाले.
आपला पक्ष राज्य सरकारनं केलेल्या चुका दाखवून देईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
नेते अजित पवार यांनी या संदर्भात म्हटलं आहे. सरकार योग्य दिशेनं काम करत आहे काय,
याकडे आपण लक्ष ठेऊ तसंच समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी
घेऊ, असंही पवार यांनी यावेळी नमुद केलं. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ
प्राप्त करण्यात अपयश आलं तर पर्यायी सरकार
स्थापन करण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते
नवाब मलिक यांनी काल म्हटलं होतं.
****
भाजपनं नुकतेच झालेल्या
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला छपन्न, राष्ट्रवादी
काँग्रेसला चोपन्न आणि काँग्रेसला चव्वेचाळीस जागा प्राप्त झाल्या आहेत. दोनशे अठ्ठ्याऐंशी
सदस्यांच्या विधानसभेत सत्तास्थापनेसाठी १४५ संख्याबळाची गरज आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातल्या साक्री विधानसभा मतदार संघाच्या अपक्ष आमदार
मंजुळा गावित यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला
पाठिंबा जाहीर केला.
****
राष्ट्रवादी काँग्रेस
क्षांच्या आमदारांची मुंबईत बैठक सुरू आहे. पक्षाचा विधीमंडळ तसंच विधानसभा आणि विधानपरिषदेतील
नेता निवडीसाठी ही बैठक होत आहे.
****
वैज्ञानिक संशोधनाचे निष्कर्ष
आणि त्यांची विस्तृत माहिती ही स्थानिक भाषांमधून लोकांपर्यंत पोहोचल्यास अशा संशोधनाचा
फायदा जास्त प्रमाणात लोकांना होईल, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी
संशोधन संस्था – निरीतर्फे आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाअंतर्गत लुप्त झालेल्या नद्यांचे
पुनरुज्जीवन, जलसाक्षरता आणि संवर्धन पर्यावरण जनजागृती यासारखे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या
माध्यमातून निरीतर्फे राबवण्यात येणार आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतीवृष्टी होऊन पिकांचं
मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून याचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना याची लवकरात
लवकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असंही निलंगेकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, लातूरमध्ये आज दुपारपासून पाऊस पडत आहे.
****
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे
तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे
एका निवेदनाद्वारे केली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज दुपारपासून पावसानं जोरदार हजेरी
लावली आहे. जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालूक्यात काल दुपारपासून संततधार पाऊस पडत आहे.
बीड जिल्ह्यात आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत दीड मिलीमिटर पावसाची नोंद झाली. अमरावती
इथंही आज दुपारपासून पाऊस पडत आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई मधल्या सीरसमार्ग इथं शेततळ्यात
बुडून दोन भावांचा आज मृत्यू झाला. विकास सुदाम ठोंबरे आणि गणेश सुदाम ठोंबरे अशी मृतांची
नावं आहेत. हे भाऊ आपल्या शेतात गेले असता तिथल्या शेततळ्यात एकाचा पाय घसरून पडल्यानंतर
त्याला वाचवण्यासाठी दुसराही पाण्यात उतरला होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही दूर्घटना
घडल्याची माहिती मादळमोही पोलीसांनी दिली आहे.
****
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या
निवडणुकीसाठी सहा नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती विभागीय
आयुक्त तसंच मतदार नोंदणी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे. या मतदारांची प्राथमिक यादी तेवीस
नोव्हेंबरला आणि अंतिम यादी तीस डिसेंबरला
जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी या संदर्भात कळवलं आहे.
****
परभणी इथं येत्या चार ते तेरा जानेवारी दरम्यान सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पाच नोव्हेंबर ते एकोणीस डिसेंबर दरम्यान `ऑनलाईन` अर्ज भरावे, असं जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment