Sunday, 1 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.12.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०१ डिसेंबर २०१दुपारी .०० वा.
****
राज्य विधानसभा अध्यक्षपदी महाराष्ट्र विकास आघाडीतील काँग्रेसचे नेते नाना फाल्गुनराव पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेतकऱ्यांचं रक्षण, समाजहीत हे आपलं ध्येय असून कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष पटाले यांनी दिली. बिनविरोध निवड केल्याबद्दल त्यांनी विधानसभा सदस्यांचं आभार मानलं. पटोले हे अन्याय सहन न करणारे नेते आहेत, असं त्यांचं या निवडीबद्दल अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या सभागृहाच्या परंपरेनुसार अध्यक्ष बिनविरोध निवडले जावेत, या हेतूनं भाजपनं आपले उमेदवार किसन कथोरे यांचा अर्ज परत घेतल्याचं भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं या निवडीबद्दल अभिनंदन करताना नमुद केलं. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, छगन भुजबळ, हितेंद्र ठाकूर, अबू आझमी, बच्चू कडू, जितेंद्र आव्हाड आदींनी त्यांच्या नियुक्तीबद्दल सभागृहात अभिनंदनपर भावना व्यक्त केल्या.
****
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज सकाळी दहा वाजेपर्यंत होती. भाजप या निवडणुकीतून माघार घेत असल्याची माहिती त्यापर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यावेळी पटोले यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झालं होतं.
****
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवडही आज करण्यात आली.
****
सीमा सुरक्षा बलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षाबलाच्या सैनिकांना शुभेछा दिल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि अन्य संकटांच्या काळात बलाचे सैनिक नेहमीच देशाचं रक्षण करण्याचं मोठं काम करत असल्यामुळे देशाची सीमा सुरक्षित असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी पर्यंत नेण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात या मोहिमेचा प्रारंभ केला. दरमहा ५५ रुपये ते २००रुपये हप्ता भरून या योजनांचं सदस्यत्व घेता येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातल्या अबुझमाड जंगलात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. या जंगलात नक्षलवाद्यांचं शिबिर सुरु असून, ते घातपात करण्याचा डाव आखत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. त्यावेळी ही चकमक उडाली. या ठिकाणाहून पोलिसांनी चार बंदुका, स्फोटकं जप्त केली आहेत.
****
औरंगाबाद हिस्टॉरिकल सोसायटीच्या हेरिटेड वॉक उपक्रमांतर्गत इतिहासप्रेमींनी आज सकाळी शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन माहिती घेतली. सातवा निजाम उस्मान अली खान यानं शहरातल्या प्रतिष्ठीतांसाठी बनवेला सिटी कल्ब, औरंगजेबानं किल्ले अर्कजवळ बनवलेला आणि सध्या लुप्त होत चाललेला कमल तलाव, आमखास मैदान, जामा मशीद तसंच त्याकाळी शहरावर होणाऱ्या परकियांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी औरंगजेबानं शहराच्या चारही  बाजूनं बनवलेल्या संरक्षक भिंतीची माहिती इतिहास तज्ञ डॉ.दुलारी कुरैशी आणि रफत कुरैशी यांनी उपस्थितांना माहिती दिली.
****
जागतिक एड्स दिन आज पाळला जात आहे. औरंगाबाद इथं काल यानिमित्त जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण पथकाच्या वतीनं जनजागृतीपर फेरी काढण्यात आली.
****
अमरावती जिल्ह्यात गेल्या एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान त्र्याण्णव हजार दोनशे पंच्च्याण्णव सर्वसामान्य व्यक्तींची एचआयव्ही तपासणी जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आली असून त्यात दोनशे एकोणपन्नास जण संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे. त्यापैकी दोनशे अठ्ठेचाळीस रुग्णांवर आवश्यक त्या तपासण्या अंती मोफत औषधोपचार सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यात जनजागृतीपर पंधरवडाही साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये  कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
वाशीम जिल्हयात आतापर्यंत तिनशे सहासष्ट जणांचा `एचआयव्ही` मुळे मृत्यू झाल्याचं शासकीय आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.
****
अकोला इथं एडस नियंत्रणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आज फेरी काढण्यात आली.
प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यावेळी प्रमुख उपस्थित होते. गेल्या तीन वर्षात अकोला जिल्ह्यात एचआयव्ही बाधित एकोणीसशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
****

No comments: