Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्य विधीमंडळाच्या
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
करण्यात आलं. सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ
देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. यावेळी
भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष
नाना पटोले यांनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. कामकाज सुरू झाल्यानंतर
पुन्हा विरोधी पक्ष सदस्यांची घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच राहिल्यानं विधानसभेचं कामकाज
दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
दरम्यान, विधानसभेत नगरअध्यक्ष
आणि संरपचांची निवडणूक थेट होणार नाही, नगरसेवक आणि सदस्य निवड करणार अशा स्वरुपाचं
विधेयक मंजूर करण्यात आलं. विधान परिषदेतही शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्दावरूनच दोन वेळा
कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगिती करण्यात आलं. या मुद्दावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये
जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. गोंधळ कायम राहिल्यानं विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी
तहकूब करण्यात आलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर जोरदार
टीका करत परंपरेला कांळीमा फासेल असं वर्तन न करण्याचं आवाहनं केलं आहे.
****
एक महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य
सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार, असा प्रश्र्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण
राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते आज सिंधुदूर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं भाजप कार्यकर्त्यांच्या
मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्तेतील तिनही पक्ष लवकरच मारामारी करताना
दिसतील, असंही राणे यावेळी म्हणाले.
****
महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेच्या वतीनं साहित्यातील
योगदाना बद्दल दिले जाणारे वर्ष २०१९चे पुरस्कार
आज जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यीक वसंत आबाजी डहाके यांना दिलीप चित्रे स्मृति-साहित्य जीवनगौरव सन्मान, कृष्णात खोत यांना
“रिंगाण” या कादंबरीसाठी ललित ग्रंथ पुरस्कार, दत्ता पाटील यांना ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकासाठी रा. शं. दातार
नाट्य पुरस्कार तर नितीन रिंढे यांना ‘लीळा पुस्तकांच्या’ या ग्रंथासाठी अपारंपरिक
ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
****
नागरिकत्व दुरूस्ती कायदा परत घ्यावा या मागणीसाठी
आज नांदेड शहरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळयाजवळ स्टूडंट फ़डरेशन ऑफ इंडिया -`एसएफआय`
तर्फे निदर्शनं करण्यात आली. या विधेयकाविरोधात जामिया मिलीया विद्यापीठात विद्यार्थी निदर्शंनांवेळी झालेल्या
पोलिस कारवाईच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यातील सेलु इथंही नागरिकत्व दुरूस्ती
कायद्याला विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
****
लातूर इथं आज स्वातंत्रवीर सावरकरांवरच्या कथित वक्तव्यावरून
आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. शहरातील महात्मा
गांधी चौकात यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीं यांचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात
आल्या.
****
परभणी जिल्ह्यातील सेलू इथंही आज या प्रकरणी भाजपच्या
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
****
पालघर जिल्ह्यातल्या
बोईसर बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बारा बांग्लादेशी नागरिकांना पोलिसांनी काल अटक केली.
अटक केलेल्यांमधे नऊ महिला आणि तीन पुरुष आहेत. बोईसरमध्ये बांग्लादेश मधून आलेले बारा
बांग्लादेशी नागरिक बोईसरच्या जवळपास आपली ओळख लपवून नाक्यावर रोजंदारीवर मजुरीचं काम
करतात, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या सर्वांना अटक केली. त्यांच्या
विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
****
वयोवृध्दांच्या आरोग्याचे
प्रश्न हे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा वेगळे असून, केंद्र शासनानं मागच्या आठवड्यात
ज्येष्ठ नागरिकांसाठी नॅशनल पॉलिसी फॉर एल्डरली इन इंडिया ही योजना पुरस्कृत केली असल्याचं
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय- घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी
म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीनं औरंगाबाद इथं आज सेवानिवृत्ती
दिन साजरा करण्यात आला त्यावेळी डॉ. येळीकर बोलत होत्या.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतुर इथं पोलिस ठाण्यात दाखल
गुन्ह्यात मदत करतो म्हणून तक्रारदाराला दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पोलिस
नाईक भानुदास उमाजी पवारविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिंतुर पोलिस ठाण्यात हा गुन्हा
नोंदवण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्याच्या अंबड
तालुक्यातल्या करंजळा इथं आज दुपारी ट्रॅक्टरखाली दबून एका तरुणाचा मृत्यू झाला. जायकवाडीच्या
डाव्या कालव्याच्या चढावर ट्रॅक्टर अचानक उलटल्यानं ही दुर्घटना घडली. कृष्णा वाघुंडे
यांचा यात मृत्यू झाला.
****
जालना जिल्ह्यातील अंबड
तालुक्यातल्या मसईतांडा इथं आज दुपारी घरगुतील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरांना
आग लागली.
*****
***
No comments:
Post a Comment