Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 18 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ डिसेंबर
२०१९ दुपारी १.०० वा.
****
नागरिकत्व
सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. या कायद्याविरोधात
दाखल याचिकांना प्रतिसाद देण्याबाबत न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस दिली आहे. नागरिकत्व
सुधारणा कायद्याबाबत दृकश्राव्य माध्यमातून जनजागृती करण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं
केंद्र सरकारला केली. इंडियन युनियन मुस्लिम लीग, काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यासह
अन्य काहींनी या कायद्याविरोधात दाखल केलेल्या बावीस याचिकांवर येत्या बावीस जानेवारीला
सुनावणी होणार आहे.
****
नागरिकत्व
सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला.
हा कायदा असंवैधानिक असल्याने राज्यात लागू करू नये, असं मत काँग्रेस पक्षाचे सदस्य
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच अशोक चव्हाण यांनी मांडलं. संसदेनं मंजूर केलेल्या
या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करता येणार नसल्याची भूमिका मांडत, विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस तसंच सुधीर मुनगंटीवार यांनी चव्हाण यांच्या असंवैधानिक या शब्दावर
आक्षेप घेतला. या मुद्यावरून झालेल्या गदारोळानंतर सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित
करण्यात आलं. त्यापूर्वी नागपूर इथल्या गोळीबाराच्या मुद्यावरून सदनात झालेल्या गदारोळावरून
कामकाज स्थगित झालं होतं. विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा
मांडला. यावर उत्तर देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, या प्रकरणी गुन्हे शाखेकडून
तपास करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं.
****
दिल्लीतल्या
निर्भया सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला एक आरोपी अक्षय कुमार सिंह याच्या
पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आता काही वेळात निर्णय देण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी हे आरोपी महत्प्रयास करत
असल्याचं नमूद करत, त्यांनी केलेला गुन्हा अमानवीय असल्यानं त्यांना दया दाखवू नये,
असा युक्तीवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज केला.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
केला आहे. डॉक्टर लागू हे प्रखर आणि वैविध्यपूर्ण अभिनयाचं मूर्तिमंत रूप होते, असं
पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस तारखेला आकाशवाणीवरून
”मन की बात” या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा साठावा
भाग असणार आहे.नागरिकांना आपल्या सूचना नमो ॲप या खुल्या मंचावर किंवा मायजीओव्ही या
संकेतस्थळावर पाठवता येतील.
****
गडचिरोली
जिल्ह्यातल्या अहेरी इथे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ”उडान” सौर ऊर्जा
प्रकल्पाचं उद्घाटन झालं. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून
हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
****
भाजपचे
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत काढण्याचे सर्व प्रयत्न केले जातील, असं माजी
मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथे विधान भवनाबाहेर
पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ खडसे कधीही भारतीय जनता पक्ष सोडणार नाहीत, कारण हा पक्ष
त्यांच्या डीएनए मध्ये आहे, असं मतही मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
*****
पालघर
जिल्ह्यातल्या बोईसर इथे अवैधपणे रहात असलेल्या बारा बांगलादेशी नागरिकांना काल पोलिसांनी
अटक केली. यात नऊ महिलांचा समावेश आहे. मानव-तस्करी तसंच दहशतवाद विरोधी पथकांनी संयुक्तरीत्या
ही कारवाई केल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. या बारा लोकांवर पारपत्र कायदा आणि
विदेशी नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
या वर्षीच्या
अवकाळी पावसानं झालेल्या पिकांच्या नुकसानाच्या भरपाईसाठी अकोला तसंच अमरावती जिल्ह्यांना
शासनाकडून मदत प्राप्त झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या
या मदतीतून प्रत्येकी सुमारे एकशे अट्ठावन्न कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनांना
मिळाला आहे. अकोला जिल्ह्यात या मदतीचं वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचं
काम आजपासून सुरू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पुणे-बंगलोर महामार्गावरच्या असुविधा दूर करण्याची मागणी
पूर्ण न झाल्याचं कारण देत, भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी समर्थकांसह आज सकाळी
आनेवाडी टोलनाका बंद पाडला. हे आंदोलन सुमारे एक तास सुरू होतं, असं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment