Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 22 January 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २२ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पात सिंचन आणि पेयजलाचा समतोल राखावा-
मुख्यमंत्र्यांची सूचना
** सर्व शाळांमध्ये दररोज तीन वेळा वॉटरबेल वाजवण्याचे
शासनाचे निर्देश
** राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर; औरंगाबादच्या आकाश
खिल्लारेचा समावेश
** बीड नजिक पालवन इथं येत्या तेरा आणि चौदा फेब्रुवारीला
पहिलं वृक्ष संमेलन
आणि
** तिसऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा आज समारोप; ७४ सुवर्णपदकांसह
महाराष्ट्र अव्वल
****
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पात सिंचन आणि पेयजलाचा समतोल
राखला जावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल पाणी पुरवठा
आणि स्वच्छता विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात
देखभाल-दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचं पुनरुज्जीवन
करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा राबवण्याचा
प्रस्ताव तत्काळ सादर करण्याची सूचनाही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
दरम्यान, काल मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली, राज्यात येणाऱ्या नवनवीन उद्योगांना ज्या प्रकारचं कुशल मनुष्यबळ लागतं, त्याप्रमाणे कौशल्य
विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी
केली.
****
इयत्ता बारावीपर्यंत क्रमिक अभ्यासक्रमात
मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातला कायदा विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात
मांडण्यात येणार असल्याचं मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. मंत्रालयात काल
यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हा कायदा लागू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून
मराठी भाषा विभागाला सहकार्य केलं जाईल, असं देसाई यांनी सांगितलं.
****
शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी
पाणी पिण्याची घंटा वॉटरबेल वाजवण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत. काल याबाबतचा शासन
निर्णय जारी करण्यात आला. शाळेच्या वेळापत्रकात दररोज तीन वेळा अशी घंटा वाजवण्याची
सूचना यात करण्यात आली आहे. मुलांनी दररोज किमान दोन लीटर पाणी पिणं आवश्यक आहे, पाण्याच्या
कमतरतेमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं
वाचन करण्यात यावं, असा आदेशही शासनानं काल जारी केला. सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक
आहे. येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी
करण्यास सांगण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार काल जाहीर झाले. औरंगाबादच्या
आकाश खिल्लारे याच्यासह देशभरातल्या २२ जणांचा यात समावेश आहे. आकाशनं स्वत:च्या जीवाची
पर्वा न करता नदीत बुडणारी महिला आणि तिच्या मुलीला वाचवल्याबद्दल त्याची शौर्य पुरस्कारासाठी
निवड झाली. महाराष्ट्रातून आकाशसह मुंबईची झेन सदावर्ते हिला देखील शौर्य पुरस्कार
जाहीर झाला आहे. झेननं ती रहात असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीतून १७ जणांची सुटका
केली होती. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगानं हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
साईबाबांचं जन्मस्थळ
पाथरी हे असून राज्य शासनानं या संदर्भात
आपली भूमिका स्पष्ट करून निर्णय घ्यावा या आशयाचा
ठराव काल पाथरी इथं झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. साईबाबा मंदिर विकास कृती समितीचे अध्यक्ष
आमदार बाबाजानी दुर्राणी, खासदार संजय जाधव, यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षपदी काँग्रेसच्या मंगाराणी
आंबुलगेकर याची तर उपाध्यक्षपदी
शिवसेनेच्या पदमा नरसारेड्डी
सतपलवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमार्फत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.
****
बीड नगर पालिका विषय समिती
सभापतींची काल बिनविरोध निवड झाली. बांधकाम समिती सभापतीपदी सविता काळे, नियोजन समिती
सभापतीपदी भीमराव वाघचौरे, पाणी पुरवठा - रविंद्र कदम, शिक्षण - मुन्ना इनामदार तर
स्थायी समितीच्या सभापतीपदी मोहम्मद सादेक यांची बिनविरोध निवड करण्यात झाली आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शहरातल्या
सर्व ११५ वार्डांमध्ये शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती औरंगाबाद
- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त
२४ जानेवारीला जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती दानवे यांनी
दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
चलनातून बाद झालेल्या नोटांचा मोठा साठा काल औरंगाबाद
इथं जप्त करण्यात आला. यामध्ये एक हजार आणि पाचशे रुपयांच्या पंचवीस लाख ऐंशी हजार
रूपये दर्शनी मूल्याच्या नोटांचा समावेश आहे. या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे
शाखेनं शेख उमर, शेख मोईन, आणि सय्यद अझहरूद्दीन या तिघांना अटक केली आहे.
****
नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला तणावमुक्त
करण्याचं काम साहित्य करू शकतं, असा विश्र्वास प्राचार्य डॉ. दादा गोरे यांनी व्यक्त
केला आहे. नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात बरबडा इथं चौथ्या राज्यस्तरीय ग्रामीण
साहित्य संमेलनाचं उद्दघाटन डॉ गोरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. प्रा.
नारायण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथ दिंडीनं प्रारंभ झालेल्या या संमेलनात कवीसंमेलन,
कथाकथन, आदी कार्यक्रम घेण्यात आले. संमेलन परिसरात उभारण्यात आलेल्या ग्रंथदालनाला
अनेकांनी भेट दिली. या संमेलनाबाबत बरबडा इथले युवक दत्ता पाटील यांनी या शब्दांत आपलं
मनोगत व्यक्त केलं...
मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपूर्ण गावा
पहायला,ऐकायला मिळालयं महाराष्र्टातील ज्येष्ठ मोठ–मोठे साहित्यिक, कथाकार या ग्रामीण
भागातील लोकांना त्यांचे विचार ऐकायला मिळाली. गावातील परिसातील विद्यार्थी व विद्यार्थींनीना
ग्रामीण भागात अशा ऐवढा मोठ्या ग्रामीण साहित्य संमेलनातून फार शिकायला भेटलं हे आम्ही
आमचं, आमच्या गावचं भाग्य समजतो.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तीन दिवसीय
इतिहास महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. इतिहास आणि प्राचीन संस्कृती विभागाच्यावतीनं
आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते झालं. दिवंगत
नाटककार गिरीश कर्नाड लिखित ‘तलेदंड’ या नाटकानं या महोत्सवाला सुरुवात झाली. आज या
महोत्सवात विविध विषयांवरचे परिसंवाद आणि माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे.
****
बीड नजिक पालवन इथं
येत्या तेरा आणि चौदा फेब्रुवारीला पहिलं वृक्ष संमेलन होणार आहे. सह्याद्री देवराई
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे यांनी ही माहिती दिली. ते काल औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या दोन दिवसीय संमेलनात वृक्षदिंडी, झाड- पक्षी आणि
जल व्यवस्थापनासंदर्भातले तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
वृक्ष संमेलन हे धाडस आहे. हा
एक प्रयत्न आहे हे काय celebration
नाही. एक awareness साठी केलेला एक प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील जी झाडे लावणारी लोक
आहेत, त्यांना इथं एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.
बीड नजिकच्या उजाड माळरानावर गेल्या तीन वर्षांत लावलेल्या
आणि संवर्धनकेलेल्या सुमारे दीड लाख झाडांच्या सान्निध्यात हे संमेलन घेतलं जात आहे.
****
तिसऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा आज समारोप होत आहे.
गुवाहाटी इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मिहीर आंब्रेनं जलतरणाच्या पन्नास मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक
पटकावलं. यासह राज्यानं काल आणखी चार सुवर्ण पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात ७० किलो वजनी गटात औरंगाबादच्या शर्वरी कल्याणकरनं
रौप्य पदक जिंकलं, तर साहिल चौहान आणि जान्हवी शोरी यांना
कांस्य पदक मिळालं. या स्पर्धेत ७४ सुवर्ण पदकांसह एकूण २३४ पदकं जिंकून
महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. हरियाणा ५७ सुवर्णपदकांसह दुसऱ्या, तर दिल्ली ३५ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
****
धर्मनिरपेक्ष जनता
दलाच्या नांदेड शाखेनं सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मरणार्थ दोन पुरस्कारांची काल घोषणा
केली. सुधाकरराव डोईफोडे राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार अहमदनगर इथले पत्रकार
सुधीर लंके यांना तर सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव पुरस्कार समाजवादी विचारवंत सदाशिवराव
पाटील यांना जाहीर झाला आहे. हे दोन्ही पुरस्कार
आज नांदेड इथं समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्याच्या
आखाडा बाळापूर इथले शिक्षणतज्ज्ञ हाजी सय्यद शौकत अली यांच्या स्मरणार्थ विविध पुरस्कार
जाहीर झाले आहेत. आखाडा बाळापूर इथले प्राचार्य कृष्णराव पाटील जरोडकर यांना 'शिक्षणरत्न',
प्राध्यापक संध्या रंगारी यांना 'साहित्यरत्न', पत्रकार शेख फारुख गिरगावकर यांना
‘पत्रकाररत्न’, युवा व्यावसायिक ओंकार अमाने यांना ‘समाजरत्न’, तर प्रगतीशील शेतकरी
विनायक बोंढारे यांना ‘कृषीरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहेत. येत्या प्रजासत्ताक दिनी
हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
****
लातूर महानगरपालिकेनं नव्यानं कर आकारणी करावी अन्यथा
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी महासंघानं घेतला आहे. लातूर शहरात रेडी रेकनरप्रमाणे
कर आकारणी न करता स्थानिक पातळीवर पालिकेनं ठराव घेऊन कर ठरवावे आणि आकारणी करावी असं
सुचवलेलं असतानाही पालिका पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, हा कर रद्द करण्याची
मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी केली आहे.
****
No comments:
Post a Comment