Friday, 1 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 01.05.2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक०१ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांची निवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची आज बैठक
** राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या १० हजाराच्या वर,  आतापर्यंत ४५९ रूग्णांचा मृत्यू
** औरंगाबाद शहरात एकाच दिवशी ४७ रूग्ण सापडले, टाळेबंदी अधिक कडक करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
** कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात महाराष्ट्र दिन तसंच जागतिक कामगार दिन साधेपणानं साजरा करण्याच्या राज्य सरकारची सूचना
** टाळेबंदीत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारची कार्यपद्धती निश्चित; जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती
** औरंगाबादहून बदनापूरला जाणे- येणे करणाऱ्या तहसीलदार छाया पवार निलंबित
आणि
** हिंदी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन
****
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांची निवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची आज बैठक होणार आहे. राज्य मंत्रीमंडळांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरीषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस केल्यानंतर काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून राज्य विधान परिषदेच्या या रिक्त ९ जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा टाळेबंदीमुळे अमेरिकेत अडकले असून, ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेणार आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटामुळे या निवडणुका निवडणूक आयोगानं पुढे ढकलल्या होत्या. २४ एप्रिलपासून या जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यातली अनिश्चितता दूर करण्यासाठी लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात असं राज्यपालांनी निवडणूक आयोगला लिहीलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारनं टाळेबंदीत अनेक शिथिलता दिल्या आहेत, या दिशानिर्देशानुसार विधान परीषदेची निवडणूक घेता येऊ शकेल, असं त्यांनी य पत्रात म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत, २७ मे पूर्वी ते निवडूण येणं आवश्यक असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
नऊ एप्रिलला राज्य मंत्रिमंडळानं ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्ती करावी असा निर्णय घेतला होता आणि तसा ठराव राज्यपाल कोश्यारी यांना पाठवला होता. त्यांनंतर पुन्हा अलीकडेच मंत्रिमंडळानं या ठरावाचा पुनरुच्चार केला.
दरम्यान, काल शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपनेते आमदार मिलिंद नार्वेकर यांनी काल राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नाही.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या १० हजाराच्या वर गेली आहे. काल आणखी ५८३ रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णसंख्या आता १० हजार ४९८ झाली आहे. या आजारानं काल राज्यात २७ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा ४५९ इतका आहे. मुंबईत काल ४१७ रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांची संख्या सहा हजार ६१ झाली आहे. मुंबईत आतापर्यंत २९० कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला.
****
औरंगाबाद शहरात काल सर्वाधिक ४७ कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या १७७ झाली आहे. शहरात काल आढळलेले रुग्ण हे किल्लेअर्क, जयभीमनगर, आसेफिया कॉलनी, नूर कॉलनी, कैलाश नगर, चिकलठाणा, सावरकर नगर, बेगमपुरा, संजय नगर, खडकेश्वर, स्काय सिटी बीड बायपास रोड, रोहिदास नगर, नारेगाव अजिज कॉलनी, रोशनगेट या परिसरातले आहेत. काल आढळलेल्या रूग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय - घाटी आणि जिल्हा रूग्णालयातल्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनानं काल ही माहिती दिली.
दरम्यान, शहरात कोरोना विषाणू बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता शहरातही संचारबंदी अधिक कडक करण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. महापालिकेनं राबवलेल्या चाचणीच्या यंत्रणेचं त्यांनी यावेळी कौतुक केलं.
****
या बाधितांपैकी एक जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत वॉर्डबॉय म्हणून कार्यरत असून, तो जालना इथला आहे. त्याने चार दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबियांना जालना इथं सोडलं होतं. त्यामुळे त्याच्या जालना इथं राहत असलेल्या आठ नातेवाईकांना जालन्याच्या रकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंठा चौफुली परिसरातला साईनाथनगर, शाकुंतलनगर हा परिसर जिल्हा प्रशासनानं पूर्णपणे बंदिस्त केला आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघानं शहरातला जुना आणि नवा मोंढा आजपासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी ही माहिती दिली आहे. या तीन दिवसांमध्ये हा संपूर्ण परिसर निर्जंतूक करण्यात येणार असून दुकानांचे मालक, कर्मचारी आणि हमाल बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचं काळे यांनी सांगितलं.
****
नांदेड इथं काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये परभणी जिल्ह्याच्या सेलू इथल्या ६० वर्षीय महिलेचा आणि पीरबुऱ्हाण नगर इथल्या पुरुषाचा समावेश आहे. तिसऱ्या अबचलनगर इथल्या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. सेलू इथल्या कोरोना विषाणू बाधित महिलेच्या कुटुंबातले आठ आणि संपर्कात आलेल्या २३ अशा ३१ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. बाधित महिलेने परभणीत उपचार घेतलेल्या रुग्णालयातल्या तीस जणांचंही विलगीकरण करण्यात आलं आहे.
****
हिंगोली शहरात काल नवीन चार जण बाधित असल्याचं आढळलं आहे. यात राज्य राखीव पोलीस दलातले तीन जवान तर राज्य राखीव दलाच्या जालना इथल्या कोरोना विषाणू बाधित जवानाच्या संपर्कातल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. या रुग्णांसह हिंगोली इथली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २० झाली आहे.
****
धुळे इथंही काल आणखी दोन रुग्ण बाधित असल्याचं आढळून आलं आहे. याएका २८ वर्षीय तरुणाचा, आणि १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.
****
अहमदनगर इथं एका ३१ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल नकारात्मक आल्यानं त्याला काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना विषाणू मुक्त झालेल्यांची संख्या २५ झाली आहे.
****
टाळेबंदीमुळे अडकून पडलेले स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसंच इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य सरकारनं कार्यपद्धती निश्चित केली आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसंच मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाणार आहे. सर्व यंत्रणांनी जबाबदारीने यासंदर्भात अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या अडकलेल्या व्यक्तींची यादी संबंधित इतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावी, परराज्यात अडकलेल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी दोन्ही राज्यांनी समन्वयानं वाहतुकीचा निर्णय घ्यावा, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अधिकृत पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही, त्याचबरोबर कोविड आजाराची लक्षणं असल्यासही वाहतुकीची परवानगी दिली जाणार नाही. इतर राज्यांतून येणाऱ्या सर्वांना चौदा दिवसांचा विलगीकरण अवधी पाळावा लागेल, आदी बाबी या कार्यपद्धतीत स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
या कार्यपद्धती बाबत अधिक माहिती देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले..

प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अधिका–याला नोडल अधिकारी म्हणून घोषीत करण्यात करण्यात आलेला आहे त्या जिल्हा अधिका–याला आपलं नाव आपला मोबाईल नंबर त्याच बरोबर राज्यांमध्ये आपण अडकलेले आहेत केलेल्या त्या राज्याचे नाव त्यातील जिल्ह्याचे नाव तालुक्याचे नाव गावाचं नाव आपल्याला फॉर्म जिल्हाधिकारयांना भरून द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमात परवानगी मिळेल आपण आपल्या – आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावांमध्ये जाऊ शकता.
****
कोविड १९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात यावेत, उपचाराविना त्यांना परत पाठवण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानंतर काल राज्य शासनानं याबाबतचे आदेश जारी केले. अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि कोविड १९ लक्षणं नसलेल्या, मात्र कोरोना विषाणू बाधित असलेल्या रुग्णांना कोरोना निगा केंद्रांमध्ये पाठवावं, खासगी रुग्णालयांनी मात्र अशा रुग्णांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी राहण्याचा सल्ला द्यावा, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. रुग्णांची तपासणी, त्याला अन्यत्र हलवणं, दाखल करून घेणं आणि घरी सोडणं याबाबत आरोग्य सेवा संचालकांनी प्रमाणित कार्यपद्धती तयार करावी, असंही या आदेशात म्हटलं आहे.
****
कोणत्याही रुग्णालयांनी रुग्णांना उपचार नाकारू नयेत, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. अनेक खासगी दवाखाने तसंच सुश्रुषा गृहांकडून रुग्णांना निदान तसंच उपचार नाकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले. जे दवाखाने रुग्णांना उपचार नाकारतील, त्यांच्याविरोधात कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दोन मे नंतर याबाबतचे आदेश लागू होणार असल्याचं, मेहता यांनी सांगितलं.
****
टाळेबंदीमुळे राज्याच्या महसुलात एक लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट पडण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधत होते. या महसुली तुटीचा राज्यातल्या विकास कामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. या आर्थिक संकटाचा शेतीवर होणारा ताण कमी करण्यासाठी कृषी कर्जाची पुनर्रचना, अल्पमुदतीच्या कर्जाचं मध्यम तसंच दीर्घ मुदत कर्जात रुपांतर, कर्ज परतफेडीचे हप्ते लांबवणं, पीक कर्जाचा व्याजदर शून्य टक्के करावा, असे अनेक उपाय पवार यांनी सुचवले. उद्योग तसंच व्यापाराचं अर्थकारण सावरण्यासाठी असेच अनुकूल निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. टाळेबंदी संपल्यानंतर बेरोजगारी आणि कुशल मनुष्यबळाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही पवार यांनी वर्तवली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वूमीवर आज राज्यात महाराष्ट्र दिन तसंच जागतिक कामगार दिन साधेपणानं साजरा होत आहे. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. अन्य जिल्ह्यातही पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता हे ध्वजारोहण करण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केलं आहेत.
****
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर कर्तव्यात कसूर करणं, त्याचबरोबर मनाई असतानाही औरंगाबाद या रेडझोन जिल्ह्यातून ये - जा केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातल्या बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे.   जिल्हाधिकारी  रवींद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले. औरंगाबाद रेड झोनमध्ये गेल्यामुळे औरंगाबादहून जालन्यात येणारी पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली असून, अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहूनच काम करण्यास सांगितलं आहे. मात्र तरीही तहसीलदार पवार या बदनापूर मुख्यालयी राहत नसल्यामुळे, कोविड १९ बाबतचे विविध अहवाल वरिष्ठ कार्यालयास विहित कालावधीमध्ये सादर न करणं, शासकीय कामात दुर्लक्ष करणं, दुष्काळी अनुदान मागणीत अनियमितता, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात दुर्लक्ष, अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणात अनियमितता, गौण खनिजाचे अधिकृत वाळू साठे आणि वाहतुकीवर नियंत्रण न ठेवणं, शासकीय वसुलीमध्ये दुर्लक्ष करणं, आदी कारणांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 
****
हिंदी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कपूर कुटुंबातल्या सदस्यांसह उद्योजक अनिल अंबानी, अभिनेता अभिषेक बच्चन, सैफ अली खान तसंच चित्रपटसृष्टीतल्या मोजक्या कलाकारांनी यावेळी उपस्थित राहून, ऋषी कपूर यांना अखेरचा निरोप दिला. कपूर यांचं काल सकाळी मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ते गेल्या सप्टेंबर महिन्यातच अमेरिकेतून भारतात परतले होते. मेरा नाम जोकर, बॉबी, सागर, प्रेमरोग, चांदनी, अग्निपथ, दो दुनी चार, १०२ नॉट ऑऊट, अशा अनेक हिंदी चित्रपटातून विविध भूमिका साकारलेले ऋषी कपूर यांना शानदार या चित्रपटातल्या भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बॉबी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कार याशिवाय फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले ऋषी कपूर यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. ऋषी कपूर यांच्या निधनानं चित्रपट सृष्टीतला दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक दुवा निखळला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीनं विद्यापीठांच्या परीक्षांबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठांना दिल्या असून त्याअनुषंगानं स्थापन केलेल्या कुलगुरुंच्या समितीची आज बैठक होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीपाठोपाठ उद्या होणाऱ्या कुलगुरूंच्या बैठकीनंतर परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं.

सर्व कुलगुरुंची विसी आहेत वेळापत्रक त्यांच्यामध्ये अंतिम वेळापत्रक तयार करु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे आणि राज्यपाल त्यांच्या निर्देशनाला ते वेळापत्रक  आणून देऊ त्यानंतरच परीक्षा घेण्याचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये  आमचं खातं जाहीर करेल.सुरवातीला मी सागंत होतो की कोणच्याही परिस्थितीमध्ये विद्यापीठाच्या परीक्षा  होणार आहेत त्या परीक्षा कराव्यात याच गाईडलाईनस आम्हाला युजीसीने आम्हाला पाठविल्या आहेत.
****
नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातले कर्मचारी वैजनाथ दांडगे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अकरा हजार रूपयांचा निधी दिला आहे. काल त्यांनी आपला धनादेश नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
****
परभणी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधिस दोन लाख रुपयांचा धनादेश काल सभापती समशेर वरपुडकर यांनी पालकमंत्री नवाब मलिक याच्याकडे सुपुर्द केला.
****
औरंगाबादचे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आपल्या एक वर्षाचे निवृत्ती वेतन दिलं आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाच लाख ९३ हजार २५९ रुपयांचा धनादेश त्यांनी काल सुपुर्द केला.
****
टाळेबंदीच्या काळात नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली असून, परभणीच्या नागरिकांनी नाभिक समाजातल्या नागरिकांना जीवनावश्यक किटचं वाटप केलं. सोनपेठ इथं सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी तालुक्यातल्या गरजू लाभार्थ्यांना अन्न धान्याच्या किटचं वाटप केलं. तसंच भारतीय जनता पक्षाचे परभणी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी सोनपेठच्या ग्रामीण रुग्नालयास भेट देऊन डॉक्टरांसाठी दोन स्व-संरक्षण किटचं वाटप केलं.
****
लातूर जिल्ह्यानिलंगा इथल्या अक्का फांऊडेशनच्या वतीनं निलंगा, देवणी, शिरुर अंनतपाळ तालुक्यातल्या १८० गावामधल्या गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचं वाटप करण्यात आलं.
****
नांदेड शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी अनोखी शिक्षा सुनावली. शहरातल्या पोलीस कवायत मैदानाजवळच्या चौकात या सर्वांना पोलिसांनी उन्हात बसून राहण्याची शिक्षा केली.
****
परभणी शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, मास्क न वापरणं, सामाजिक अंतर न राखणं, किराणा दुकानात दरपत्रक न लावणं, विनाकारण फिरणं आदींबाबत महानगर पालिकेच्या वतीनं आतापर्यंत २२७ जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई करून ३३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केलं आहे.
****
लातूर शहरात अद्याप एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आलेला नसला तरी हे संकट पूर्णपणे ओसरलेलं नाही, याकरता लातूर शहरात येणाऱ्या सर्व सीमांवर कडक निगराणी ठेवावी अशी सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. लातूर शहराच्या प्रवेश सीमांवर केली जाणारी कारवाई योग्य पद्धतीनं राबवली जावी याकरता लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी काल स्वत: पाहणी करून, पोलिस आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवलं.
****
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, यांनी सर्व नागरिकांना तसंच पोलीस अधिकारी, कर्मचारी, यांना "आरोग्य सेतू " डाऊनलोड करण्याचं  आवाहन केलं आहे. याॲपद्वारे स्वत:च्या प्रकृतीबाबत विचारलेल्या प्रश्नांची अचू, योग्य आणि खरी माहिती दररोज भरावी. यामुळे स्वत:च्या आरोग्याबरोबर इतरांच्याही आरोग्याची योग्य वेळी दखल घेतली जाईल. त्याबरोबर तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध होन संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार असल्याचं त्या म्हणाल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण शहरातल्या बालाजी युवक मंडळानं डॉक्टर अलोक पारिक यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन कोरोना प्रादुर्भावाविषयी जनजागृती केली, तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक औषधांचं वाटप केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं उभारण्यात आलेल्या खवा क्लस्टरचा टाळेबंदीच्या काळात खवा उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. या खवा क्लस्टरमध्ये दहा ते बारा महिने खवा उणे १६ अंश सेल्सीयश तापमानात ठेवता येतो. त्यामुळे भूम-परंडा-वाशी तालुक्यातल्या पाच हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना या कल्सटरचा फायदा होआहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर..

क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेतून उभारलेल्या विनोद जोगदंड यांच्या पुढाकारातून खवा क्लस्टर मुळे मिळतोय भूम-परंडा-वाशी या तालुक्यात हजार शेतकऱ्यांनी दहा लाख लिटर पासून तयार केलेला खवा वाहतूक बंद असल्यामुळे खराब होण्याची शक्यता होती या खवा क्लस्टर मध्ये २०० टन खवा त्याचे अंदाजे किंमत अडीच कोटी रुपये आहे तो साठवला गेला आहे हा खवा दोन महिने साठवणुकीत नंतर विकल्यास खवा उत्पादक शेतकऱ्यांना दुप्पट पैसे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत देवीदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक ते बी-बियाणे, खतांसह सर्व सुविधा सुलभतेनं उपलब्ध करुन देण्याच्या सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक औरंगाबाद इथं घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत बी - बियाणे, खताच्या विक्री प्रक्रियेचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या आवश्यक असणाऱ्या कोविड १९ च्या प्रादुर्भावावरच्या उपाययोजनेसाठी ८१ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधी खर्चास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली आहे. औरंगाबाद इथं काल झालेल्या यासंदर्भातल्या बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हा प्रस्ताव मांडला होता. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीमध्ये कुठल्याही प्रकारे कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी काल जिल्ह्यातला खरीप हंगाम  पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधीत यंत्रणेस खते, बियाणे शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, तसंच महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरबाबत बऱ्याच तक्रारी असून या तक्रारींची तत्काळ सोडवणूक करावी अशा सूचना दिल्या.
****
रीप हंगामापूर्वी बीड जिल्ह्यात विद्युत दुरुस्ती आणि रोहित्र वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, तसंच मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीची कामं त्वरित सुरू करावीत, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. वीज वाहतूक आणि वितरण प्रणाली सुरळीत करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही कामं त्वरित करण्यात यावी अशी मागणी क्षीरसागर यांनी राऊत यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
****
तूर खरेदीची मुदत ३१ मेपर्यंत वाढवण्याची मागणी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात संचारबंदी लागू आहे. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर पोहोचणं शक्य होत नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी बांधवांची अडचण लक्षात घेऊन ही मुदतवाढ द्यावी, असं ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राज्यात तूर खरेदीची मुदत काल ३० एप्रिलला संपली आहे.
****
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी आज एक मे या महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीच्या दिवशीही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आपले सर्व बाजार व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी ही माहिती दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर इथं शासकीय तूर खरेदी केंद्रावर ३५० शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली आहे. तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ झाला. ४ हजार ८७५ रूपये प्रतिक्विंटल या दरानं ही ती तूर खरेदी केली जाणार असून एका शेतकऱ्याकडून ९ क्विंटल ६२ किलोग्रॅम एवढी तूर खरेदी केली जाणार असल्याचं खरेदी विक्री संघाचे सभापती लक्ष्मण भुसारे आणि उपसभापती अप्पासाहेब पाचपुते यांनी सांगितलं. 
****
लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सुरेन्द्र पाठक यांचं काल सकाळी लातूर इथं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूरच्या अष्टविनायक प्रतिष्ठानचे सचिव, तसंच सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाचे विश्वस्त म्हणूनही ते काम पाहात होते.
****
परभणी जिल्हा पोलीस दलातले सात अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक एस.के.जैस्वाल यांनी महासंचालकांचं बोधचिन्ह, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र काल प्रदान केलं.
****
औरंगाबादच्या हर्सुल तलावात काल दोन मुलांचा तलावात पडून मृत्यू झाला. हर्सुल परिसरातल्या जहाँगीर कॉलनीत राहणारे अरबाज अजीज शहा आणि रियान सय्यद अनवर अशी मृतांची नावं आहेत. अग्निशमन दलाच्या पथकानं या मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
****


No comments: