Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø देशभरात टाळेबंदीचा
कालावधी चार मे पासून आणखी दोन आठवडे वाढवण्याचा निर्णय
Ø रेड झोन मधले नियम अधिक कडकपणे
पाळावे लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे
संकेत
Ø कामगार, विद्यार्थी
तसंच यात्रेकरूंसाठी विशेष रेल्वे सोडण्यास गृह मंत्रालयाची
परवानगी
Ø विधान परिषदेच्या नऊ जागांसाठीचा निवडणूक
कार्यक्रम जाहीर; २१ मे रोजी मतदान
Ø साठावा महाराष्ट्र दिन काल मराठवाड्यासह
राज्यभरात साधेपणानं साजरा
आणि
Ø औरंगाबाद शहरात टाळेबंदी अधिक कडक; पुढील दोन आठवडे शहरातले
व्यवहार एक दिवसाआड पूर्णत: बंद
****
देशात कोरोना विषाणूचा वाढता
प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात चार मे पासून टाळेबंदीचा
कालावधी आणखी दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय काल केंद्रीय
गृह मंत्रालयानं घेतला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी
देशात कोरोना विषाणूची स्थितीसंदर्भात व्यापक आढावा घेतल्यानंतर टाळेबंदीचा कालावधी हा निर्णय जाहीर केल्याचं मंत्रालयानं सांगितलं. कोरोना विषाणू बाधित रूग्णांच्या संख्येनुसार देशातल्या सर्व जिल्ह्यांची ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन मध्ये विभागणी करण्यात आली असून, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीच्या नियमात अधिक शिथिलता देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत महापालिका हद्दीत लोकसंख्येची घनता जास्त असल्यानं या भागात जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्ह्याच्या अन्य भागांचं विभाजन करण्यात आलं असून, शहरात जर जास्त रुग्ण असतील तर तेवढाच भाग रेड झोन मध्ये आणि इतर जिल्हा हा ऑरेंज झोन मध्ये असेल, त्यामुळे या भागात झोननुसार शिथिलतेचे नियम लागू राहतील, असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. नियंत्रित क्षेत्रातल्या १०० टक्के नागरिकांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावं लागणार आहे, तसंच या भागातल्या नागरिकांना वैद्यकीय गरज वगळता अन्य कोणत्याही कारणसाठी दुसऱ्या भागात जाता - येता येणार नाही. वाढलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत देशभरात झोनचा विचार न करता विमान, रेल्वे, मेट्रो आणि आंतरराज्य वाहतूक बंदच राहणार आहे, शाळा, महाविद्यालय, इतर शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, हॉटेल्स, रेस्टॉरंट, चित्रपट गृह, मॉल्स, व्यायाम शाळा, क्रिडा संकुल, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसंच इतर मेळाव्यांवर बंदी कायम राहणार आहे, सर्व धर्मिक स्थळंही बंदच राहतील. या कालावधीत सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही, असं गृहमंत्रालयाच्या आदेशात नमूद केलं आहे.
रेड झोनमध्ये शेतीची कामं, काही औद्योगिक कारखाने, मॉल्स वगळता जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. या भागात व्यावसायिक आणि खासगी कार्यालयं ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील. मात्र केश कर्तनालय, स्पा आणि सलून बंदच राहतील, असं या आदेशात म्हटलं आहे.
ऑरेज झोनमध्ये जिल्हांतर्गत टॅक्सी आणि कॅब सेवा सुरु होणार आहे, यामध्ये चालकाव्यतिरिक्त फक्त दोन प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली आहे. आंतरजिल्हा वाहतुकही सुरु होणार आहे. वैयक्तिक आणि खाजगी गाड्यांच्या वापरासही परवानगी देण्यात आली आहे.
ग्रीन झोन मध्ये देशभरात बंदी असलेल्या सेवा वगळता जिल्ह्यातर्गंत इतर
सर्व सेवा सशर्त सुरु होतील, बस वाहतूक करताना क्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी घेता येतील, या भागात सर्वत्र मालवाहतुकही सुरु होणार आहे, असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
रेड झोन मधले नियम अधिक
कडकपणे पाळावे लागतील, असे
संकेत मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी दिले आहेत. काल महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेशी सामाजिक संपर्क माध्यमांवरून संदेश साधताना, ते बोलत होते. ऑरेंज झोन मध्ये बाधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणचे तसंच ग्रीन झोनमधले निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथील
करण्याचा प्रयत्न केला
जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मराठवाड्यातल्या उस्मानाबादसह
वाशिम, वर्धा, गडचिरोली,
गोंदिया, आणि सिंधुदूर्ग हे सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये
आहेत. बीड, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि लातूरसह
राज्यातले १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये, तर औरंगाबादसह चौदा जिल्हे
रेड झोनमध्ये आहेत.
कोरोना विषाणूची संसर्ग साखळी
तोडण्यात यश मिळत असून, नागरिकांनी कोरोनाच्या
भीतीतून बाहेर पडावं, आजाराची काहीही लक्षणं आढळल्यास तत्काळ
निदान करून घ्यावं आणि आवश्यकता असल्यास उपचार करून घ्यावेत, उपचारानंतर रुग्ण बरा होतो, असा विश्वास
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
परराज्यातल्या नागरिकांना
त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी राज्या-राज्यांमधील समन्वयातून
शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या
महाराष्ट्रातल्या लोकांनाही परत आणले जाईल, परंतु
त्यासाठी गर्दी करू नये, झुंडीने जमा होऊ नये, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले....
परराज्यामध्ये जे जाऊ इच्छित आहेत. त्यांना केंद्र सरकारनं जी परवानगी
दिलेली आहे, ती सुध्दा अत्यंत शिस्तीनं. लगेच झुंबड केली तर ती सुध्दा परवानगी काढली
जाईल. कारण हे खूप धोका दायक आहे. तर हे दोन्ही राज्य - राज्य सगळ्या देशभरामध्ये एकमेकांच्या
संपर्कात राहून हा आदान प्रदान तुमची लोकं आमची लोकं ही जी काही आहे. त्याची वाहतूक
व्यवस्था केल्या नंतर आपण वस्त्या - वस्त्या, गावं - गावं त्या ज्या कुठे असतील जे
जाऊ इच्छितात त्यांना तशी सोय करतोय. आपल्या राज्यातल्या राज्यात जी लोकं गावी गेली
होती. काही लोकं पर्यटनाला गेली होती. त्यांना सुध्दा तिथल्या - तिथल्या कलेक्टरशी
बोलून पहिली प्राथमिकता, प्राधान्य ठरवून त्यांची जाण्या-येण्याची सोय आपण या काही दिवसांत तसा
विचार करून ती सुरुवात करु.
****
लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध
भागात अडकलेले कामगार, विद्यार्थी तसंच यात्रेकरूंना त्यांच्या घरी
परतण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यास केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे.
गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी काल पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. या रेल्वे गाड्यांच्या तिकीट विक्रीसंदर्भात
लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार असल्याचं, श्रीवास्तव
यांनी सांगितलं. यापैकी सहा श्रमिक एक्सप्रेस काल जाहीर करण्यात
आल्या, यामध्ये नाशिक ते भोपाळ, नाशिक ते
लखनऊ या दोन गाड्यांचा समावेश आहे. नाशिकहून भोपाळला जाणारी
गाडी काल रात्री साडे नऊ वाजता ३३२ कामगारांना घेऊन भोपाळकडे रवाना झाली.
****
देशात काल कोरोना विषाणू संसर्ग
झालेले नवे एक हजार ९९३ रुग्ण सापडले. आता देशभरातली
एकूण रुग्णसंख्या ३५ हजार त्रेचाळीस झाली आहे. केंद्रीय आरोग्य
मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. आतापर्यंत आठ हजार ८८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले
असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २५ पूर्णांक ३७ शतांश टक्क्यांवर
गेल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.
****
राज्यात काल एका दिवसात
सर्वात जास्त एक हजार आठ आणखी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यात एकूण
रुग्णांची संख्या ११ हजार ५०६ झाली आहे. या आजारानं काल राज्यात २६ जणांचा मृत्यू झाला,
त्यामुळे राज्यात या आजारामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या आता ४८५ झाली आहे. तर
एक हजार ८७९ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद इथल्या गुरूदत्तनगर
इथल्या सत्तेचाळीस वर्षीय कोरोना विषाणूग्रस्त रुग्णाचा काल सकाळी मृत्यू
झाला. त्याला २७ तारखेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं
होतं. यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची
संख्या आता आठ झाली आहे. शहरात काल आणखी ४० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांची संख्या २१७ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये संजयनगर,
मुकुंदवाडी इथले १८, नूर कॉलनी आणि आसेफिया कॉलनीतले प्रत्येकी तीन, गुलाबवाडी, पदमपुरा आणि भीमनगर इथं प्रत्येकी दोन,
भडकल गेट, वडगाव, महमुदपुरा,
सिटीचौक, किले अर्क, सिडको एन6 विजयश्री कॉलनी, इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
नांदेड इथला सचखंड गुरुद्वारा
आणि लंगर सेवा कालपासून बंद करण्यात आली आहे. या गुरुद्वारामध्ये
अडकलेले पंजाबमधले काही भाविक नुकतेच परत पाठवण्यात आले, यापैकी
१४८ भाविक कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आल्यानं, हा निर्णय
घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, या यात्रेकरूंना पंजाब मध्ये सोडून आलेले तीन जण कोरोना
विषाणू बाधित झाल्याचं आढळून आलं आहेत.
यामध्ये दोन वाहनचालक आणि एका मदतनिसांचा समावेश आहे. हे तिघे नांदेड
जिल्ह्यात परत येताच त्यांना थेट शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात विलगीकरणात ठेवण्यात
आलं होतं. आता नांदेड मध्ये एकूण कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या सहा झाली आहे.
****
हिंगोली इथं काल राज्य
राखीव पोलिस दलाचे आणखी २५ जवान कोरोना विषाणू बाधित झाल्याचं
आढळून आलं. याशिवाय पंजाबमध्ये शीख भाविकांना सोडून
आलेला एक वाहनचालकही विषाणू बाधित झाला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
-
या सर्व जवानांचा यापूर्वीचा अहवाल नकारात्मक होता. परंतु त्यानंतर
मात्र त्यांचा अहवाल सकारात्मक आल्याने covid-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बाधित
जवानाची प्रकृती स्थिर असून, त्याची बाधा स्वम्य् प्रकारचे असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक
डॉक्टर किशोर प्रसाद यांनी सांगितले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी यात राज्य
राखीव पोलीस बलातील जवानांची संख्या मोठी आहे. ते कर्तव्य बजावून परतल्यानंतर त्यांना
थेट विलगीकरण कक्षा ठेवल्यामुळे त्यांच्यापासून समाजातील इतरत्र लागण होण्याचा धोका
नाही. तरीही नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
दरम्यान, हिंगोलीत राज्य
राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं काल रात्री स्पष्ट
झालं. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या ४७ इतकी झाली आहे.
****
जालना जिल्ह्यात काल
आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये राज्य राखीव पोलिस दलाचे तीन
जवान, चौधरीनगर इथला एक आणि परतूर शहरातल्या एकाचा समावेश आहे. एसआरपीएफचे हे तीन जवान
मालेगाव इथून आले आहेत. जालना जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहा झाली
आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं
काल आणखी एक जण कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता,
डॉ. गिरीश ठाकूर यांनी ही
माहिती दिली.
****
परभणी इथल्या कोरोना संसर्गामुळे
मृत महिलेच्या कुटुंबातल्या तसंच या महिलेच्या संपर्कात आलेल्या
रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांसह एकूण ७१ जणांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत.
दरम्यान
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सेलू इथं संचारबंदीत वाढ केली
असून आज रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात दौंड
इथं राज्य राखीव पोलिस दलाचे ७ पोलिस जवान कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. प्रशासनाने
खबरदारीचा उपाय म्हणून दौंड शहरासोबतच पाच किलोमीटर अंतरावरची निमगाव खलु आणि गार ही
दोन गावं १४ दिवसासाठी बंद केली आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठीचा
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठीची अधिसूचना
सोमवारी जाहीर केली जाणार असल्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून
राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आलं आहे. येत्या अकरा मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून, २१ मे रोजी मतदानानंतर लगेचच मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीदरम्यान कोरोना प्रतिबंधाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं
पालन करण्याचं आश्वासन राज्याच्या मुख्य सचिवांनी निवडणूक आयुक्तांना दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य
नाहीत, त्यांनी पदग्रहण केल्यापासून सहा महिन्यांच्या आत कोणत्याही
एका सदनाचं सदस्य होणं, आवश्यक आहे. ही
सहा महिन्यांची मुदत २७ मे रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांच्या विनंतीनंतर निवडणूक आयोगानं काल सकाळी बैठक घेऊन निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.
****
मराठवाड्यासह राज्यभरात साठावा
महाराष्ट्र दिन काल साधेपणानं साजरा झाला.
मुंबईत हुतात्मा चौक इथल्या
स्मारकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रांगणात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अत्यंत साधेपणाने एकमेकांपासून
अंतर राखण्याचा नियम पाळून हे शासकीय ध्वजारोहण
झालं.
जालना इथं पालकमंत्री राजेश
टोपे, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे, परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक, लातूर इथं पालकमंत्री
अमित देशमुख, नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण, उस्मानाबाद इथं राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
धुळे इथं पालकमंत्री अब्दुल
सत्तार यांच्या हस्ते तर अहमदनगर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र
दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं.
****
औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू
बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पोलिसांनी टाळेबंदी अधिक कडकपणे
अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील दोन आठवडे शहरातले
व्यवहार एक दिवसाआड पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयानुसार आजपासून केवळ
सम तारखेलाच सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची
खरेदी करता येणार आहे. उद्यापासून विषम तारखेला शहर पूर्णपणे
बंद राहील, असं पोलिस आयुक्त कार्यालयानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा तसंच वाहन
जप्तीचा इशारा देण्यात आला आहे.
****
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या शंभर टक्के जनतेला
मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल
जाहीर केला. राज्यातल्या नागरिकांना मोफत आणि रोखरहित -कॅशलेस
विमा संरक्षण देणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचं ते म्हणाले. महात्मा
जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या एकूण लोकसंख्येपैकी ८५
टक्के नागरिकांना लाभ दिला जात होता. आता उर्वरित १५ टक्के लोकसंख्येचाही, म्हणजे शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पांढरे शिधापत्रिकाधारक यांचाही
या योजनेंतर्गत समावेश करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****
लातूर शहरात सध्या एकही कोरोना
विषाणूग्रस्त रुग्ण आढळला नसला तरी, धोका टाळण्यासाठी
प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याची मागणी महापालिकेचे सभागृह
नेते शैलेश गोजमगुंडे यांनी केली आहे. यासाठी १८ प्रभागात फिरता
दवाखाना सुरू करून त्यात एक डॉक्टर आणि किमान तीन सहाय्यक नेमण्यात यावेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
औरंगाबादच्या ग्रामीण भागामध्ये
काल दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद पाळण्यात आला. वैजापूर तालुक्यातल्या
गारज इथं विनाकारण फिरणाऱ्या काही दुचाकीस्वारांना पोलिसांनी उठबशा काढण्याची शिक्षा
दिली. झाल्टा फाटा इथं तपासणी नाक्यावर येणाऱ्या - जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यात आली. तर दौलताबाद
इथं सॅनिटारझरची फवारणी करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर इथले
व्यापारी संदीप लकडे यांनी शहरातल्या शंभर गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची पाकिटं वाटप
करून काल आपला वाढदिवस साजरा केला. जिंतूर इथले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्यामराव मते आणि दलमीर खाण पठाण यांच्याकडून दोनशे
गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा
इथं भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत देशपांडे यांनी पोलिस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप केलं.
****
नांदेड जिल्ह्यात क्रांतिवीर
लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता
निधीस एक्कावन्न हजार रुपये देण्यात आले. नांदेड शहरातल्या
भाजप सिडको मंडळाने पंतप्रधान केयर निधीत २८ हजार रुपये मदत केली आहे.
****
टाळे बंदीच्या काळात
शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत. शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री व्हावी यासाठी लातूर
कृषी उत्पन्न बाजार समितीनं काल कामगार दिनाची सुट्टी न घेता मालाची खरेदी - विक्री
केली. या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…
लातूर
उत्पन्न बाजार समितीने कालची महाराष्ट्र दिनाची
सुट्टी न घेता मालाची खरेदी-विक्री केली. दररोज एका धान्याची खरेदी करणे निश्चित केल्यामुळे
कालचा दिवस हरभऱ्याचा होता. आज बाजारात 19708 क्विंटल हरभराची आवक झाली. सोयाबीनची
आवाक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे बाजार समितीने सोयाबीनचा सौदा दररोज करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
केली आहे. त्या ठिकाणी ठिकाणी आज 4028 टक्क्यांची आवक झाली. अशी माहिती बाजार समितीचे
सभापती विवेक भाई शाह यांनी दिली. व्यापाऱ्यांची चिंता ठेवण्याची अडचण होऊ नये, म्हणून कृषी उद्योजक हेमंत
वैद्य त्यांचे शित गृहसुद्धा चालूच ठेवलं होतं.
अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यासाठी लातूर.
****
पालघर जिल्ह्यातल्या
जमावानं केलेल्या तिघा जणांच्या हत्या प्रकरणाच्या
तपासाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर काल सुनावणी
झालेल्या या याचिकेत, या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीत
करण्याची किंवा हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयकडे
सोपवण्याची मागणी केली होती. सध्या सुरू असलेल्या तपासावर स्थगिती
देण्यास, न्यायालयाने नकार देत, या याचिकेची
प्रत महाराष्ट्र सरकारला देण्यास सांगितलं आहे, या प्रकरणी पुढची
सुनावणी आता चार आठवड्यांनंतर होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणी काल आणखी पाच जणांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली असून, अटक केलेल्या एकूण आरोपींची
संख्या आता ११५ झाली आहे.
****
नांदेड पोलिस दलातल्या दोन वरिष्ठ
अधिकारी आणि सहा पोलिस कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा बजावल्या बद्दल त्यांना महाराष्ट्र
राज्य पोलिस महासंचालक यांच्या वतीनं मानचिन्ह जाहीर करण्यात आलं. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
****
नॅशनल टेस्टींग एजन्सी -
राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची
मुदत वाढवली आहे. कोविड -१९ प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल हॉटेल मॅनेजमेंट
कौन्सिलच्या जेईई -२०२०, इंदिरा गांधी मुक्त
विद्यापीठाच्या पीएचडी आणि एमबीए प्रवेश परीक्षा, भारतीय कृषी
संशोधन परिषद तसंच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्याची
तारीख पंधरा मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर
प्रवेश परीक्षेची अंतिम तारीखदेखील पाच जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. १५ मे नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची प्रवेशपत्रं डाउनलोड करण्यासाठी
सुधारित तपशीलवार वेळापत्रक संबंधित परीक्षा वेबसाइट आणि एनटीए वेबसाइट
www.nta.ac.in वर उपलब्ध करुन दिलं जाईल, असं या
बातमीत म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथले सेवानिवृत्त आदर्श
शिक्षक शंकर बुवा शेषाद्री ऊर्फ केजकर गुरुजी यांचं काल अंबाजोगाई इथं वृद्धापकाळानं
निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अंबाजोगाई इथं
अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा गेल्या सात महिन्यांचा पगार प्रलंबित आहे. मार्चअखेर
पर्यंतचे सहा महिन्याचे थकीत अनुदान शासनाने तात्काळ अदा करण्याची
मागणी परभणीच्या ग्रंथालय संघटनेनं केली आहे.
****
परभणी शहरातल्या नवामोंढा भागात
काल दुपारी कापसाने भरलेल्या ट्रकला वीज पुरवठा करणाऱ्या तारेचा स्पर्श होवून शॉर्टसर्कीट
झाल्यामुळे कापसानं पेट घेतला. अग्निशामक दल आणि नागरिकांच्या
मदतीनं त्वरीत आग आटोक्यात आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नाही.
****
हिंगोली जिल्ह्याच्या
कळमनुरी शहरातल्या चौक बाजारात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.
त्यात एक किराणा दुकान आणि टेलरचं दुकान जळून खाक झालं. आगीचं कारण अद्याप कळू शकलं
नाही, मात्र ग्रामस्थांनी लवकरच आग विझवली.
****
बीड जिल्ह्यात गाई,
म्हशींमध्ये साथीच्या रोगाचा पादुर्भाव झाला असून परळी, अंबाजोगाई, माजलगाव या तालुक्यात
याचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. हा आजार लंपि स्कीन डीसिज असण्याची शक्यता वर्तवण्यात
येत आहे. आवश्यक रोगनिदानासाठी बाधित पशुधनाचे रोग नमुने भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत
पाठवण्यात आले आहेत.
****
परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकानं पाथरी शहरात दोन ठिकाणी छापे टाकून एक लाख ५१ हजार सातशे रुपयांचा गुटखा काल
जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment