Saturday, 2 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.05.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 ०२ मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. नऊ हजार ९५० रुग्ण यातून बरे झाले आहेत. काल संध्याकाळपासून यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सहासष्ट असून यात सर्वाधिक २६ महाराष्ट्रातील आहेत. देशभरात आतापर्यंत एक हजार दोनशे अठरा रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात यातील सर्वाधिक ४८५ मृत्यू झाले आहे. 
****

 औरंगाबाद इथं आज सकाळी कोरोना विषाणूचे नवे २२ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरातील या रुग्णांची संख्या २३६ झाली आहे. शहरातील बायजीपुरा भागात अकरा, नूर कॉलनीत पाच, कैलास नगरमधे तीन, समता नगरमधे दोन, जयभीमनगरमधे एक नवा रुग्ण आढळला आहे. शहरात आज सकाळी जयभवानी नगरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी उन्हात बसण्याची शिक्षा केली.
****

लातूर जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी घरी जाण्यासाठी गर्दी न करता अर्ज करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे. जिल्ह्यांतर्गत एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाण्यासाठी तहसिलदारांकडे अर्ज करावेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी सर्व आरोग्य चाचण्या केल्यावरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं जाता येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.  
**** 

नांदेड शहरात २० नवे रुग्ण आढळले असून शहरातल्या बाधितांची संख्या २६ झाली असून यामुळे दोन जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तीस एप्रिल आणि एक मे रोजी नांदेड शहरातील लंगर साहेब गुरुद्वारा परिसरातून ९७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यात हे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. नांदेड शहरातील गुरुद्वारा लंगर साहेब परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.   
****   

 नांदेड इथं टाळेबंदी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष प्रविण साले यांच्या प्रयत्नांतून सामुदायिक स्वयंपाकघर उपक्रम सुरू झाला आहे. या अंतर्गत शहरातील पोलिस कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना नाश्ता दिला जात आहे. गेल्या चोवीस तारखेपासून हा उपक्रम राबवला जात आहे. 
*****
*** 





No comments: