Monday, 1 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 01 JUNE 2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 ०१ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी सव्वीस कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे बाधितांची संख्या एक हजार पाचशे एकोणसत्तर इतकी झाली आहे. यापैकी एक हजार एकोणतीस रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून बहात्तर जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या चारशे अडुसष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात आज नव्याने आणखी तीन कोरोनाविषाणू बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या एकशे एकोणपन्नास झाली आहे.
****
अमरावती जिल्ह्यात आज नवीन आठ कारोना विषाणूबाधित रुग्ण आढळले, यामुळे जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या दोनशे सव्वीस झाली आहे.
****
वर्धा शहरातल्या एका नागरिकानं ई-पास सेवेचा गैरफायदा घेत २३ वेळा अर्ज केला. एकच व्यक्ती वारंवार अर्ज करून बेकायदेशीरपणे रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात जात असल्याचं लक्षात येताच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं गृह विलगीकरण करण्यात आलं आहे.
****
येत्या ८ जूनपासून देशभरातील धार्मिक स्थळ पुन्हा उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने त्याबद्दलचा निर्णय घ्यावा, असं सुचवलं आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रात टाळेबंदी संपेपर्यंत धार्मिक स्थळं बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
पुणे - बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे ते संकेश्वर या नव्या पर्यायी महामार्गाची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या मार्गामुळे सांगली, मिरज, तासगाव, विटा ही शहरं या महामार्गावर येणार आहेत.
****
देशात आज विशेष श्रमिक आणि तीस वातानुकुलीत रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त दोनशे विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. यामधून दररोज एक लाख पंचेचाळीस हजार पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणार आहेत. सव्वीस लाख प्रवाशांनी या महिन्यात तिकीटं आरक्षित केली आहेत.
****


No comments: