Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
राज्य विधान परिषदेच्या नऊ
रिक्त जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग येत्या २१ मे रोजी निवडणूक घेण्याची शक्यता
आहे. आज सकाळी नवी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या बैठकीत २७ मे पूर्वी निवडणूक घेण्यावर
एकमत झालं, ही निवडणूक २१ मे रोजी होण्याची शक्यता असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे. या निवडणुकीदरम्यान कोरोना प्रतिबंधाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं
पालन करण्याचं आश्वासन राज्याच्या मुख्य सचिवांनी निवडणूक आयुक्तांना दिलं आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नाहीत, त्यांनी पदग्रहण केल्यापासून
सहा महिन्यांच्या आत कोणत्याही एका सदनाचं सदस्य होणं, आवश्यक आहे. ही सहा महिन्यांची
मुदत २७ मे रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान
परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे
केली होती, मात्र राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विधान परिषदेच्या नऊ रिक्त
जागांसाठी प्रलंबित निवडणूक घेण्याची विनंती केली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे
ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती.
****
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. दोन्ही
नेत्यांमध्ये सुमारे वीस मिनिटं चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
महाराष्ट्र तसंच गुजरात स्थापना दिनाच्या दोन्ही राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या
आहेत. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या
काळात राज्याची प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो, असं पंतप्रधानांनी आपल्या
ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
मराठवाड्यासह राज्यभरात साठावा
महाराष्ट्र दिन आज साधेपणानं साजरा झाला. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रांगणात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अत्यंत साधेपणाने सोशल डिस्टन्सिंगचा
नियम पाळून शासकीय ध्वजारोहण झालं.
जालना इथं पालकमंत्री राजेश
टोपे, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे, परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक, लातूर इथं
पालकमंत्री अमित देशमुख, नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण, उस्मानाबाद इथं राज्यमंत्री
संजय बनसोडे यांच्या हस्ते तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते
महाराष्ट्र दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
धुळे इथं पालकमंत्री अब्दुल
सत्तार यांच्या हस्ते तर अहमदनगर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र
दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं.
****
देशात कोरोना विषाणू बाधीत
रुग्णांची संख्या आता पस्तीस हजार त्रेचाळीस इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या
माहितीनुसार, आठ हजार आठशे रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर एक हजार एकशे पंचेचाळीस
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण बरे होत असल्याचं,
आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण तीन दशांश दोन
टक्के एवढं आहे. या आजाराने मृत्यू झालेले अठ्ठयात्तर टक्के रुग्ण हे इतर आजारांनी
ग्रासलेले असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधीतांची
संख्या आता दहा हजार चारशे अठ्ठयांण्णव झाली आहे. यापैकी एक हजार सातशे त्र्याहत्तर
रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर चारशे एकोणसाठ जणांचा मृत्यू झाला आहे
औरंगाबाद इथल्या सत्तेचाळीस
वर्षीय कोरोना विषाणूग्रस्त रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला. त्याला २७ तारखेला उपचारासाठी
दाखल करण्यात आले होते. यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या आता आठ झाली
आहे.
****
नॅशनल टेस्टींग एजन्सी -
राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली
आहे. कोविड -१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल हॉटेल
मॅनेजमेंट कौन्सिलच्या जेईई -२०२०, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी आणि एमबीए
प्रवेश परीक्षा, भारतीय कृषी संशोधन परिषद तसंच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रवेश
परीक्षांचे अर्ज भरण्याची तारीख पंधरा मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. अखिल भारतीय आयुष
पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची अंतिम तारीखदेखील पाच जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. १५
मे नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची प्रवेशपत्रं डाउनलोड करण्यासाठी सुधारित
तपशीलवार वेळापत्रक संबंधित परीक्षा वेबसाइट आणि एनटीए वेबसाइट www.nta.ac.in वर उपलब्ध
करुन दिलं जाईल, असं या बातमीत म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment