Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22
May 2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मे २०२० सायंकाळी ६.००
****
·
देशभरात
लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कोविडच्या प्रसाराला प्रतिबंध.
·
औरंगाबाद
इथं कोरोना विषाणू बाधित दोन महिलांचा मृत्यू.
·
नांदेड
विभागातल्या सहा रेल्वे स्थानकांवर आजपासून रेल्वे आरक्षण सुरू.
आणि
·
भाजपचे
मराठवाड्यात ठिकठिकाणी माझं अंगण माझं रणांगण आंदोलन.
****
देशभरात लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कोविडच्या प्रसाराला
प्रतिबंध झाला असून, एकूण रुग्ण संख्येच्या ८० टक्के रुग्ण हे फक्त पाच राज्यातले असल्याचं
सरकारकडून सांगण्यात आलं आहे. टाळेबंदी लावली नसती, तर देशातला कोविड बाधितांची संख्या
१४ ते २९ लाखाच्या घरात असती आणि मृतांचा आकडा ३७ हजार ते ७८ हजाराच्या जवळपास असता,
असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, देशभरात सध्या कोरोना विषाणू संसर्गाने बाधित
रुग्णांची संख्या एक लाख १८ हजार ४४७ झाली आहे. या आजारामुळे आज सकाळपर्यंत तीन हजार
५८३ जणांचा मृत्यू झाला असून, ४८ हजार ५३३ रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे होऊन घरी परतले
आहेत. सध्या देशभरात ६६ हजार ३३० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे. राज्यातली कोविड रुग्णांची संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे.
****
औरंगाबाद इथं कोरोना विषाणू बाधित दोन महिलांचा आज मृत्यू
झाला. मृतांमध्ये संजय नगर परिसरातली ४१ वर्ष वयाची एक महिला आणि बहादूरपुरा भागातल्या
७० वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे मरण
पावलेल्यांची संख्या आता ४२ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या एक
हजार दोनशे बारा इतकी झाली आहे.
****
लातूर इथं एका पासष्ट वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची
लागण झाली आहे. या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. हा रुग्ण नाकाच्या
शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाला होता. संबंधित व्यक्ती आठ दिवसांपूर्वी बिदर
इथून लातूरच्या लेबर कॉलनीत आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कामगार नेते दादा सामंत यांचं आज मुंबईत बोरीवली इथं वार्धक्यानं
निधन झालं. ते एक्क्याण्णव वर्षांचे होते. प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ.दत्ता सामंत
यांचे ते मोठे बंधू होत. डॉ.दत्ता सामंत यांच्या हत्त्येनंतर दादा सामंत यांनी १९९७
ते २०११ पर्यंत कामगार आघाडी आणि संलग्न कामगार संघटनांचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं
होतं.
****
प्रवासी भारतीय नागरिक - ओसीआय कार्डधारकांना भारतात येण्याची
परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं याबाबत नवीन नियम लागू केले. ज्या
भारतीय कुटुंबातल्या विदेशात राहणाऱ्या मुलांकडे ओसीआय कार्ड असेल, त्यांना कौटुंबिक
आणीबाणीच्या परिस्थितीत या नागरिकांना भारतात येता येणार आहे. पतीपत्नींपैकी एक भारतीय
नागरिक असेल आणि दुसऱ्याकडे ओसीआय कार्ड असेल, अशा जोडप्यांनाही भारतात येता येईल,
असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा परिषद - सीआयसीएससी
अभ्यासक्रमाच्या दहावी तसंच बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रलंबित परीक्षा एक जुलै ते
१४ जुलै दरम्यान होणार आहे. बारावीची परीक्षा २ ते १२ जुलै दरम्यान तर दहावीची परीक्षा
१ ते १४ जुलै दरम्यान होणार असल्याचं, सीआयसीएससीकडून सांगण्यात आलं आहे. सर्व परीक्षार्थींनी
मास्क वापरणं तसंच सॅनिटायझर बाळगणं आवश्यक असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आज जागतिक आरोग्य
संघटना - डब्ल्यू एच ओच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून आज कार्यभार ग्रहण केला.
हर्षवर्धन यांच्या या पदावर नियुक्तीचा निर्णय १९४ देशांच्या जागतिक आरोग्य परिषदेनं
गेल्या मंगळवारी घेतला होता.
****
रेल्वे मंडळाने एक मे पासून आजपर्यंत विशेष श्रमिक रेल्वेच्या
दोन हजार ३१७ फेऱ्या करून जवळपास ३१ लाखावर स्थलांतरित कामगारांना आपल्या राज्यात पोहोचवलं
आहे. यापैकी प्रत्येक रेल्वेच्या प्रवासाचा सरासरी खर्च ८० लाख रुपये आहे. या प्रवासी
वाहतुकीचा ८५ टक्के खर्च रेल्वे मंडळ स्वत: करत असून, १५ टक्के खर्चाची जबाबदारी संबंधित
राज्य सरकारांकडे असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य सरकारांकडून मागणी
येत राहील, तोपर्यंत या विशेष रेल्वे सुरू ठेवणार असल्याचं, रेल्वे कडून सांगण्यात
आलं आहे.
****
नांदेड विभागातल्या सहा रेल्वे स्थानकांवर आजपासून रेल्वे
आरक्षण सुरू करण्यात आलं आहे. यात नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना आणि औरंगाबाद
रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी दोन ते सायंकाळी
पाच या वेळेत आरक्षण खिडक्यांचं काम सुरू राहणार आहे.
दरम्यान, ०१ जून पासून देशभर चालवल्या जाणाऱ्या २०० विशेष
गाड्यांमध्ये नांदेड विभागातल्या नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेसचाही
समावेश आहे. या विशेष गाडीच्या वेळा नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेस
सारख्याच असतील, मात्र ही गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. सरकारने ठरवून दिलेल्या निर्देशांनुसार
महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानका दरम्यान प्रवाशांना या
विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येणार नाही.
****
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या
टाळेबंदीमुळे अहमदनगर जिल्ह्यात अडकून पडलेल्या राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि कोपरगांव
तालुक्यातल्या बिहार राज्यातील एक हजार एकशे चार कामगारांना आज सकाळी शिर्डी रेल्वेस्थानकावरुन
विशेष रेल्वेने बिहारकडे पाठवण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे सोडण्यात आलेली ही पाचवी
श्रमिक रेल्वे असून परप्रांतीय कामगारांना बिहारकडे नेणारी पहिलीच रेल्वे आहे.
****
लातूर जिल्हा अंतर्गत महत्वाच्या मार्गावर पहिल्या टप्प्यातील
एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी सर्व सुरक्षा नियमाचे पालन करून प्रवास
करावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. पहिल्या टप्यात
चाळीस बसेसमधून केवळ पन्नास टक्के प्रवाशांसह प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली
आहे.
****
भाजपच्यावतीनं आज माझे अंगण माझे रणांगण या मोहिमे अंतर्गत
महाराष्ट्र बचाव चा नारा देत आंदोलन करण्यात आलं.
जालना इथं भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली
जालना जिल्हा भाजपाच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कोरोना
विषाणूच्या संकटात जनतेला सुविधा देण्यात सरकार असमर्थ ठरलं असून, सुधारणा झाली नाहीतर
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला
परभणी जिल्ह्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपापल्या
घरासमोर, चौकात सामाजिक अंतर राखत, तोंडाला काळे मास्क, काळे कपडे परिधान करून आंदोलनात
सहभागी झाले होते.
उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपच्या वतीनं कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष
नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काळे मास्क बांधून,
हाताला काळा पट्ट्या बांधून तसेच काळे कपडे आणि काळे झेंडे हातात घेऊन महाराष्ट्र बचाव
आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद इथं खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, ज्येष्ठ
नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात पानमळ्यांचं गाव
म्हणून प्रसिद्ध असलेल्या पानकनेरगाव या गावात लॉक डाऊनमुळे नागवेलीची पाने तोडून फेकण्याची
वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पानपट्ट्या आणि विवाह सोहळे बंद असल्यामुळे इथले पान पिकवणारे
शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून
केली जात आहे.
****
कापूस खरेदीत होत असलेली दिरंगाई आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या
प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज राज्यभरात मूठभर कापूस दहन
आंदोलन करण्यात आलं. आज सकाळी अकरा वाजता राज्यभरात एकाच वेळी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी
गळ्यात कांद्याच्या माळा घालून मूठभर कापूस जाळून सरकारचा निषेध केला. शेतकरी संघटनेचे
अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही माहिती दिली. अत्यंत मंद गतीने सुरू असलेल्या कापूस खरेदीला
गती द्यावी, एफएक्यू - रास्त सरासरी गुणवत्तेच्या मध्यम तसंच आखुड धाग्याच्या कापसाची
खरेदी करावी, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ - नाफेड मार्फत २००० रुपये प्रती क्विंटल
प्रमाणे कांदा खरेदी करावा, या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं घनवट
यांनी सांगितलं. शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार यांच्या नेतृत्वात औरंगाबाद
इथं त्यांच्या घरासमोर मूठभर कापूस जाळून शासकीय कापूस धोरणाचा निषेध करण्यात आला.
तसंच पैठण तालुक्यातील खादगांव, आडगाव इथले शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले.
****
हिंगोली जिल्ह्यात नगर पालिका कर्मचाऱ्यांनी आज पासून
कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. औंढा नागनाथ देवस्थानच्या वतीनं वाटप करण्यात आलेले धान्याचे
किट गरजुंपर्यंत पोहचवले नसल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळमनुरी
पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्याचे आदेश
दिले आहेत, हे आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांचा
दोष नसतांनाही त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचं संघटनेने म्हटलं आहे. या आंदोलनामुळे
जिल्हयातल्या पाचही नगर पालिकांचं कामकाज ठप्प झालं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज ११ कोरोना बाधीत रुग्णांना सुटी देण्यात
आली. उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment