Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जून २०२० सायंकाळी ६.००
****
कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या आपत्तीचं इष्टापत्तीत रुपांतर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
गेल्या २४ तासात राज्याभरात पाच हजार ७१ रुग्णांची कोरोना विषाणू संसर्गावर मात
औरंगाबाद जिल्ह्यात ९७ रुग्णांची वाढ, नांदेड इथं २४ तर जालन्यात नवीन नऊ रुग्ण
जळगावचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं आज मुंबईत निधन
आणि
जालना शहरातले सर्व व्यवहार येत्या १९ ते २१ जून दरम्यान बंद
****
कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या आपत्तीचं इष्टापत्तीत रुपांतर करुया, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोविड 19 संदर्भात देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी आज चर्चा केली, या चर्चेच्या प्रारंभी ते बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचलं असून, मृत्यूदर सर्वात कमी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सर्वांनी मास्कचा वापर आवर्जून करावा, कोरोना विरोधातल्या लढाईत आपली छोटीशी चूकही महागात पडू शकते, असं मोदी यांनी नमूद केलं. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे, आर्थिक सुधारणांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं सांगतानाच, स्थलांतरित कामगार आपापल्या घरी सुरक्षित पोहोचल्याची खात्री करून घेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.
****
केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविडशी संबधित उपचारांसाठी खाजगी रुग्णालयांशी विचार विनिमय करण्यास सांगितलं आहे, रुग्ण खाटा आणि इतर उपचारांची व्यवस्था व्हावी, यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. या रूग्णालयांच्या सेवा शुल्कातही संपूर्ण पारदर्शकता असावी असंही केंद्रानं म्हटलं आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांनी अशी प्रक्रिया सुरू केली आहे. देशात आता दररोज तीन लाख कोरोनाच्या चाचण्या करणं शक्य झालं आहे. गेल्या २४ तासात कोरोना विषाणू संसर्गाच्या दीड लाख चाचण्या करण्यात आल्या असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गेल्या २४ तासात राज्यात कोरोना विषाणू संसर्गातून बरे झालेल्या पाच हजार ७१ रूग्णांना विविध शहरातल्या रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात एकट्या मुंबईतल्या चार हजार २४२ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या पंधरा दिवसात सर्वात जास्त रुग्ण बरे होण्याची ही दुसरी वेळ असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, आतापर्यंत ५६ हजार ४९ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या सात जणांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे. आज या सात जणांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यात संगमनेर तालुक्यातले चार, राहाता इथला एक आणि अहमदनगर शहरातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २१३ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली.
****
धुळे जिल्ह्यात आणखी तीन कोरोना विषाणू बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला, यात शिरपूर इथल्या एक पुरूष आणि एका महिलेचा तर धुळे शहरातल्या एका महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२ रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान जिल्ह्यात आणखी १२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता ४२२ वर पोहचली आहे.
दरम्यान आज ९ रुग्णांनी या आजारावर मात केली. हे सर्व ९ रुग्ण दोंडाईचा शहरातील असून, त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.
****
वाशिम जिल्ह्यात दोन दिवसात १० नव्या कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाली आहे, आता जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णाची संख्या ५२ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजार ९२१ झाली आहे. यापैकी एक हजार ५४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता एक हजार २१४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. यामध्ये ५५ पुरूष आणि ४२ महिला रुग्णांचा समावेश आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज नवीन २४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता २८६ झाली आहे. दरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या तीन कोरोना बाधित रुग्णांना आज उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. त्यामुळे कोरोना विषाणू मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १८० झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३ कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक नीळकंठ भोसीकर यांनी सांगितलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज आणखी नऊ जणांचे कोरोना विषाणू चाचणी अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्याची एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३०० झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये जालना शहरातल्या गुडलागल्ली भागातल्या तीन, जालना तालुक्यातल्या खरपुडीमधील एक, जाफराबाद शहरातले दोन आणि भोकरदन शहरातल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
*****
भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा परिषद - सीआयसीएसईने दहावी तसंच बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षा न देता पूर्व परीक्षेतल्या कामगिरीच्या आधारे गुणांकनाचा पर्याय दिला आहे. परिषदेनं हा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयासमोरही सादर केला. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिषदेनं दहावी तसंच बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, या आशयाची याचिका काही पालकांनी न्यायालयात दाखल केली आहे, त्यावरच्या उत्तरादाखल परिषदेनं हा प्रस्ताव न्यायालयासमोरही सादर करताना, विद्यार्थ्यांनी आपला पर्याय २२ जूनपर्यंत कळवावा, असं सांगितलं आहे. कोविड प्रादुर्भावामुळे दहावी तसंच बारावीच्या परीक्षा १ ते १४ जुलै दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
****
लद्दाखच्या पूर्व भागात गलवान खोऱ्यात काल रात्री चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत भारतीय सैन्याचा एक अधिकारी आणि दोन सैनिकांचा मृत्यू झाला. दोन्ही देशांचं सैन्य या भागातून परतत असताना, झालेल्या या प्रकारात दोन्हीकडचे सैनिक मारले गेल्याचं वृत्त आहे . घटनास्थळावरचा तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. १९७५ नंतर चीनच्या सीमेवर सैनिकांच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
****
जळगावचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं आज मुंबईत निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी मुंबईत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल विविध पक्षीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु;ख व्यक्त केलं आहे. रणदिवे यांच्या निधनामुळे राज्यानं एक लढवय्या पत्रकार गमावला, महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा इतिहास रणदिवे यांच्या गौरवशाली योगदानाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील, असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे, तर रणदिवे यांच्या निधनानं पत्रकारितेतील वैभव गेलं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावनास व्यक्त केल्या.
****
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातल्या अग्रलेखामुळे काँग्रेस पक्षाबाबत चुकीचा संदेश जात असल्याचं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये नाराजी असून, अनेकांची कुजबुज कानावर येत असल्याच्या आशयाचा हा अग्रलेख अर्धवट माहितीवरून लिहिला असल्याची टीका करत, थोरात यांनी, आमच्या पक्षाची भूमिका जाणून घेतल्यावर मुख्यमंत्रीही समाधानी होतील, त्यानंतर सामनानं पूर्ण माहिती घेऊन पुन्हा अग्रलेख लिहावा, असं म्हटल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं जिल्हा व्यापारी महासंघानं जालना शहरातले सर्व व्यवहार येत्या १९ ते २१ जून या तीन दिवसांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंदच्या काळात औषधी आणि कृषीविषयक साहित्याची दुकानं मात्र सुरू राहणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवावी, असं आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला, कार्याध्यक्ष विनीत सहानी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधला. परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही, मात्र धोका अजूनही टळलेला नाही याची जाणीव ठेवण्याचं तसंच जनतेनं जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे २२८ रुग्ण असले तरी त्यापैकी १९२ रुग्ण बरे झाले आहेत सध्या ३६ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
****
औरंगाबाद शहरात विटखेडा इथल्या महापालिकेच्या शाळेत आजपासून डिजीटल पद्धतीनं शिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते झूम ॲपच्या साहाय्यनं या ार्श्वभूम आज सुरुवात करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करत हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचं शाळेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
****
जालना शहरात सुरक्षित अंतर राखण्याचे नियम न पाळणाऱ्या दुकानदारांसह नागरिकांवर कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. आज नवीन जालना भागातल्या विविध बँकांसमोर नियम मोडून गर्दी करणाऱ्या ८६ नागरिकांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गरीबशहा बाजार परिसरात केश कर्तनालय सुरू ठेवणाऱ्या एका व्यावसायिकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी नागरिकांना सुरक्षित सामाजिक अंतराचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.
*****
No comments:
Post a Comment