Tuesday, 16 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 16 JUNE 2020 TIME - 11.00 AM

आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 १६  जून   २०२०   सकाळी ११.०० वाजता
****
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचं पथक आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. या वादळामुळे गावोगावी नागरिकांच्या मालमत्तेचं तसंच फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. 
दरम्यान, रायगड जिल्ह्यातल्या सुमारे ५० टक्क्यांवर गावात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरण कंपनीला यश मिळालं आहे. जिल्ह्यात १ हजार ९७६ गावांपैकी १ हजार ५३ गावातला वीज पुरवठा सुरू झाला आहे. ६ लाख ३८ हजार ८५९ वीज ग्राहकांपैकी ४ लाख २५ हजारावर वीज ग्राहकांची घरं पुन्हा एकदा प्रकाशमान झाली आहेत
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आज दुपारी तीन वाजता २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तर उद्या दुपारी तीन वाजता महाराष्ट्रासह १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान संवाद साधतील.
****
गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यात नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावर असलेली चार वाहनं जाळली. यामध्ये ३ ट्रॅक्टर आणि एका टिप्परचा समावेश आहे. २० ते २५ नक्षलवाद्यांच्या गटानं ही जाळपोळ केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत ११ ने वाढ झाली आहे. हे नवे रुग्ण दारव्हा इथल्या रुग्णाच्या अगदी निकटच्या संपर्कातला असल्याचं समजतं. आता जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४३ झाली आहे तर आतापर्यंत ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज ९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये ५४ पुरूष  आणि ३९ महिला रुग्णांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या दोन हजार ९१८ झाली आहे. यापैकी १ हजार ५४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार २११ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आज सकाळ पर्यत जिल्ह्यात १७ पूर्णांक ८७ शतांश मिली मीटर पावसाची नोंद झाली. पावसाची रिपरिप अद्यापही सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...