Wednesday, 17 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 17 JUNE 2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** लडाखमध्ये भारत - चीन सिमारेषेवरच्या संघर्षात एका कर्नलसह २० जवान शहीद; चीनचेही ४३ सैनिक ठार झाल्याचं वृत्त
** अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी नवी दिल्लीत अत्युच्च पातळीवर रात्री उशिरापर्यंत बैठका
** टाळेबंदी उठवण्यास सुरुवात केल्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचा पंतप्रधानांचा दावा, महाराष्ट्रासह १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधणार
** कोविड-१९च्या माहितीच्या फेरतपासणीत मुंबईत ८६२ तर राज्यातल्या अन्य जिल्ह्यात एकूण ४६६ मृत्यूच्या संख्येत वाढ
** राज्यात काल आणखी दोन हजार ७०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद.
** औरंगाबादमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू तर १०७ नवीन रुग्णांची नोंद, मराठवाड्यात बीड वगळता अन्य जिल्ह्यातही रुग्ण संख्येत वाढ
** आणि
** पेट्रोल डिझेलच्या दरात काल सलग दहाव्या दिवशी वाढ 
****
लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सिमारेषेवर दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या एका कर्नलसह २० जवान शहीद झाले आहेत, तर चीनचेही ४३ सैनिक ठार झाल्याचं वृत्त आहे. गलवान खोऱ्यात हा संघर्ष झाला. प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री हा संघर्ष झाला. यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी नवी दिल्लीत अत्युच्च पातळीवर रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी तूर्त गलवाण खोऱ्यातून माघार घेतल्याचं भारतीय लष्करानं म्हटलं आहे. गलवाण खोऱ्यातून सैन्य माघारीचे वचन चीननं पाळलं नाही. त्याऐवजी पुन्हा या भूभागावर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे संघर्ष उडाल्याचं परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं. प्रारंभी एक कर्नल आणि दोन सैनिक शहीद झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर गलवान दरीत पडल्यामुळे जखमी झाल्यामुळे १७ सैनिकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. 
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलप्रमुख जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया आणि नौदलप्रमुख अॅएडमिरल करम्बीरसिंह यांच्यासह परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करून सीमेवरील अभूतपूर्व परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व कायम ठेवण्यास भारतीय लष्कर वचनबद्ध असल्याचं सेना दलानं म्हटलं आहे. या संघर्षात चीनचेही ४३ सैनिक ठार झाल्याचं वृत्त आहे, मात्र चीनने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.
****
टाळेबंदी उठवायला सुरुवात केल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांमधल्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोविड १९ संदर्भात देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी काल चर्चा केली, या चर्चेच्या प्रारंभी ते बोलत होते. आयुष्य आणि उपजीविकावर लक्ष केंद्रीत करणं, पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर देणं, तपासण्या करणं, बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणं, आणि आर्थिक सुधारणांना गती देणं, या मुद्यांवर पंतप्रधानांनी भर दिला. विजेचा घटलेला वापर आता वाढला आहे, गेल्या महिन्यात खतांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली, गेल्या वर्षीच्या तुलनेत खऱीपच्या पेरण्यांमधे चांगली वाढ दिसते आहे, दुचाक्यांचं उत्पादन वाढलं आहे, किरकोळ खरेदी-विक्रीत डिजिटल पेमेंट पूर्वीच्या पातळीवर आलं आहे, पथकर संकलन वाढलंय, आणि निर्यातही वाढू लागलीय, या उत्साह वाढवणाऱ्या गोष्टी असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, या संकटाचं संधीत रुपांतर करा, असं आवाहन केलं.
दरम्यान, पंतप्रधान आजही महाराष्ट्रासह १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
****
कोविड १९च्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला पाच लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. सामाजिक कार्यकर्ते सागर जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली होती. खासगी रुग्णालयातल्या राखीव खाटांवरच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्थगित करण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांमधले दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या पीठानं काल या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान, याचिकाकर्त्याची ही मागणी विसंगत असून, राज्य सरकारनं घेतलेला निर्णय योग्य असल्याचं नमूद केलं. याचिका फेटाळून लावत न्यायालयानं याचिकाकर्त्याला एका महिन्याच्या आत पाच लाख रुपये दंड भरण्यास सांगितलं आहे.
****
राज्य सरकारनं कोविड-१९च्या रुग्णासंदर्भातल्या माहितीची फेरतपासणी केली असून राज्यातल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आणखीन ८६२ मृत्यू, तर राज्यात ४६६ मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या सर्वांचे मृत्यूसमयी अहवाल कोविड बाधित असल्याची नोंद आहे. यामध्ये ठाण्यात १४६, पुण्यात ८५, सोलापूर ५१, जळगाव ३४, औरंगाबादमध्ये ३३, नाशिक २८, अकोला आणि रायगड प्रत्येकी १४, धुळे १२, पालघर ११, सातारा आणि अमरावती प्रत्येकी सहा, जालना आणि सांगली प्रत्येकी चार, लातूर, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग प्रत्येकी तीन, नांदेड आणि बुलढाणा प्रत्येकी दोन, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी वाशिम आणि  यवतमाळमध्ये प्रत्येकी एक अशी मृत्यूसंख्या वाढली आहे.
कोविड-१९ रुग्णासंदर्भातली माहिती प्रत्येक जिल्ह्यातल्या रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येत असून, या माहितीत पारदर्शकता असावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही व्हावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिली असून, त्यानुसारच हे  समायोजन करण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परवा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचे मृत्यू कमी दाखवून सरकार आकडेवारी लपवीत असल्याचा आरोप केला होता.
****
राज्यात काल आणखी दोन हजार ७०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख १३ हजार ४४५ इतकी झाली आहे. काल या आजारानं ८० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या आजारानं पाच हजार ५३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ५७ हजार ८५१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ५० हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये मुकुंदवाडीतली ३५ वर्षीय महिला, रोझाबाग इथला ५५ वर्षीय पुरुष, इटखेडा इथली ७५ वर्षीय, हर्ष नगरमधल्या ४० वर्षीय अणि बेगमपुर्यातल्या ७८ वर्षीय स्त्री रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं १६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी १०७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ९३२ इतकी झाली आहे. यापैकी ९१ रुग्ण शहरी भागातले आहेत. ग्रामीण भागात चिकलठाणा पाच, इटखेडा दोन, तर वैजापूर, वाहेगाव, दुधड, कन्नड तालुक्यातलं कानडगाव, देवगाव रंगारी, वाळूज, वडगाव कोल्हाटी, फुलंब्रीमध्ये फत्ती मैदान आणि तेली गल्ली इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार ६५८ रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार १११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.     
****
नांदेड जिल्ह्यात काल नवीन २४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता २८६ झाली आहे. दरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या तीन कोरोना बाधित रुग्णांना काल उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. त्यामुळे कोरोना विषाणू मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १८० झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३ कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक नीळकंठ भोसीकर यांनी सांगितलं आहे.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी १८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता ३०९ झाली आहे. बाधितांमध्ये जालना शहरातल्या गुडलागल्ली भागातले चार, कादराबादमधल्या चार, राज्य राखीव पोलीस दलाचे दोन कर्मचारी, संभाजीनगर, आणि बालाजीनगरातला प्रत्येकी एक, जालना तालुक्यातल्या खरपुडीतला एक, जाफराबाद शहरातले दोन आणि भोकरदनमधल्या तीन रुग्णांचा समावेश आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १४ रुग्णांना काल जिल्हा रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं. आजपर्यंत जिल्ह्यातले १८५ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले असून, जिल्हा कोवीड रुग्णालयात सध्या १०८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं जिल्हा व्यापारी महासंघानं जालना शहरातले सर्व व्यवहार येत्या १९ ते २१ जून या तीन दिवसांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंदच्या काळात औषधी आणि कृषीविषयक साहित्याची दुकानं मात्र सुरू राहणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवावी, असं आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला, कार्याध्यक्ष विनीत सहानी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी दहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. लातूर शहरातल्या जुना कापड लाईन भागात एक, औसा तालुक्यातल्या अंधोरा, आणि कासारशिरसी इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. इतर भागातले सात रुग्ण आहेत. 
****
उस्मानाबाद इथं काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली. उस्मानाबाद तालुक्यातल्या वाणेवाडी, तुळजापूर तालुक्यातल्या सलगरा, मसला, उमरगा तालुक्यातल्या बेटजवळगा इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १५३ झाली आहे. यापैकी ११६ रुग्ण बरे झाले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. मुरुंबा गावातला हा २५ वर्षीय तरुण पुण्याहून आला होता. हिंगोली जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या २२९ झाली आहे. त्यापैकी १९२ रुग्ण बरे झाले. सध्या ३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी तालुक्यातल्या जांब इथं एक ७० वर्षीय महिला कोरोना विषाणू बाधित आढळून आली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या ९४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८६ जण कोरोना विषाणू मुक्त झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले. धुळ्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर १२ नव्या रुग्णांची नोंद झाली. सोलापूर इथं आणखी सहा बाधित रुग्ण आढळले.
****
कोविड-१९ च्या प्रार्श्वभूमीवर या वर्षी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस डिजिटल माध्यमांवर साजरा केला जाणार आहे. ‘घरीच योग आणि परिवारासोबत योग’ हा यंदाच्या या दिनाचा विषय आहे. या दिवशी लोकांनी एकत्र न येण्याचं आणि सकाळी सात पासून आपल्या घरीच राहून योगाभ्यास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सध्या डीडी भारती या वाहिनीवर सकाळी दररोज सात ते साडे आठ या वेळेत योगाच प्रसारण केलं जात आहे

****
पेट्रोल डिझेलच्या दरात काल सलग दहाव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतीलिटर १६ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतीलिटर ९३ पैशांनी वाढ झाली आहे. या दहा दिवसांत पेट्रोलचे दर लीटरमागे पाच रुपये ४७ पैसे तर डिझेलचे दर लीटरमागे पाच रुपये ८० पैशांनी वाढले आहेत.
दरम्यान, पेट्रोल- डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे. इंधनाचे दर कमी करावेत, आणि सर्वसामान्य नागरिकांना दर कपातीचा थेट लाभ द्यावा, अशी मागणी गांधी यांनी या पत्रात केली आहे.
****
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातल्या अग्रलेखामुळे काँग्रेस पक्षाबाबत चुकीचा संदेश जात असल्याचं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये नाराजी असून, अनेकांची कुजबुज कानावर येत असल्याच्या आशयाचा हा अग्रलेख अर्धवट माहितीवरून लिहिला असल्याची टीका थोरात यांनी केली. आमच्या पक्षाची भूमिका जाणून घेतल्यावर मुख्यमंत्रीही समाधानी होतील, त्यानंतर सामनानं पूर्ण माहिती घेऊन पुन्हा अग्रलेख लिहावा, असं ते म्हणाले.
****
जालना शहरात सुरक्षित अंतर राखण्याचे नियम न पाळणाऱ्या दुकानदारांसह नागरिकांवर कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. काल नवीन जालना भागातल्या विविध बँकांसमोर नियम मोडून गर्दी करणाऱ्या ८६ नागरिकांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गरीबशहा बाजार परिसरात केश कर्तनालय सुरू ठेवणाऱ्या एका व्यावसायिकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी नागरिकांना सुरक्षित सामाजिक अंतराचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासोबत काल  बैठक झाली. या बैठकीत भुकंपग्रस्त भागातल्या गावठाण जमिनीवर वृक्षारोपण, सार्वजानिक दहनभूमी आणि दफनभूमी याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भुकंपग्रस्त पुनर्वसन गावातली जुनी गावठाण जमीन वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागास हस्तांतरित करुन या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी आमदार पवार यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. फळ लागवडबाबत यशस्वी ठरलेला बिहार पॅटर्न लातूर जिल्ह्यात राबवला जाणार असून, यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, जळगाव जिल्ह्यातल्या रावेरचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. जावळे यांना तीन जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात आलं होतं. काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जावळे हे दोन वेळेस आमदार तर दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं.
****
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं काल मुंबईत दादर इथं राहत्या घरी निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. डहाणू तालुक्यातल्या आदिवासीबहुल भागात जन्मलेल्या रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीनं १९५६ साली सुरू केलेल्या संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाच्या अनियतकालिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. पत्रकारितेतील लोकशाही मूल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासी आणि श्रमिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला. गोवा मुक्ती संग्राम, तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
रणदिवे यांच्या निधनाबद्द्ल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु;ख व्यक्त केलं आहे.
****
बौद्ध तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, लेखक प्राचार्य पी. व्ही. सुखदेवे यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. सुखदेवे यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. त्यांच्या पार्थिवावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
लातूर शहरात वृक्ष चळवळीत योगदान देत असलेल्या सामाजिक संस्थांना महाराष्ट्र नर्सरी असोसिएशन कडून तीन हजार ५०० रोपं मोफत दिली जाणार आहेत. वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज असून सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र नर्सरी असोसिएशन ही मदत करणार असल्याची माहिती अध्यक्ष विश्वास जोगदंड आणि संचालक संगमेश्वर बोमणे यांनी दिली.
****
जालना जिल्ह्यात टप्प्या-टप्प्यानं शाळा सुरु करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागान सूचना जारी केल्या आहेत. पहिल्या पंधरवड्यात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले असून गावात कोरोना विषाणूच्या बाधेबाबतची माहिती घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सामाजिक माध्यमांवर माहिती देतांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ म्हणाले….

या शाळा पंधरवड्यामध्ये आपल्याला पालकांची गटगटांनी छोट्या – छोट्या सभा  घेता येतील त्यांच्यानंतर कोरोना विषयी जनजागृती करता येईल आपल्या शाळेतील काही विद्यार्थी आहेत त्यांचे सरळ पोर्टल हे जाहीर महत्त्वाचे पोर्टल आहेत त्यांची नोंद करता येईल त्यांच्या आधार क्रमांक आपल्याला अपडेट करता येईल त्यासोबतच सर्वांत महत्वाचं ज्या ठिकाणी आपण सुरुवातीलाच शाळा भरत नाही आहोत तर अशावेळी आपण तयार आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म गूगल मीट एप, मायक्रोसॉफ्ट क्लासरूम,
व्हाट्सएप ग्रुप सुद्धा आहेत प्लॅटफॉर्म आहेत एपच्या माध्यमातून  आपल्याला अध्यापन करायचं आहे.

****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कामगारांचे वेतन न देणाऱ्या कंपन्या आणि आस्थापनावर कारवाई करण्याच्या सूचना खासदार इम्तियाज जलील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कामगार उपायुक्त कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. औद्योगिक कारखाने, शासकीय- निमशासकीय कार्यालय आणि विभाग, विविध खाजगी संस्था, आस्थापनांमध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांचं वेतन वेळेवर न देणाऱ्या आणि आर्थिक, मानसिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर करवाई करण्यात यावी, तसंच त्यांचे परवाने निलंबित करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
राज्य सरकारनं शिक्षण आणि  शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीड जिल्हा परिषदेच्या वतीनं शाळा सुरु करण्यासाठी शाळापूर्व तयारी पंधरवाडा आयोजित केला आहे. यात उद्या शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन शाळा सुरु करण्यापूर्वीची तयारी, स्वच्छतागृहांची स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सर्व व्यवस्था आदींबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
****
हिंगोली - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी ते आखाडा बाळापूर दरम्यान पार्डी मोड शिवारामध्ये कळमनुरी आगाराच्या बसवर अज्ञातांनी काल दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं. या प्रकारामुळे घाबरलेल्या एसटी चालक आणि वाहकाने बस जागेवरच सोडली आणि कळमनुरी आगारात धाव घेतली.  दगडफेक करणारे चौघेजण फरार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत बदल करून रोगप्रतिकार शक्ती वाढवणं आवश्यक असून, यासाठी होमिओपॅथिक औषध अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्याव्या, असं परभणीचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलं आहे. पालम इथं हे औषध वाटपाच्या कार्यक्रमात ते ते काल बोलत होते.
****
औरंगाबाद शहरात विटखेडा इथल्या महापालिकेच्या शाळेत कालपासून डिजिटल पद्धतीनं शिक्षणाची सुरुवात झाली. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते झूम ॲपच्या साहाय्यानं हा उपक्रम सुरू करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करत हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचं शाळेच्या वतीनं सांगण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...