Monday, 21 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.09.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 September 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

राज्यसभेत काल कृषी विधेयकांवरची चर्चा आणि मतदानावेळी झालेली घटना निंदनीय असून, या घटनेमुळे राज्यसभेची प्रतिमा डागाळली असल्याची भावना सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते. विरोधी पक्षांच्या ४६ सदस्यांनी उपसभापती हरिवंश यांच्याविरोधात दिलेला अविश्वास प्रस्ताव नायडू यांनी फेटाळून लावला. याशिवाय गदारोळ करणाऱ्या आठ सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित केलं. यामध्ये काँग्रेस पक्षाचे राजीव सातव, रिपुण बोरा, नजीर हुसैन, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन आणि डोला सेन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के के रागेश, आणि इलामारम करीम तसंच आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांचा समावेश आहे. निलंबनाचा ठराव मंजूर झाल्यावर सभापतींनी या सदस्यांना सदनाबाहेर जाण्यास सांगितल्यावर या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सदनाचं कामकाज लागोपाठ चार वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं.

****

कोरोना विषाणू मुक्तीच्या बाबतीत भारत जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात कोविड बाधितांचं संसर्गमुक्त होण्याचं प्रमाण ८० पूर्णांक १२ शतांश टक्के झालं आहे. गेल्या २४ तासांत ९३ हजारापेक्षा अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोविड संसर्ग झालेले ८६ हजार नऊशे एकसष्ट रुग्ण सापडले. यामुळे देशभरात या संसर्गानं बाधित रुग्णांची संख्या ५४ लाख ८७ हजार ५८० झाली आहे. गेल्या २४ तासात या संसर्गानं १ हजार १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या संसर्गानं मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ८७ हजार आठशे ब्याऐंशी झाली आहे. या संसर्गाचा मृत्यूदर आता एक पूर्णांक सहा दशांश टक्के झाला आहे.

****

कोविड विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीविर या औषधाचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात या औषधाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी कोविड संसर्ग झालेले २३ नवे रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण अँटिजेन चाचण्यांमधून समोर आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३० हजार ७९१ झाली आहे, यापैकी सुमारे २४ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ८६६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या सुमारे ६ हजार रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दहा झाली आहे, यामध्ये सात बालकांचा समावेश आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत एका चार वर्षाच्या बालकासह ११ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी २५ जण अडकले असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. भिवंडीतली ही तीन मजली इमारत आज सकाळी कोसळली. या इमारतीत ४० सदनिका होत्या, ज्यामध्ये जवळपास दीडशे लोक राहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

सकल मराठा समाज संघटनेच्या वतीनं आज सोलापूर शहर तसंच जिल्ह्यातल्या आमदार आणि खासदारांच्या घरासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, प्रणिती शिंदे, खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांच्या घरांसमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबजी केली. दरम्यान, संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या सोलापूर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या दुधना प्रकल्पातून आज सकाळी दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं. यामुळे सेलू तालुक्यातले हादगाव-केदारवाडी, राजेवाडी-वालूर, सेलू-मोरेगाव, मानवत रोड-वालूर हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी ही माहिती दिली.

****

मुंबईत उपनगरी रेल्वे सेवा सर्वसामान्यांनाही उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आंदोलनाचा भाग म्हणून उपनगरी रेल्वेतून प्रवास केला. सर्वसामान्य प्रवाशांना एसटी बसने प्रवासाची परवानगी आहे, मात्र उपनगरी रेल्वे प्रवासाची परवानगी नाही. बस प्रवासाला लागणारा वेळ पाहता, सरकारने सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेचे महासचिव संदीप देशपांडे यांनी केली.

****

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या २४ धरणातला जलसाठा आता ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह ११ धरणं पूर्ण भरली आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...